अभिनंदन भगिनींनो!

    09-Mar-2023   
Total Views |
Women from tribal communities in Tamil Nadu entitled to equal share in family property under Hindu Succession Act


तामिळनाडू राज्यातील वनवासी महिलांना हिंदू वारसा कायद्यानुसार, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्याचा हक्क आहे, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच दिला. मद्रास उच्च न्यायालयामध्ये वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करणार्‍या वनवासी महिलेचा खटला दाखल झाला. त्यावेळी वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगणार्‍या महिलेच्या वकिलाने मुद्दा मांडला की, ‘हिंदू वारसा कायदा २(२)’ अंतर्गत हा कायदा अनुसूचित जमातीच्या सदस्यांनाही लागू केला जाऊ शकतो. तसेच, केंद्र सरकारची अधिसूचनाही तशीच तरतूद करते. यावर न्यायमूर्ती एम. एस. सुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने निर्णय देताना म्हटले की, ‘हिंदू वारसा कायदा कलम २(२)’ तरतुदींचा वापर करण्यास प्रतिबंध करता येणार नाही. वारसा हक्काबाबत अनुसूचित जमातीच्या महिलांसोबत भेदभाव करण्याचा विधिमंडळाचा हेतू नव्हता. कोणत्याही प्रथेचे स्वरूप निश्चित पाहिजे. या प्रथा व्यवहारात असल्या पाहिजेत. मात्र, मुलींना वडिलोपार्जित वारसा हक्क नाकारावा, या प्रथेसंदर्भात निश्चिती नाही आणि चर्चाही नाही. त्यामुळे तामिळनाडू राज्यात वनवासी समाजाच्या महिलांना हिंदू वारसा कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा आहे.खूपच मोठा निर्णय. या निर्णयावरून गेल्या महिन्याची घटना आठवली. वारली समाजाच्या एका यशस्वी व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दल मी लेख लिहिला. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या सहमतीने आणि सांगण्यानेच त्यांना ‘वनवासी’ आणि ‘हिंदू’ असे संबोधले होते. मात्र, लेख वाचून डहाणू, पालघर, चंद्रपूर, यवतमाळ वगैरे वगैरे भागातून धमकीवजा फोन आणि व्हॉटसअ‍ॅप संदेश आले होते -मी वनवासी व्यक्तीला लेखात ‘वनवासी’ आणि ‘हिंदू’ संबोधल्यामुळे मी समाजाचा अपमान केला. सविस्तर माफी मागा, नाहीतर परिणामाला तयार राहा, अशी त्यांची मागणी. वनवासी समाज हिंदू का नाही, यावर त्यांचे स्पष्टीकरण होते- ”हिंदू कायद्यानुसार मुलींना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळतो. वनवासी मुलींना हा कायदा लागू नाही. त्यामुळे वनवासी हिंदू नाही. जर आम्ही हिंदू असतो, तर मग आमच्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा असता.” सदरची घटना आठवताना मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वपूर्ण वाटत आहे. अभिनंदन, मद्रास उच्च न्यायालय आणि वारसाहक्क कायदा प्राप्त झालेल्या तामिळनाडूतील वनवासी भगिनींनो. सदर निर्णय देशभरात लागू होईल, तो सुदिनच!


नको देवाभावा अंत आता पाहू


कसबा निवडणूक काँग्रेसने जिंकली आणि तिकडे वांद्य्रात आनंदीआनंद झाला. वेळ-काळ बदललाय नाहीतरी नगारे- तुतार्‍या वाजल्या असत्या, हत्तीवरून साखर वाटली असती, वांद्य्राच्या साहेबांनी स्वहस्ते खजिना वाटण्याच्या गोष्टी केल्या असत्या. हो, गोष्टीच केल्या असतात. जनतेसाठी खजिना लुटण्याची पद्धत त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या नसावी. कारण, कोरोना काळात राज्याची सत्ता हातात असताना जनतेसाठी त्यावेळी त्यांनी स्वतःहूनजनतेला मदत केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे आताही कसब्याची जागा काँग्रेसने जिंकल्यानंतर वांद्य्राचे साहेब काही दौलत दान करतील, असे वाटत नाही, तर वांद्य्राचे साहेब भलतेच खूश आहेत. कारण, कसबा निवडणूक जिंकली. का जिंकली, तर त्यात काय त्या उमेदवाराचे काही कर्तृत्व आहे का? तर असा अंदाज बांधणारे महाराष्ट्रद्रोही. कारण, वांद्य्राच्या साहेबांना आणि त्यांच्या अवतीभवती फिरणार्‍या त्याच त्या एक-दोन जणांना विचारा. तिथे काँग्रेस का जिंकली ते. तर खरे कारण आहे तिथे वांद्य्राच्या साहेबांच्या राजकुमाराने ‘रोड शो’ केला होता. त्या ‘रोड शो’मुळेच तिथे काँग्रेसचे ते धंगेकर जिंकले. खबरदार जर बाळ राजांचे कर्तृत्व नाकाराल, तर राजकारणी लोकांच्या मुलाबाळांना काय शिकावे लागते का सत्तास्थान राबवायचे? त्यामुळे साहेब मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांचे पुत्र डायरेक्ट पर्यटनमंत्री. पण, कोणी उफ तरी केले होते का? ही होती ‘पॉवर.’ काय म्हणता? त्यामुळेच साहेबांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत सत्ता सोडावी लागली. असू दे, आमचे साहेब म्हणालेत की, पुण्यात कसब्यामध्ये जे घडले, ते आता सगळ्या देशात घडणार. काय म्हणता नागालॅण्डमध्ये आमच्या साहेबांच्या आदर्शांनी त्या कमळवाल्यांना साथ दिली? हं काश्मीरमध्ये कसे भाजप ‘पीडीपी’सोबत गेली आणि गनिमीकावा केला. तसेच, साहेब भाजपसोबत नागालॅण्डमध्ये करणार? काय म्हणता, साहेबांना लाख भाजपसोबत जायचे असेल. पण, नागालॅण्डच्या भाजपवाल्यांना त्यांच्यासोबत जायचे नसेल तर? काय म्हणता ते साहेबांना नकार देणार. हं आता बारामतीच्या साहेबांना असा नकार दिल्यावर पुढे मागे वांद्य्राच्या साहेबांना पण नकार देतील का? म्हणजे मग सत्ता परत मिळणारच नाही. दोन वर्षे आम्ही जो रूबाब, सत्ता मिरवली, ती आता परत कधीच नाही. घ्या आम्हाला पण तुमच्यासोबत. नको देवाभावा अंत आता पाहू....


 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.