कर्मदरिद्री पाक, कृतघ्न तुर्की!

09 Mar 2023 21:24:55
turkey
 
दोन महिन्यांपूर्वी तुर्कस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला. या भूकंपात ४० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर लाखो लोक बेघर आणि जखमी झाले. विनाशकारी भूकंपाने डबघाईला आलेल्या तुर्कस्तानला भारताने वेळीच मदतीचा हात दिला. ‘एनडीआरएफ’ पथकासह मोठ्या प्रमाणावर मदत तुर्कस्तानला पोहोचविण्यात आली. या मदतीचे तुर्कस्ताननेदेखील जाहीर कौतुक केले होते. परंतु, भूकंपातून आता कुठे सावरत असताना तुर्कस्तानने आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे.

भारताच्या मदतीला आणि उपकारांना तुर्कस्तानने मूठमाती देत भारतविरोधी पाऊल उचलण्यात धन्यता मानली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव अधिकार परिषदेत मुस्लीम बंधुभावाचे दर्शन घडवत तुर्कस्तानने चक्क पाकिस्तानला पाठिंबा दिला. तुर्कस्तानने पाकिस्तानचे समर्थन करताना भारतावर काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यामुळे मदतीसाठी हाक देण्याआधीच भारताने देऊ केलेल्या मदतीला तुर्कस्तान एका झटक्यात विसरला.तुर्कस्तानातील निसर्गाच्या कोपाने अख्खं जग हळहळलं. या दुर्घटनेच्या काही तासांतच जगभरातून तुर्कस्तानमध्ये मदतीचा ओघ सुरू झाला. यामध्ये भारत अग्रक्रमावर होता, हे विशेष. मदतीसाठी दाखवलेल्या तत्परतेनंतर तुर्कीच्या राजदूतांनीही भारताचे तोंडभरून कौतुक केले होते. परंतु, आता काश्मीर मुद्द्यावर ‘युएनएचआरसी’मध्ये, इस्लामिक देशांच्या संघटनेसह (ओआयसी) तुर्कस्ताननेदेखील पाकिस्तानची बाजू घेतली. त्यामुळे भारत आणि तुर्कस्तानातील संबंध दृढ होण्याआधीच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारतावर टीका केली. दि. २२ डिसेंबर, २०२२ रोजी भारतीय संरक्षण अधिग्रहण परिषदेने ८५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या २४ प्रस्तावांना मंजुरी दिली होती, ज्या अंतर्गत सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि संरक्षण उद्योगाला प्रोत्साहन देण्याशी संबंधित योजनांचा समावेश आहे. त्यावर पाकने नाराजीचे सूर आळवले होते. तसेच, हिना रब्बानी खार यांनी काश्मीरबाबतही भारतावर अनेक खोटे आरोप केले होते. त्यात आता पाकिस्तानला साथ देत तुर्कस्तान आणि ‘ओआयसी’ने पाकिस्तानच्या खोटेपणात आणखी भर घालण्याचे काम केले आहे.

मात्र, भारतीय राजदूत सीमा पुजानी यांनी पाकिस्तान, तुर्कस्तान आणि इस्लामिक देशांच्या संघटनेला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानला ‘दहशतवादी देश’ म्हणत पुजानी म्हणाल्या की, “पाकिस्तानचे लोक अन्नासाठी तळमळत आहेत, पण भारताविषयीचे त्यांचे आक्षेप काही कमी होत नाही. आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान भारताविरोधात अपप्रचार करत असून पाकिस्तानच्या तोंडून मानवी हक्कांच्या गोष्टी ऐकणे म्हणजे एक चेष्टेसारखे वाटते.” सीमा यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश करत पाकला जशास तसे उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, “पाकिस्तानात सरकारविरोधात आवाज उठवणार्‍यांना हद्दपार केले जाते. खुद्द पाकिस्तानच्या चौकशी आयोगाचा हवाला देत त्यांनी सांगितले की, गेल्या दशकात पाकिस्तानमध्ये बेपत्ता लोकांच्या आठ हजार, ४६३ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पाकमध्ये कोणताही धार्मिक अल्पसंख्याक मुक्तपणे जगू शकत नाही. अल्पसंख्याक विशेषतः हिंदूंना पाकमध्ये वारंवार लक्ष्य केले जात आहे.

हाफिज सईद, मसूद अझहर आणि ओसामा बिन लादेन यांची उदाहरणे देत सीमा यांनी शेजारी देश पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांचे आश्रयस्थान राहिल्याचे सांगत पाकसहित तुर्कस्तानवरही जोरदार प्रहार केले. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या फंदात न पडण्याची सूचना भारतीय राजदूतांनी तुर्कस्तानला आणि ‘ओआयसी’ला केली. तसेच, तुर्कस्तान आणि ‘ओआयसी’ने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण प्रदेश भारताचाच भाग होता, आहे आणि राहील, असेही यावेळी पुजानी यांनी पाकसह तुर्कस्तानला ठणकावले.‘दोस्त वही है, जो मुश्किल समय मे काम आए,’ असे ट्विट तुर्कस्तानने भारताच्या मदतीनंतर केले होते. मात्र, यानंतर अवघ्या काही दिवसांतच तुर्कीने भारताला धोका दिला. संकटकाळात भारताने तुर्कस्तानचे अश्रू पुसण्याचे काम केले. परंतु, तुर्कस्तानला मात्र त्याची काहीही पडलेली नाही, हेच यावरुन सिद्ध होते.



Powered By Sangraha 9.0