राज्य सरकार विणणार महामार्गांचे जाळे! पहा तुमच्या शहराला काय फायदा?

09 Mar 2023 18:05:15
Road development by State government


मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात रस्ते विकासावर भर देण्यात आला असून पायाभूत सुविधांद्वारे पर्यटन, दळणवळण आणि उद्योगपूरक अशा सज्ज सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. पायाभूत सुविधांअंतर्गत समृद्धी अन् शक्तिपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. नागपूर गोवा महामार्गाची घोषणा करण्यात आली असून या अंतर्गत तीर्थक्षेत्र आणि शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यामुळे मराठवाड्याच्या अर्थकारणास बळ मिळणार असल्याचा विश्वास राज्य सरकारला आहे.
 
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता तयार केला जाणार आहे. पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग 86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा), अशा स्वरुपात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या अंतर्गत माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार आहेत. या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद
 
- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
 
 
- विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद

 
- रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी

 
- हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये
 
- आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये

 
- रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे

- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये

- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.
 
- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना
 
 
- सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना


 
 
 
Powered By Sangraha 9.0