महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी ‘अस्मिता’ उपक्रमाचा शुभारंभ

    09-Mar-2023
Total Views |
 
मुंबई : मुंबई पोलीस आणि दिव्याज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पोलीस महिला दलाच्या कल्याणासाठी ‘अस्मिता’ या संयुक्त उपक्रमाच्या शुभारंभाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. मुंबईचे पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर आणि दिव्याज फाउंडेशनच्या श्रीमती अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, पोलीस प्रशासनाचे सह-आयुक्त श्री एस जयकुमार आणि -कायदा व सुव्यवस्था विभागाचे आयपीएस श्री सत्य नारायण या मान्यवरांनीही या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच औचित्य साधून अमृता फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. २२ मार्च २०२३ रोजी येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या शुभ दिनी या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याचं आजच्या कार्यक्रमात जाहिर करण्यात आले. मुंबईतील धावपळीचे जीवन, घर काम आणि पोलीस दलातील जबाबदरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी हा विशेष उपक्रम सुरु केला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी ध्यान आणि शारीरिक श्रम यावर विविध व्याख्याने आणि कार्यशाळा ‘अस्मिता’ उपक्रमांतर्गत घेण्यात येणार आहेत. शिवाय, अनेकदा त्यांना कामामुळे योग्य संधी मिळत नाही; अश्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘अस्मिता’अंतर्गत अनेक संधीही उपलब्ध होणार आहेत.  

“महिलांचे सक्षमीकरण खूप महत्त्वाचे आहे, आणि त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी यावेळी केले.

“मुंबई पोलीस दलात सुमारे ५००० महिला कर्मचारी कार्यरत आहेत, ज्या स्वतःची घराची जबाबदारी आणि आपले पोलीस दलातील कर्तव्य तत्परतेने पार पाडतात. ‘अस्मिता’ हा उपक्रम त्यांना घराची काम आणि कर्तव्य यातील समतोल साधण्यास मदत करेल. शिवाय, या उपक्रमांतर्गत त्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील. सोबतच, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक सुदृडता, योग आणि ध्यानधारणा, समुपदेशन अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षणही त्यांना यानिमित्ताने मिळणार आहे.” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि दिव्याज फाउंडेशन अमृता फडणवीस यांनी दिली. स्वतः प्रशिक्षित शास्त्रीय गायिका, सामाजिक कार्यकर्त्या, बँकर आणि गृहिणी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अमृता फडणवीस यांनी, ‘अस्मिता’मुळे पोलीस दलातील महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि जोमाने काम करण्याची प्रेरणाही मिळेल”, असे उद्गारही यावेळी काढले.

‘अस्मिता’च्या बरोबरीने ‘मिट्टी के सितारे’ या उपक्रमांतर्गत आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त समाजातील उपेक्षित घटकांसाठी योग शिबीर, नवी मुंबईतील महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, गरिब व गरजू पण संगीताची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संगीत प्रशिक्षण वर्गांचे आयोजनही दिव्याज फाउंडेशन करतात. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.