स्त्रीजीवना खुलवी सत्य आभूषणे! पूर्वार्ध

    09-Mar-2023
Total Views |
Femininity


स्त्रीशक्तीचा महिमा कोणत्या शब्दांत वर्णावा? अनेक कवी, लेखक, वक्ते आणि विचारवंतांनी मोठमोठ्या उपमा देऊन तिची स्तुती गाण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले, तरी वेदांनी प्रतिपादित केलेल्या स्त्रीमहात्म्यापुढे ते सर्व फिकेच ठरतील. कारण, वेदांत ठिकठिकाणी स्त्रियांचे महत्त्व सर्वोच्च स्तरावरून वर्णिले आहे.

इमा नारीरविधवा: सुपत्नी:
आञ्जनेन सर्पिषा सं विशन्तु।
अनश्रवोन् अमीवा: सुरत्ना,
आ रोहन्तु जनयो योनिमग्ने॥
(ऋग्वेद-१०.१८.७ , अथर्ववेद-१२.२.३१,१८.३.५७)

 
अन्वयार्थ

 
(इमा: नारी:) या नारी, स्त्रिया (अविधवा:) विधवा नसाव्यात. तसेच त्या (सु पत्नी:) उत्तम, चांगल्या पत्नी, (अनश्रव:) अश्रूविहीन,(अनमिवा:) निरोगी, (सु रत्ना:) उत्तम रत्ने धारण करणार्‍या, (जनय:) सुसंततींना जन्माला घालणार्‍या असाव्यात. (आ अंजनेन) डोळ्यात अंजन आणि (सर्पिषा) स्नेहशीलता धारण करीत (अग्रे) सर्वात अगोदर, पहिल्यांदा (सं विशन्तु) प्रवेश करोत. आणि (योनिम् ) प्रत्येक मार्गावर (आ रोहन्तु) आरुढ,स्वार होवोत.
 
विवेचन

 
स्त्रीशक्तीचा महिमा कोणत्या शब्दांत वर्णावा? अनेक कवी, लेखक, वक्ते आणि विचारवंतांनी मोठमोठ्या उपमा देऊन तिची स्तुती गाण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले, तरी वेदांनी प्रतिपादित केलेल्या स्त्रीमहात्म्यापुढे ते सर्व फिकेच ठरतील. कारण, वेदांत ठिकठिकाणी स्त्रियांचे महत्त्व सर्वोच्च स्तरावरून वर्णिले आहे. एका वेदमंत्रात प्रार्थना करताना भक्त ईश्वरास ‘माता च ते समा।’ असे म्हणत मातृशक्तीला ईश्वरासमान लेखतो आहे. तर यजुर्वेदात ’स्त्री हि ब्रह्मा बभूविथ।’ असे सांगत तिला प्रत्येक शुभकार्याच्या ब्रह्मापदी विराजमान केले आहे. कुटुंब असो की समाज, राष्ट्र असो की विश्व, या सर्वांच्या निर्मितीत सर्वात पहिले स्थान जर कुणाचे असेल, तर ते म्हणजे स्त्रीशक्तीचे. चारही वेदांतील अनेक मंत्रांतून तिचा पावन महिमा अभिव्यक्त होतो. म्हणूनच ऋषिजनांसमवेत अनेक ऋषिकांदेखील मंत्रदृष्ट्या व व्याख्यानकर्त्या होऊन गेल्या. विश्ववारा, सिकता, रोमशा, घोषा, लोपामुद्रा, अपाला, उर्वशी अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. उपनिषदात गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी, वाचक्नवी या विदुषी महिलांचा उल्लेख करता येईल.
 
 
पुरुषांपेक्षाही स्त्रियांचे सर्वात मोठे स्थान असण्याचे कारण म्हणजे तिचे मातृत्व. कारण, माता निर्माता भवति. सर्वांचे निर्माण करणारी व संस्कार देणारी माता आहे. अनेक महनीय मातांमुळेच समग्र विश्वाला आदर्श नरवीर लाभले. तिच्या ठाई असलेल्या दिव्यतेमुळेच उपनिषदांनी पुरुषांच्या अगोदर ‘मातृदेवो भव’ असे संबोधून तिला सर्वाग्रणी स्थान दिले. मनुस्मृतीत महर्षी मनू महाराज तिचा गौरव करतांना म्हणतात-
 
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते
सर्वास्तत्राफला: क्रिया:॥


म्हणजेच ज्या ठिकाणी, जेथे स्त्रियांचा सर्वदृष्टीने सन्मान, आदर केला जातो, तिथे साक्षात् देवता अर्थात दिव्य गोष्टी रमतात, पण जिथे स्त्रियांचा अवमान व अनादर केला जातो, तेथील सर्व क्रिया निष्फळ ठरतात.विस्तारभयाने या लेखात स्त्रीमहिमा वर्णन करणे अशक्यप्राय आहे. म्हणूनच सदरील वेदमंत्राच्या प्रासंगिक विषयाकडे वळू. या वेदमंत्रात स्त्रीजीवनाचे महात्म्य रेखाटताना तिच्या सहा आभूषणांचे वर्णन केले असून मानवसमाजाच्या प्रगतीसाठी तिला दोन आदेशदेखील देण्यात आले आहेत.
 
नारी म्हणजेच सु+नयन करणारी. आपल्या पती व कुटुंबीयांना उत्तम प्रकारे पुढे नेणारी. सर्वदृष्टीने प्रगती साधणारी ती नारी म्हणजेच नरांची सुनेत्री. ही सर्व पुरुषांना सन्मार्गावर आणणारी ही दिव्य नारी. स्त्री म्हणजे पती व कुटुंबाला सर्व दृष्टीने आच्छादणारी, झाकणारी. स्तृञ् आच्छादने या धातूपासून स्त्री शब्द उत्पन्न झाला आहे. झाकणे, पसरणे, व्यापणे असे त्याचे अर्थ होतात. ज्याप्रमाणे पुष्पलता सर्वत्र पसरते आणि थंडगार छायेने सर्वांना झाकून टाकते, तद्वत स्त्रीदेखील सर्वांवर प्रेम, स्नेह, माया, दया, करुणा, तसेच त्याग, समर्पण या सद्गुणांनी सर्वांना व्यापून टाकते. सर्वांना आपल्या पंखाखाली झाकून घेते. म्हणूनच तिला ‘स्त्री’ असे म्हणतात. स्त्रीचे बाह्य सौंदर्य विविध प्रकारच्या भौतिक आभूषणांनी किंवा दागदागिन्यांनी खुलते व ती आकर्षक ठरते, हे खरे आहे. पण, वेदांनी मात्र तिच्यासाठी साहा आभूषणांचे वरदान दिले आहे. जिच्यामुळे ती आंतरबाह्य शोभून दिसते व तिच्या कीर्तीचा सुगंध हा सर्वदूर पसरला जातो. ती सहा आभूषणे खालील प्रमाणे आहेत-
 
१) मंत्रोक्त स्त्रियांचे पहिले आभूषण म्हणजे इमा: नारी अविधवा:। स्त्रियांनी नेहमी वैधव्यविरहित असावे. ’वि’ म्हणजे वियुक्त आणि धव म्हणजे पती. स्त्रियांनी पतीपासून वियुक्त, वेगळे राहता कामा नये. प्रत्येक कार्यात स्त्रीने सतत पतीसमवेत असावे. तिचे पतीपासूनचे वेगळेपण हे दुःखदायी ठरणारे बनते. ‘पतिपरायणा स्त्रिया’ या स्वप्नातदेखील पतीपासून वेगळ्या होत नाहीत. सुख असो की दुःख, प्रत्येक प्रसंगात स्त्रियांनी आपल्या पतींसोबत राहून साथ दिलेली आहे, हा इतिहास सांगतो. आजकाल पतीच्या निधनानंतर स्त्रियांना ‘विधवा’ म्हटले जाते. पण, वेदांनी पती विद्यमान असूनही जी स्त्री आपसातील वाद-विवाद, कुरबुरी, भांडणे वा अन्य कारणांनी पतीपासून दूर राहते, तिला ‘विधवा’ संबोधले आहे आणि जो पुरुष आपली पत्नी जिवंत असूनही तो पत्नीपासून दूर राहणे पसंत करतो, तो ‘विधुर’ मानला जातो. पती व पत्नी एक दुसर्‍यांचे अभिन्न अंग आहेत. यासाठी कांही झाले तरी अंतर्मनातून प्रेम व स्नेहाचे धागे जोडत दोघांनीही सोबत सोबत राहणे, हेच सर्वदृष्टीने हितकारक ठरते. म्हणून स्त्रियांचे अविधवा असणे, हे तिचे पहिले आभूषण!

२) इमा: नारी: सुपत्नी


विवाहानंतर स्त्री ही पत्नी बनते व पुरुष हा पती होतो. हे नाते केवळ शरीरापुरते मर्यादित असता कामा नये. याकरिता त्या त्या दाम्पत्यांचे जीवन हे मन, आचारविचार, सद्गुण, सुस्वभाव, आदी गोष्टींनी एकरूप असणे गरजेचे आहे. स्त्रियांनी सुपत्नी होण्याचा प्रयत्न करावा, तर पुरुषांनी सुपती बनावे. महर्षी पाणिनी यांनी पत्नी शब्दाची खूपच समर्पक अशी व्याख्या केली आहे. आपल्या अष्टाध्यायी ग्रंथात एका सूत्राच्या माध्यमाने ते म्हणतात ’पत्युर्नो यज्ञसंयोगे।’ यज्ञाला साक्षी मानून जी गृहस्थाश्रमासाठी स्वीकृत झाली आहे, ती पत्नी होय. यज्ञादी कार्यात जिचे मोठे सहकार्य लाभते, जिच्याविना कोणतेही गृहकार्य पूर्ण होऊ शकत नाही ती पत्नी. पत्नी शब्दाच्या अगोदर ‘सु’ हे उपसर्ग लागल्याने पत्नीचा महिमा अधिक विस्तारला आहे. स्त्रियांनी ‘सु’ म्हणजे अतिशय उत्तम सद्गुणांनी परिपूर्ण अशी सुपत्नी होण्याचा प्रयत्न करावा. ज्या घरात आदर्श पत्नी असते, ते घर नेहमी प्रगतिपथावर असते. म्हणूनच स्त्रियांचा सुपत्नी हा दुसरा दागिना.

३) इमा: नारी: अनश्रव:।


‘अश्रू’ या शब्दाचे बहुवचनी रुप ‘अनश्रव:।’ स्त्रियांच्या डोळ्यातून कदापि अश्रुधारा वाहता कामा नयेत. घरामध्ये वादविवाद व काही विपरित घडले, तरी स्त्रिया दु:खी होता कामा नयेत. ज्या घरात स्त्रियांच्या नयनांतून दुःखाचे अश्रू ओघळतात, त्या घरात कधीही सुखशांती नांदणार नाही. म्हणून स्त्रिया या नेहमी ‘अनश्रव:’ असल्या पाहिजेत. अल्पशा कारणामुळे घरातील स्त्रिया दु:खी बनत असतील किंवा त्यांच्या मनात वेदना व पीडा होत असतील आणि त्यांचे पर्यवसान जर स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहण्यात होत असतील, तर समजावे की ते घर हे घर नसून नरकाचे स्थान होत आहे. स्त्रियांच्या डोळ्यातून वाहणारे दुःखाश्रू हे संकटांना निमंत्रण देणारे ठरतात. यासाठी स्त्रिया या नेहमी आनंदी, प्रसन्न व समाधानी कशा राहतील, याची काळजी घरातील पुरुष मंडळींनी व अन्य स्त्रियांनी घेणे, अत्यंत गरजेचे आहे. (क्रमश:)



-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.