आदित्य ठाकरे यांना सत्ताधारी पक्षाच्या द्वेषाची कावीळ!

09 Mar 2023 19:21:57
Aditya Thackeray

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईच्या सुशोभीकरणाची ८२० कामे हाती घेतली आहेत. आदित्य ठाकरे यांना हे दिसत नाही. कारण त्यांना आता कितीही केले तरी सत्ताधारी पक्षाच्या द्वेषाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांचा चष्मा तसाच राहणार, असा टोला भाजपा विधान परिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी लगावला.
 
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस, समाजातील सर्व घटक समाधानी आणि आनंदी आहेत अशी प्रतिक्रिया भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांनी मोठ्या मनाने चांगल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

 
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, मागील कालावधीतील अर्थसंकल्प काढून बघा त्यात किती घोषणा, तरतुदी झाल्या. परंतु ते खर्च केले गेले नाही. या अर्थसंकल्पात शाश्वत शेती, वाढीव भांडवली गुंतवणूक, रोजगार निर्मिती, महिला आदिवासिंसाठी कामं किंवा पर्यावरण पूरक विकासाच्या योजना असतील यावर केवळ घोषणा नाहीत तर भरघोस निधीची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय झाला आहे.

केंद्र सरकारने ६ हजार रुपये दिले असताना राज्य सरकारही ६ हजार रुपये देतेय. हे काय आहे? तरतूद आहे ना? हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार आहेत ना? असा सवाल दरेकरांनी विरोधकांना केला. तसेच कोकणासाठी याआधी कधीच काही केले गेले नव्हते. काजू लागवड विकास योजनेसाठी ६ हजार कोटींच्यावर तरतूद केली आहे. कोकणातील मच्छिमार बांधवांसाठी ५ लाखांचा विमा केला आहे. त्यामुळे भरघोस तरतुदी केल्या आहेत हे विरोधक मान्य करताहेत, त्याच्या अंमलबजावणीची चिंता त्यांनी करू नये असा टोलाही दरेकरांनी लगावला.

महामंडळाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, महामंडळे निर्माण केली नसती तर तोंडाला पाने पुसली अशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिली असती. आता तरतुदिंच्या माध्यमातून महामंडळे पुनर्जिवीत करतोय. काही नवीन महामंडळे करतोय त्याचे कौतुक व्हायला पाहिजे की टीका व्हायला पाहिजे. पहिली महामंडळे फक्त कागदावर होती. परंतु आमच्या महामंडळाना तरतूद झाली आहे. या सरकारने वंचित व पीडित समाजाकडे लक्ष दिले आहे. रामोशी समाजाकडे याआधी लक्ष दिले गेले होते का? राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केले गेले. त्याला तरतूद देण्यात आली आहे. ही सर्व महामंडळे उपेक्षित, वंचित, पीडित समाजाला उत्कर्षांकडे नेणारी आहेत. विरोधकांनी मोठ्या मनाने चांगल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करायला हवे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्प कसा मांडावा याचे आकलन आहे. त्यामुळे ज्या तरतुदी केल्या आहेत तो पैसा नी पैसा खर्च केला जाईल, असेही दरेकर म्हणाले.


मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प आहे या विरोधकांच्या आरोपावर बोलताना दरेकर म्हणाले की, निवडणुका येतात नी जातात. तुम्ही निवडणुकांच्या तोंडावर बजेट चांगला मांडला असता तर त्याचे आम्हीही स्वागत केले असते. विरोधक आमचे कौतुक करणार नाही. अप्रतिम बजेट मांडल्यावरही कुठेही नावं ठेवायला जागा नसताना विरोधक टीका करत आहेत. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस, समाजातील सर्व घटक या अर्थसंकल्पामुळे समाधानी आणि आनंदी आहेत.




Powered By Sangraha 9.0