समाजाला समानतेचे वावडे

08 Mar 2023 14:41:40

womans day 
 
महिला दिनाच्या दिवशी स्त्री पुरुष समानता, स्त्री मुक्ती, महिला सबलीकरण अन सक्षमीकरण हे विषय चावून चोथा झालेले आहेत. आज प्रत्येक स्त्रीलाच नाही तर पुरुषाला समानतेबद्दल काही म्हणणं असतं. पण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या वर्षी समानता ही थीम ठरवण्यात आली. यानिमित्ताने समाज माध्यमांवरून अनेक महिला समानतेच्या नावाखाली महिलांसाठी असाव्या अशा खास सवलती, त्यांचे हक्क आणि अधिकार या विषयावर भाष्य करताना दिसतात. त्यानिमित्ताने..
 
सर्वप्रथम, स्त्रीवादाचे समानतेशी काहीही देणे घेणे नाही हे समजून घ्यायला हवे. समानतेचा विचार करताना स्त्री सोबत पुरुषाचा विचार करायला हवाच. स्त्री पुरुष यांची शारीरिक आणि मानसिक संरचना भिन्न आहेत, हे पहिले स्वीकारायला हवे. भिन्न असूनही परस्परपूरक आहेत ही निसर्गदत्त देणगीच. परंतु जेव्हा दोन गोष्टी भिन्न असतात, तेव्हा समानतेच्या पातळीवर त्यांना आणणं कठीण. पण समानता तर हवीच! अशावेळी वाटाघाटी कशा कराव्या? त्यासाठी स्त्री व पुरुषांची शारीरिक आणि मानसिक संरचना, ठेवण, विचारपद्धती समजून घ्यायला हवी.
 
मॅन द हंटर अँड वूमन द गॅदरर हे पुस्तक आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचले असेलच. घराबाहेरील कामे मुख्यत्वे कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी आवश्यक ते चलन किंवा साधन शोधण्याची जबाबदारी पुरुषाची व उपलब्ध साधनातून चरितार्थ चालवण्याची जबाबदारी स्त्रीची हा कुटुंबव्यवस्था उदयास आल्यापासूनच अलिखित नियमच असल्याने तो अनेकांना परिचित असेल. आज अर्थार्जनाच्या संकल्पना बदलल्यानंतर वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा काही प्रमाणात विस्कळीत झाली. शारीरिक मेहनतीवर आधारलेली अर्थार्जनाची एकच एक पद्धत बदलली आणि कित्येक नव्या पद्धती उदयास आल्या. शहरी भागात बहुतांश ठिकाणी बुद्धीचा वापर करून स्त्री व पुरुष अर्थार्जन करतात. शिक्षणात समानता मिळाली, नोकरीत समानता मिळाली त्यानंतर महिलांसाठी आरक्षण हवे हा मुद्दाच गौण ठरतो. परंतु स्त्रियांची शारीरिक क्षमता पाहता कोणत्या प्रकारचे आरक्षण किती प्रमाणात मागितले जाते याचाही विचार करायला हवा.
 
समानता हवी असल्यास स्त्री, पुरुष आणि समाजात सुसंवाद असणे गरजेचे आहे. समानतेने शक्य नाही सामंजस्याने हा प्रश्न सोडवणे हीच गरज आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0