राज्याच्या विकास दरात ६.८ टक्क्यांची वाढ

-आर्थिक पाहणी अहवालातील अंदाज -आगामी वर्षांचा अर्थसंकल्प आज सादर होणार

    08-Mar-2023
Total Views |
maharashtra-economic-survey-report-released-6-8-percent-growth-expected-in-state-economy

 
मुंबई : राज्याच्या आर्थिक विकास दरात ६.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. ८) विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर केला त्यात उद्योगात ६.१ टक्के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात १०.२ टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यात ९ मार्च रोजी राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला.

 
राज्याच्या विकासाची टक्केवारी
  • ६.८% महाराष्ट्राचा विकास दर


  • ७ % देशाचा विकास दर वाढणार


  • १०.२% कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्र


  • ६.१% उद्योग क्षेत्र


  • ६.४% सेवा क्षेत्र
 
सन २०२२-२३ च्या पुर्वानुमानानुसार दरडोई राज्य उत्पन्न २.४२ लाख रुपये अपेक्षित आहे, तर सन २०२१-२२ मध्ये ते २.१५ लाख रुपये होते.

कडधान्य उत्पादनात वाढ

यंदा २०२२-२३ च्या रब्बी हंगामात ५७.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर परेणी झाली. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्य उत्पादनात ३४ टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. मात्र, तृणधान्ये, तेलबियांच्या उत्पादनात प्रत्येकी १३ टक्के घट धरण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात यंदा राज्याचे स्थूल उत्पन्न ३५ लाख २७ हजार ८४ कोटी अपेक्षित आहे.
 
स्थूल उत्पन्नात १४ टक्के

आर्थिक पाहणी अहवालानुसार सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक १४ टक्के आहे. एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२२ पर्यंत राज्यातील थेट परदेशी गुंतवणूक १०.८९ लाख कोटी असून ती अखिल भारताच्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीच्या २८.५ टक्के होती. नोव्हेंबर २०२२ पर्यंत १०८.६७ लाख रोजगारासह राज्यात एकूण २०.४३ लाख उपक्रम उद्यम नोंदणी अंतर्गत नोंदणीकृत होते. यामध्ये १९.८० लाख सूक्ष्म, ०.५७ लाख लघु व ०.०६ लाख मध्यम उद्योगांचा समावेश आहे.


अहवालातील ठळक मुद्दे
 
 
*शहरी बेरोजगारीचा दर २०१८-१९ मध्ये ६.३ टक्के होता, जो २०२०-२१ मध्ये वाढून ६.५ टक्क्यांपर्यंत झाला.

* ग्रामीण बेरोजगारीचा दर ४.२ टक्के होता, तो २.२ टक्क्यांवर आला आहे.

* राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण २.५ टक्के
 
 
* ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण १८.४ टक्के

* राज्यात नागरी भागात दररोज सरासरी २४,०२३ मे. टन कचरा निर्माण होतो. त्यापैठी ९९.९ टक्के कचरा दारोदारी जाऊन गोळा केला जातो. त्यातील ९९.६ टक्के कचर्‍याचे विलगीकरण


 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.