राहुल गांधींची ‘भारत बदनाम’ यात्रा

माओवाद्यांचा प्रभाव असल्याचा भाजपचा घणाघात

    08-Mar-2023
Total Views |
Rahul Gandhi's 'Bharat Badnaam' Yatra

नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ यात्रेचा अपेक्षित प्रभाव न पडल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आता ‘भारत बदनाम’ यात्रा सुरू केली असल्याची टीका केली जात आहे. राहुल गांधी सध्या इंग्लंडमध्ये असून त्यांनी तेथे वारंवार भारतविरोधात सूर आवळल्याने त्यांचा नेटकर्‍यांकडूनही समाचार घेण्यात येत आहे.“देशातील जनतेने काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सातत्याने नाकारले आहे. त्यामुळे ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करत असून त्यांच्यावर माओवादी आणि अराजकतावाद्यांचा प्रभाव आहे,” असा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी केला.
 
सध्या परदेश दौर्‍यावर असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशात लोकशाही शिल्लक नसल्याचा दावा करण्यास प्रारंभ केला आहे. त्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, “भारतात लोकशाही शिल्लक नसल्याचा दावा राहुल गांधी वारंवार करत असतात. धक्कादायक बाब म्हणजे युरोप आणि अमेरिकेने भारतातील लोकशाही वाचविण्यासाठी हस्तक्षेप करावा, असे राहुल गांधी यांनी लंडन येथे म्हटले आहे. राहुल यांचे हे विधान म्हणजे भारतात परकीय हस्तक्षेप करण्याचे दिलेले निमंत्रण असून ते भारताच्या अधिकृत धोरणाविरोधात आहे. त्यामुळे (पान ६ वर)राहुल गांधींची भारत बदनाम ‘यात्रा’ (पान १ वरुन) राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे उत्तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी द्यावे,” असे आव्हान रविशंकर प्रसाद यांनी दिले आहे.

‘’देशातील जनता स्वीकारत नसल्याने राहुल गांधी हे परदेशात जाऊन रडतात,” असा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगाविला. ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांच्यावर माओवादी आणि अराजकतावाद्यांचा प्रभाव असल्याचा भाजपचा स्पष्ट आरोप आहे. लंडनमधील भाषणामध्ये त्यांनी भारतीय लोकशाही, संसद, जनता, न्यायव्यवस्था आणि सामरिक व्यवस्थेचा अपमान केला आहे. भारतात विरोधी पक्षांना बोलू न देण्याचा आरोप करणार्‍या राहुल गांधी यांनी त्यांच्या यात्रेत अपशब्दांसह शिव्यांचाही मनसोक्त वापर केला होता. त्यामुळे आपल्या मुलाच्या बेजबाबदारणाचे समर्थन सोनिया गांधी करणार का,” असा सवालही रविशंकर प्रसाद यांनी लगाविला आहे.

संघ वाढतोच आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मुस्लीम ब्रदरहूडसोबत करणार्‍या वक्तव्याचाही समाचार रविशंकर प्रसाद यांनी घेतला. ते म्हणाले, “रा. स्व. संघावर राहुल गांधी यांचे पणजोबा पं. नेहरू, त्यांच्या आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी आणि खुद्द राहुल गांधीदेखील वारंवार टीका करत असतात. मात्र, तरीदेखील रा. स्व. संघ वाढतच असून टीका करणार्‍या काँग्रेस पक्षाची वाताहत झाली,” असा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगाविला.


ज्येष्ठ पत्रकाराने राहुल यांना सुनावले खडे बोल


परदेशात सातत्याने भारतविरोधी सूर आवळणार्‍या राहुल गांधी यांना त्यांच्याच हितचिंतक असेलल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने चारचौघात खडे बोल सुनावले आहेत. नेहरु-गांधी परिवाराशी अत्यंत जवळीक असलेले इंग्लंडमधील ज्येष्ठ पत्रकार सुरेश कुमार गुप्ता यांनी राहुल गांधी यांना सल्ला देत भारतविरोधात गरळ न ओकण्याचा सल्ला दिला आहे.“राहुल गांधी तुम्ही पंतप्रधान झालेले मला पाहायला आवडेल, परंतु तुम्ही तुमच्या आजी इंदिरा गांधी यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे होते,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. “तुम्ही केंब्रिजमध्ये भारताची बदनामी केली. तुमच्या आजीही पंतप्रधान पदावरुन पायउतार झाल्यावर ब्रिटनमध्ये येऊन गेल्या आहेत. त्यांना भारताच्या स्थितीविषयी विचारले असताना, त्यांनी भारतविरोधात एक शब्दही उच्चारणार नसल्याचे लंडन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते,” याची आठवण सुरेश कुमार यांनी राहुल गांधी यांना करुन दिली.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.