असहिष्णू पाकिस्तान

    08-Mar-2023   
Total Views |
Freedom of religion is alive and well in India : Salvatore Babones


भारत हा जगातील सगळ्यात विशाल लोकशाहीचा देश. इथे सर्वधर्मसमभाव अत्यंत प्रभावीपणे जीवंत आहे आणि सातत्याने तो संवर्धित होत असतो. भारतामध्ये विविध धर्मीयांना त्यांच्या प्रार्थना करण्यात काहीच समस्या येत नाहीत. उलट काही धर्मीय तर त्यांची प्रार्थना मोठ्या आवाजात सार्वजनिकरित्याही करतात. भारतात लोकशाहीच्या तंत्राने धार्मिक सहिष्णूता वृद्धिंगत होत आहे, असा अहवाल नुकताच ‘क्वाड्रेंट ऑनलाईन’च्या माध्यमातून ‘सिडनी विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक सालवेटोर बबोन्स यांनी जाहीर केला आहे. या अहवालात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की, भारतामध्ये धार्मिक असहिष्णूता आहे आणि अल्पसंख्याक समाजाला त्रास होतो, असे म्हणणारे भारताविरोधात कटकारस्थान रचत असावेत. म्हणजेच त्यांनी पसरवलेल्या भारताविरोधी गृहितकांच्या अहवालामध्ये आता काडीचेही सत्य नाही.
 
बबोन्स यांनी सातत्यपूर्ण अभ्यासाने जाहीर केलेल्या या अहवालामुळे भारताविरोधात गरळ ओकणार्‍या काही जागतिक संघटनांचे तोंड बंद झाले आहे. अमेरिकेत जागतिक स्तरावर धार्मिक सहिष्णूतेचा अभ्यास करणार्‍या संस्था नेहमीच भारताविरोधी अहवाल तयार करून अमेरिकन प्रशासनाला भारताला धार्मिक असहिष्णू देशांच्या यादीत टाकण्यासाठी दबावतंत्राचा वापर करतात. मात्र, अनेकदा या संस्थेने अहवाल देऊनही अमेरिकन प्रशासनाने भारताला असहिष्णू देशांच्या यादीत वर्गीकृत केले नाही. मात्र, पाकिस्तानसह अनेक मुस्लीम देश धार्मिक असहिष्णूतेच्या यादीत कायम आहेत. स्वतःची प्रतीमा ते सुधारू शकत नाही. त्यामुळे तथ्यहिन आरोप करत भारतविरोधी विधाने करण्यात पाकिस्तानची अख्खी हयात गेली आणि परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.असो. तर आजही पाकिस्तानात तुटलेली मंदिरं, भग्न मूर्ती आणि भेदरलेला अल्पसंख्याक हिंदू समाज असला तरी तिथे हिंदूंचे अस्तित्व कायम आहे. जीव आणि इज्जत मुठीत घेऊन इथे अल्पसंख्याक हिंदू समाजाला जगावे लागते.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाज आपल्या परीने हिंदू सण-उत्सव साजरे करत असतो. पण, आपले सण उत्सव साजरे करताना त्यांना किती त्रास सहन करावे लागतात? हे पाकिस्तानमधील एका घटनेने समोर आले. पाकिस्तानमधील लाहोर येथे पंजाब विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील लॉ कॉलेजमधील ३० हिंदू विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर होळी खेळण्याची परवानगी घेतली. विद्यापीठाने परवानगी दिली. कारण, विद्यार्थी त्यांच्या त्यांच्यामध्ये होलिकाउत्सव साजरा करणार होते. परवानगी मिळाल्याने हिंदू विद्यार्थी कॅम्पस बाहेर एकत्रित जमू लागले. मात्र, त्याचवेळी तिथे इस्लामी ‘जमियत तुल्बा’ (आईजेटी) या संघटनेचे विद्यार्थी तिथे मोठ्या प्रमाणात जमले. त्यांनी या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला केला. आपसातच होळी खेळल्याने आपल्यावर हल्ला होईल वगैरे असे या विद्यार्थ्यांना वाटले नव्हते. मात्र, विद्यापीठातील ‘इस्लामी जमियत तुल्बा संघटने’च्या विद्यार्थ्यांनी प्रचंड धार्मिक असहिष्णूता दाखवत दहशत माजवली. हे कमी की काय, तर या विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी या विद्यार्थ्यांना जबदरदस्तीने उचलून विद्यापीठाच्या बाहेर फेकले.

खरे तर विद्यार्थी होळी कॅम्पसबाहेर खेळणार होते. पण, त्यांनी उत्सव सुरू करण्यापूर्वीच अतिशय क्रूरपणे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पण, जागतिक स्तरावर याची कुणी तितक्या गंभीरपणे दखल घेईल, असे वाटत नाही. कारण, पाकिस्तानमध्ये या अशा घटना सामान्य आहेत. दुसरीकडे पाकव्याप्त भूभागमाध्ये तिकडचे पंतप्रधान सरदार तनवीर इलियास यांनी सरकारी आदेश काढला आहे की, येथील शिक्षण संस्थांतील प्रत्येक शिक्षक आणि सह शिक्षिका तसेच विद्यार्थिनींनी ‘हिजाब’ परिधान करणे आवश्यक आहे. भिकेला लागलेला पाकिस्तान तालिबान्यांची अधर्मी धर्मांधता उघड उघड स्वीकारताना दिसत आहे. या सगळ्यांचा उहापोह यासाठी की, पाकिस्तान मीठापीठाला महाग झाला असताना भारत जागतिक पटलावर मोठी शक्ती म्हणून विकसित होत आहे. तसेही भारत आणि पाकिस्तानची तुलनाच होऊ शकत नाही. ‘लड के लिया पाकिस्तान’ म्हणणारे पाकी आता ‘लड के लेंगे आटा दाल’ म्हणत आहेत. ‘जैसी करनी वैसी भरनी!’ पाकिस्तानसारख्या धार्मिक असहिष्णू देशाचा धिक्कार!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.