शाखेवरून जोरदार घमासान...!

08 Mar 2023 15:52:23
Dispute between Shiv Sena-Thackeray group over Shiv Sena branch in Thane


ठाणे
: ठाण्यात पुन्हा एकदा शिवसेना शाखेचा वाद ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील शिवाई नगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून सोमवारी सायंकाळी शिवसेना आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाने लावलेले कुलूप तोडुन शिवसेनेने शाखेचा ताबा घेतल्याने ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी व आरोपांची बरसात करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शिवसेनेच्यावतीने शाखेला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा शाखेचा ताबा घेण्यावरून वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला ’शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा गड असलेल्या ठाण्यातील शिवसेना शाखांवरून घमासान सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खा. राजन विचारे यांनी, शाखा बळकावणार्‍यांना योग्य समज द्यावी. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.तरीही सोमवारी शिवाईनगर येथील शाखेवरून ठिणगी पडली. शिवसेनेने जबरदस्तीने ही शाखा बळकावल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून शाखेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वाद चिघळू नये, यासाठी ठाणे पोलिसांना जमावबंदीचे आदेश लागू करून गर्दी पांगवावी लागली. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.


शाखेचे कुलूप तोडण्याचा अधिकार कुणी दिला; ठाकरे गटाचा आरोप

  • सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेही आदेश नसताना ठाण्यातील शिवसेनेच्या शिवाई नगर या शाखेचे कुलूप तोडण्याचा अधिकार नेमका यांना कुणी दिला, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला.


  • तसेच, जोपर्यंत कुठलाही न्यायालयीन निर्णय होत नाही, तोपर्यंत शिवाई नगर ही शाखा पोलिसांनीच ताब्यात घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने यावेळी करण्यात आली.

ऐन सणासुदीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करू नये


शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघातील शिवाई नगर येथे ही शाखा ३५ वर्ष जुनी असून आ. सरनाईक यांनी शाखेची पुनर्बांधणी केली आहे. येथील चार पैकी एकच नगरसेवक ठाकरे गटात उरला असतानाही शिवाई नगर येथील शाखेला ठाकरे गटाने कुलूप लावले होते. हे कुलूप तोडून शिवसेनेने शाखेवर ताबा मिळवला. ही शाखा शिवसेनेची आहे आणि शिवसेना ही मान्यता आम्हाला मिळाली आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव लावण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या तारखेपर्यंत परवानगी आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी ठाकरे गटाने अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करू नये, असे नरेश म्हस्के म्हणाले.

 
Powered By Sangraha 9.0