महिला आयोगाची दशा आणि दिशा...

    08-Mar-2023
Total Views |
Commission for Women


आता परत कृष्ण, अर्जुन, छ. शिवाजी महाराज होणे नाही. तेव्हा खरी जबाबदारी आज महिला आयोगावर आहे. महिला आयोग म्हटलं की, सगळ्यांना धडकी भरायलापाहि जे. एक अतिशय करारी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची या महाराष्ट्राला नेहमीच गरज असेल, जे नि:पक्षपणे आपली छाप पाडेल व समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवण्यास कटिबद्ध असेल.


स्त्री सशक्त झाली? जागतिक महिला दिनाच्या या आठवड्यात प्रत्येक समाज याच कथा दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण, एकच -
जसं हिंदू धर्मात स्त्रियांबद्दल म्हणतात-

यत्र तु नार्यस्तु पूज्यन्ते
तत्र देवताः रमन्ते।
यत्र तु एताः न पूज्यन्ते तत्र
सर्वाः क्रियाः अफलाः (भवन्ति)।


त्या-त्या समाजाची पातळी तेथील स्त्रियांच्या स्थितीवरून, त्यांना मिळणार्‍या वागणुकीतून समजते. स्त्री सक्षम झाली तरी ती तुमच्या समाजात सुरक्षित आहे का? हा विषय वादविवादाचा ठरतो. कारण, सुरक्षितता ही फक्त कायदे करून निर्माण होत नाही, तर सुरक्षितता येते ती स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून. महाराष्ट्रामध्ये ‘स्त्री शक्ती कायदा’ आणून महाआघाडी सरकारने खूप छाती ठोकण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण, त्या कायद्यांची तीव्रता आणि स्त्रीप्रतीचा दृष्टिकोन बघितल्यास, आपला राज्य महिला आयोग त्यादृष्टीने कार्यशील नक्कीच नाही. समाज जर आजही या कायद्यांना अतिशय मार्मिक समजत असेल, तर ही आयोगासाठी एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. कारण, खरा दोष असतो तो समाजाच्या दृष्टिकोनातच आणि त्यातूनच जोर धरतात त्या अशा समाजघातक वृत्ती. मग आमची शिकलेली कर्तबगार स्त्री बळी पडते, ती फसवणुकीला, अत्याचाराला, बळजबरीला...

गीतेत कृष्ण अर्जुनाला म्हणतात- “द्रौपदी वस्त्रहरण केवळ तुझी वैयक्तिक समस्या नाही, अर्जुन. जो समाज इंद्रप्रस्थची पटराणी, महाराजा द्रुपदची राजकन्या आणि पांडवांची पत्नी द्रौपदीचं वस्त्रहरण होताना बघत राहिला, तो समाज एका साधारण स्त्रीच्या मानसन्मानाची काय रक्षा करेल? द्रौपदी वस्त्रहरण ही एक सामाजिक समस्या आहे, पार्थ.” युग बदलले. स्त्रीसन्मानासाठी लढणारे राम, कृष्ण आणि पांडव जणू काळाच्या दरीत गुडूप झालेत.300 वर्षे गझनी आणि 300 वर्षांच्या मुघलांच्या राज्यात जणू आम्ही आमच्या स्त्रियांसाठी लढणं काय असतं, हे विसरून गेलो आहोत. त्याजागी आली ती म्हणजे स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याची नजर, ज्यातून आल्या ‘पडदा’, ‘सती’सारख्या कुप्रथा. नवरा मेल्यावर गझनी आणि नंतर मुघल सैन्याच्या हाती पडण्यापेक्षा सती जाणे, जोहर करणे, याला स्त्रीसन्मान प्राप्त झाला. आपला जीव वाचवण्यासाठी मग अशा प्रथांना एकप्रकारे मानाचे स्थान प्राप्त झाले. हा आमचा धर्म शिकवत नव्हता, पण त्याला वाचवायला येणार्‍या परिस्थितीने आम्हाला या रूढी शिकवल्या.

जवळजवळ 600 वर्षांच्या स्वार्‍यांमध्ये आम्ही आमचं अस्तित्व, धर्म तर वाचवला, पण आमची मूळं वाचवू शकलो नाहीत. आमच्यादेखत आमचा इतिहास जाळला.आमच्यादेखत आमची विद्यापीठे धुळीत मिळाली.18 आक्रमणे झेलूनही तो पुरीचा द्वारकाधीशच आणि माझा विठ्ठल कसा उभा आहे, तो स्वतःच जाणे. सांगायचं तात्पर्य हेच की, समाजात नेहमी कुणाला तरी जन्म घ्यावा लागला, आपला इतिहास आठवून द्यायला, आदर्श पुढे ठेवायला.गझनी आणि मुघलांच्या या स्त्रीउपभोगी सुलतानीच्या काळात जन्म झाला तो छत्रपती शिवरायांचा आणि स्त्रीच्या अपमानासाठी हिंदू धर्मात शिक्षा असते, हे आम्हाला नव्याने उमजलं. कारणं, ब्रह्मदेवाची शिक्षा, रावणाची शिक्षा, कौरवांची शिक्षा आम्ही विसरलो आणि म्हणूनच आमच्या पुरातन इतिहासाला आम्ही ‘मायथोलॉजी’ (मिथ्स - गैरसमज) अशी परदेशी लेखकांची मते आम्ही आमचं सत्य म्हणून स्वीकारली. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते, तर कदाचित आम्ही हिंदू आहोत, हेसुद्धा विसरून गेलो असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्त्रियांसाठी चळवळ करणार्‍या सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, रमाबाई रानडे होऊन गेल्या. त्यांनी स्त्रियांना सक्षम बनवण्याचा विडाच उचलला होता. पण, त्यांच्या हक्कांसाठी लढणारा आजच्या काळात कोण? हा प्रश्न मला महिला दिनी जास्तच सतावतो.हा समाज स्त्रीकडे कुठल्या भावनेने बघतो, यावर त्या समाजातील स्त्रीची सामाजिक स्थिती समजते. मग त्या समाजात तुम्हाला स्त्रियांच्या तक्रारी, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची दखल लगेच घेतलेली दिसेल. पण, आपण हल्ली काय बघतो?आपल्या राज्यात महिला आयोग मीडिया समोर दिसतात, ते दोन बहिणी एकच नवरा का निवडला म्हणून? किंवा ‘उर्फी’चे कमी कपडे कसे बरोबर आहे म्हणून! खरंच या विषयाने महिला सबलीकरण होणार आहे का? की ही सर्व उठाठेव केवळ प्रसिद्धीसाठी? कारण, वकील म्हणून महिलांसाठी नि:शुल्क काम करत असताना केवळ माननीय उच्च न्यायालयाच्या चौकटीमुळे स्त्री कायदा अंमलबजावणीत किती किचकट झाला आहे, तो आम्हाला रोज दिसतो. अशा परिस्थितीत जिथे पोलीस महिलांच्या विषयांना वाटूनही अनेक बाबतीत स्पर्श करु शकत नाही आणि खरंतर अशा परिस्थितीत महिला आयोगाचं धडाडीचं नेतृत्व अपेक्षित असते.

ज्या राज्याचा महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्येही दहावा क्रमांक लागतो, अशा या राज्यात आपल्याला आयोगाचे जे चर्चेचे विषय दिसतात, ते फार चिंताजनक आहेत.सामाजिक प्रबोधन हे कायद्याच्या माध्यमातून आणि धडाडीच्या नेतृत्वातून झाले पाहिजे. आयोगाकडे आलेला विषय कसा सत्कारणी लावून, त्याचा तत्काळ निकाल कसा लावायचा, याचे सामर्थ्य आमच्या आयोगात असले पाहिजे. संपूर्ण राज्यात स्त्रीविषयक कायदे व अशा गुन्ह्यांच्या शिक्षा याची जागृती जनसामान्यांमध्ये झाली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र माझ्या छत्रपतींच्या आदर्शांवर चालला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला सन्मानपूर्वक वागणूक ही मिळालीच पाहिजे.आता परत कृष्ण, अर्जुन, छ. शिवाजी महाराज होणे नाही. तेव्हा खरी जबाबदारी आज महिला आयोगावर आहे. महिला आयोग म्हटलं की, सगळ्यांना धडकी भरायला पाहिजे. एक अतिशय करारी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची या महाराष्ट्राला नेहमीच गरज असेल, जे नि:पक्षपणे आपली छाप पाडेल व समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवण्यास कटिबद्ध असेल. नुकत्याच संपन्न झालेल्या महिला दिनानिमित्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना.-डॉ. क्षितिजा वडतकर

(लेखिका मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत.)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.