सन्मान स्त्रीशक्तीचा

    07-Mar-2023
Total Views |
women's power


मित्रहो, दि. ८ मार्च हा दिवस वैश्विक स्तरावर ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून अमेरिका, युरोप, ब्रिटन, जर्मनी, भारत या देशांमध्ये स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करणे, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना ‘वर्किंग हवर्स’ कमी देणे, वेतनवाढ, नोकरीच्या ठिकाणी महिलांना संरक्षण आदी मागण्यांसाठी विविध महिला संघटनांकडून आंदोलने झाली, मोर्चे निघाले. यातूनच महिलांच्या सन्मानासाठी अन् हक्कांसाठी सर्वानुमते दि. ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरले.


 १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने दि. ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त ‘थीम’ जाहीर केलं जातं. मागील वर्षी थीम होतठ ‘जेंडर इक्वालिटी टुडे ‘फॉर ए सस्टेनेबल टूमारो.’ जागतिक महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या झेंड्यावर पर्लर, हिरवा, पांढरा हे तीन रंग असतात. ‘पर्लर’ हा रंग न्याय व गरिमाचं प्रतीक आहे. पांढरा रंग हा पावित्र्याचं प्रतीक, तर हिरवा रंग हा उमेदीचं प्रतीक आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना लोकहितवादी व आदर्श राजा घडविण्यात आईसाहेब राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी अविश्रांत परिश्रम घेतलं. अर्थातच शिवबाला युद्धनीतीचे प्रशिक्षण देण्यापासून तर राज्याभिषेक करण्यापर्यंत ‘त्या’ आयुष्यभर झटल्या. अशा थोर मां जिजाऊंना जागतिक महिला दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या असामान्य शौर्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई या भारतीय इतिहासात अजरामर झाल्या.


आजच्या महिला दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आठवण होणं क्रमप्राप्तच ठरते. वैधव्याच्या दुःखाने वा पुत्रशोकाने हतबल न होता मोठ्या धैर्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी होळकरांचे तब्बल २८ वर्षे राज्य चालविले. प्रजाहितदक्ष राज्यकर्ती म्हणून रयतेत ओळख असलेल्या अहिल्याबाईंनी सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर यशस्वीपणे होळकरांचा राज्यकारभार चालविला. पुण्यात भिडेंच्या वाड्यात दि. १ जानेवारी, १८४८ रोजी मुलींची शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या सावित्रीबाई फुले या पारतंत्र्याच्या काळातल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हटल्या गेल्या. आज त्यांच्या पुण्याईमुळे २१व्या शतकातल्या ‘सावित्रीच्या लेकी’ या सर्वच क्षेत्रांत आघाडी घेताना दिसत आहेत.

भारतातील प्रत्येक जिल्ह्यात अन् खेड्यापाड्यात परिचित असलेला शालीन चेहरा म्हणजे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या आपल्या स्वकर्तृत्वाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. स्त्री ही प्रत्येक युगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे. म्हणूनच तिचं नाव अग्रभागी घेतलं जातं. उदा. लक्ष्मीनारायण, सीताराम, राधेश्याम! श्री गजाननाची मातोश्री मां पार्वती, प्रभुरामाची मातोश्री माता कौशल्या, श्री हनुमानची माता अंजलीदेवी,भगवान श्रीकृष्णाची मातोश्री देवकी व यशोदा यांच्या संस्कारांमुळे अन् शिकवणीमुळे त्यांच्या सुपुत्रांनी आपले नाव सार्‍या त्रिलोकात अजरामर केलं. ही आहे खरी आईची महिमा! अशा महान देवीमातांना आम्ही सकल हिंदूजन साष्टांग नमन करतो.देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि पहिल्या वनवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यासुद्धा महिलांसाठी आदर्श ठराव्या. तथाकथित रुढीप्रिय-कर्मकांडी समाजाकडून स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध काव्याच्या माध्यमातून वाचा फोडून समाजात जनजागृती करणार्‍या अहिराणी भाषेच्या खानदेशी कवियत्री बहिणाबाई चौधरी यांना महिला दिनानिमित्त अभिवादन!
 
 
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. अशा महान लोकहितवादी युगपुरुषाला जन्म देणार्‍या त्यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर तसेच त्यांना पारिवारिक जीवनात मोलाची साथ देणार्‍या त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर आणि माईसाहेब सविता आंबेडकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही नमन करतो.पुढच्या पिढीतील महिला डॉक्टरांसाठी डॉ.आनंदीबाई जोशी या ‘रोल मॉडेल’ ठरल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या थोर महिलांनी योगदान दिलं, त्यात सरोजिनी नायडू,अरुणा असफ अली, उषा मेहता, मॅडम भिकाजी कामा,कस्तुरबा गांधी, बेगम हजरत महल, कमला नेहरू, अँनी बेझंट, विजया लक्ष्मी पंडित यांचा समावेश आहे. या सर्व शूरवीर महिलांना आजच्या मंगलमय दिनी आमचा त्रिवार मानाचा मुजरा!

जगविख्यात गायिका, स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरमध्ये विविध भाषेत ३० हजारांहून अधिक गीतं गाऊन विश्वविक्रम केला. आज जरी त्या हयात नसल्या, तरी भारतीयांच्या हृदयात त्यांना चिरकाल मानाचं स्थान राहिलं आहे. भारतरत्न लताजींना आमचा त्रिवार मानाचा मुजरा. प्रख्यात गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुनीती चौहान, श्रेया घोषाळ व अन्य नवोदित गायिका ज्यांनी आपल्या सुमधुर गायिकीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले,त्या सर्वांना आमचा सलाम तसेच सिने अभिनेत्री नर्गिस,वहिदा रेहमान,हेमा मालिनी,शबाना आजमी,आशा पारेख,माधुरी दीक्षित आदींनी आजीवन लोकांचे मनोरंजन केलं,याबद्दल त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा! मराठी चित्रपटातील अभिनेत्रींनीदेखील आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अशा सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! राजकीय-सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या कर्तबगार भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात देशाला नावलौकिक मिळवून देणार्‍या मेरी कोम, सायना नेहवाल, राही सरनोबत, सानिया मिर्झा आदी नवोदित क्रीडापटूंना महिला दिनाच्या शुभेच्छा. साहित्य-कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या दुर्गा भागवत, विजया वाड, अरूणा ढेरे, विजया राजाध्यक्ष आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या प्रबळ लेखणीने समाजातील विविध जाती-धर्मातील लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणार्‍या ज्येष्ठ पत्रकार महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.मित्रहो,२१ व्या शतकात भारतीय महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात अग्रेसर होताना दिसत आहेत.त्यांच्या प्रगतीच्या आड येणं आता कोणालाही कदापि शक्य होणे नाही. कारण, त्यांच्या प्रगतीचा आलेख उत्तुंग शिखरावर पोहोचला आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे, हे तिने प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करून दाखविले आहे. मुलींनी खूप खूप शिकावं अन् आपल्या स्वतःचा व राज्यासह देशाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी खारीचा वाटा उचलावा.तमाम सावित्रीच्या लेकींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


 
समाज तभी होगा महान...
जब होगा नारी का सन्मान! 
-रणवीरसिंह राजपूत

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.