ठाणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. नातू रुद्राश कडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धुलीवंदनाचा निमित्ताने ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कुटूंबियांच्या तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवासोबत रंगपंचमीचा सण साजरा केला.
राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागले. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलीवंदनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटूंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस बांधव, सर्व कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत रंग खेळले तसेच त्यांना गोड देखील खाऊ घातले. जनतेचा मुख्यमंत्री हा जनतेमध्ये मिसळून धुळवड साजरी करत असल्याचे पाहुन पोलिसांनी देखील आपणेपणाने रंग लावून घेत त्यांच्यासह रंगपंचमी साजरी केली.
राज्यात कालपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार सर्वसामान्य ठामपणे उभे असून त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, वडील संभाजी शिंदे आणि सर्व पोलीस बांधव तसेच बंगल्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.