हवाईदल आणि नौदल प्रशिक्षण विमान – जहाज खरेदी करारावर स्वाक्षऱ्या

07 Mar 2023 17:48:57
centre-signs-contracts-worth-rs9900-cr-with-hal-lt-for-trainer-aircraft-ships


नवी दिल्ली
: संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) सोबत अनुक्रमे 70 एचटीटी-40 बेसिक ट्रेनर विमाने आणि 3 कॅडेट प्रशिक्षण जहाजे खरेदीसाठी सामंजस्य करारावर नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यावेळी संरक्षण सचिव गिरधर अरमाने, वरिष्ठ लष्करी अधिकारी, एचएएल आणि एल अँड टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारतचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 मार्च 2023 रोजी एचएएलकडून 6,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 70 एचटीटी-40 बेसिक ट्रेनर विमानांच्या खरेदीला मान्यता दिली होती. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने एल अँड टीकडून 3,100 कोटी रुपयांहून अधिक किमतीची 3 प्रशिक्षण जहाजे खरेदी करण्यासाठी मान्यता दिली होती.

एचटीटी-40 ट्रेनर विमान

 
एचटीटी-40 हे टर्बो प्रॉप विमान असून ते सुधारित आणि परिणामकारक प्रशिक्षणासाठी निर्माण करण्यात आले आहे. हे विमान नव्याने समाविष्ट केलेल्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय हवाईदलाच्या मूलभूत प्रशिक्षक विमानांची कमतरता भरून काढेल. खरेदीमध्ये सिम्युलेटरसह संबंधित उपकरणे आणि प्रशिक्षण सहाय्यांचा समावेश असेल. हे स्वदेशी निर्मित असल्याने भारतीय सशस्त्र दलांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी विमान अपग्रेड केले जाऊ शकते. एचटीटी-40 मध्ये जवळपास ६० टक्यांहून टक्के स्वदेशी सामग्री आहे

प्रशिक्षण जहाज

 
महिला कॅडेट्ससह ऑफिसर कॅडेट्सच्या मूलभूत प्रशिक्षणानंतर, भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना समुद्रात प्रशिक्षण देण्यासाठी या जहाजांचा वापर केला जाईल. राजनैतिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने ही जहाजे मैत्रीपूर्ण देशांच्या कॅडेट्सना प्रशिक्षणही देतील. ही जहाजे बचाव कार्य आणि मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणासाठी देखील तैनात केली जाऊ शकतात. चेन्नईतील कट्टुपल्ली येथील एल अँड टी च्या शिपयार्डमध्ये ही जहाजे स्वदेशी पद्धतीने त्यांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे साडेचार वर्षांच्या कालावधीत 22.5 लाख मनुष्यदिवसांचा रोजगार निर्माण होणार आहे.

 


 
Powered By Sangraha 9.0