राजकारणातील गलिच्छ विकृती

07 Mar 2023 21:02:52
Editorial on Uddhav Thackeray's speech in Khed


उद्धव ठाकरेंचे परवाचे खेडमधील भाषण म्हणजे राजकारणातील गलिच्छ विकृती आणखीन किती खालचा थर गाठू शकते, याचेच एक ज्वलंत उदाहरण. कारण, आधी काँग्रेस, नंतर भाजप आणि आता शिंदेंच्या शिवसेनेवर अश्लाघ्य शब्दांत आगपाखड करणार्‍या उद्विग्न उद्धव ठाकरेंच्या हाती आता उरले आहेत ते फक्त टोमण्यांचेच धुपाटणे!


भुरटे, चोर, गद्दार, तोतया, ढेकूण यांसारख्या गलिच्छ शाब्दिक टोमण्यांची परंपरा आपल्या खेडच्या भाषणांत उद्धव ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे कायम ठेवलीच. ते म्हणतात ना, आपली एखादी लाडकी वस्तू हरवली की एकतर माणूस कमालीचा शांत तरी होतो किंवा वेडापिसा तरी. ठाकरेेही सध्या असेच बावचळलेले. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमावल्यापासून ठाकरेंची उरलीसुरली झोपही उडाली. म्हणून शिंदेंच्या सरकार स्थापनेनंतर आठ महिने उलटले तरी ठाकरे अद्याप राजकीय दिशा चाचपडताना दिसतात. त्यातूनच मग मनात साचलेली अशी उद्वेगाची घाण जाहीर सभांतून फक्त आणि फक्त शाब्दिक प्रदूषणच करते. सार्वजनिक भाषणात भाषेची ही असली पातळी, इतका खालचा स्तर असेल, तर खासगीत ठाकरेंच्या तोंडून काय स्तुतिसुमनांचा वर्षाव होत असेल, याची तर कल्पनाच न केलेली बरी! बाळासाहेब ठाकरे यांची भाषणशैली, विरोधकांचा समाचार घेण्याची पद्धत ही जहाल, शिवराळ होतीच.
 
बाळासाहेबांनी त्यांचा तो रुबाब आपल्या भाषणांतून, कुंचल्यातून, शब्दांतून अगदी वेशभूषेतूनही जनतेसमोर उत्कटपणे मांडला. त्यांनी चार शिव्या हासडल्या, तरी ते कधीही अश्लील भासले नाहीत. याउलट गत तोळमासा असलेल्या उद्धव ठाकरेंची. ना व्यक्तिमत्त्वात कुठला रुबाब, त्यात उसना जहालपणा आणि फक्त अश्लील टोमणेयुक्त शेरेबाजी! हा मनुष्य वांद्य्राच्या सुसंस्कृत कलानगरात राहतो की बकाल वस्त्यांत, असा प्रश्न यांचे दुर्गंधीयुक्त शब्द ऐकले की अख्ख्या महाराष्ट्राला पडावा. त्यामुळे शिवसेना आपल्या हातून कायमची निसटली हा राजकीय, मानसिक धक्काच ठाकरेंना अद्याप पचवता आलेला नाही. म्हणूनच दुर्देवाने आता इतक्या महिन्यांनंतरही अख्खा महाराष्ट्र पिंजून नव्याने पक्षबांधणी करण्यापेक्षा, शिंदेंना ‘मिंधे’ हिणवत त्यांची पिसे ओरबाडण्यापुरतेच ठाकरेंचे राजकारण गुरफटलेले!

खरंतर काही दिवसांपूर्वी ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ आणि ‘कोल्हा काकडीला राजी’ या आमच्या अग्रलेखांतून आम्ही उद्धव ठाकरेंच्या कोल्हेकुईचा अचूक शब्दांत समाचार घेतला होताच. पण, त्यांचा खेडच्या सभेतील होळीपूर्वीचा शिमगा पाहून, ते आतून-बाहेरुन किती हताश आणि पराकोटीचे पराभूत झाले आहेत, त्याचीच प्रचिती यावी. भाजपसोबत असताना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी अशीच सडकून केली. नंतर भाजपशी बिनसल्यापासून मोदी-शाह म्हणजे अफझलखानाची फौज म्हणेपर्यंत ठाकरेंची मजल गेली. ज्या फडणवीसांनी आता ठाकरेंचे राजकीय वजनच कायमचे संपविले, त्या फडणवीसांची वजनावरुन संभावना करणारेही हेच ठाकरे. हे सगळे तर म्हणा बाहेरचे, पण ठाकरेंनी आपल्या रक्ताच्या नात्यांची अब्रूही अशीच वेळोवेळी वेशीवर टांगली. चुलत भाऊ राज ठाकरेंनाही घरभेदी, पाठीत खंजीर खुपसणारा म्हणून भर सभांमधून कुत्सितपणे अपमानित केले. आणि आता ठाकरेंच्या टोमणातोफा शिंदे आणि गटावर उठसूठ आसूड ओढताना दिसतात. त्यामुळे आपल्या राजकीय चुकांमधून शिकण्यापेक्षा इतरांवरच कायम उद्धव ठाकरेंनी शिव्यांची लाखोली वाहण्यातच धन्यता मानली. खेडमधील त्यांची सभाही त्याला अपवाद कशी ठरेल म्हणा!

खेडच्या सभेत समोर बसलेल्या जनतेत आता ठाकरेंना एकाएकी बाळासाहेबांसारखे जगदंबेचे रुप प्रथमच दिसले. सभेतली कोकणी माणसं एकाएकी ‘देवमाणूस’ झाली. पण, या कोकणी माणसाला ‘निसर्ग’, ‘तोक्ते’ चक्रीवादळानंतर ठाकरे मुख्यमंत्री असताना किती मदत मिळाली? कोकणचा ठाकरेंनी अडीच वर्षांत काय उद्धार केला? नाणारसारख्या कोकणची भाग्यरेषा बदलण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पामध्येही ठाकरेंनी आंदोलनजीवींच्या जीवावर खोडा का घातला? यांसारख्या विकासाच्या, जनहिताच्या मुद्द्यांवर मात्र ठाकरे चीडिचूप. याउलट ‘मी अडीच वर्षे घरात बसून महाराष्ट्र चालवला’ म्हणून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटणारे ठाकरे अजूनही आत्मस्तुतीत बुडालेले. खरंतर हाताशी काहीच मुद्दे नसले की, माणूस आपल्या राजकीय भाषणाबाजीत पुरता भरकटत जातो. आपण काय बोलतोय, याचे तो भानच हरपून बसतो. म्हणूनच निवडणूक आयोगाचा, शिंदेंचा बाप काढण्यापासून ते स्वातंत्र्यलढ्यातील भाजपचे योगदान काय, यांसारखे फुटकळ प्रश्न उपस्थित करुन ठाकरेंनी त्यांचा राजकीय बुद्ध्यांकच मुळी किती कमकुवत आहे, याचाच परिचय पुनश्च करुन दिला.

यापूर्वीही देश पातळीवर कित्येक राजकीय पक्षांत उभीआडवी फूट पडली. कित्येक नेत्यांनी पक्षांतरं करुन नवीन राजकीय वाट चोखाळली. काँग्रेस, भाजप, मनसे असा कोणताही पक्ष त्याला अपवाद नसावा. पण, या प्रत्येक पक्षांतून विविध कारणास्तव माणसं सोडून गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंप्रमाणे कोणत्याही अन्य पक्षप्रमुखाने त्या नेत्यांप्रती इतका द्वेष, इतकी घृणा व्यक्त केली नसावी. पण, म्हणतात ना जशी व्यक्ती तशीच वृत्ती. म्हणूनच ‘तुमच्या हातावर मेरा खान्दान चोर हैं, असे लिहा’ असे अत्यंत खालच्या शब्दांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुनावण्यापर्यंत ठाकरेंची सारखी मजल जाते. शिवाय, मराठी माणूस, हिंदुत्व, स्वातंत्र्यलढा यांसारख्या मुद्द्यांवरुन ठाकरेंनी जनतेची दिशाभूल करण्याचा आता कितीही प्रयत्न केला, तरी ते तोंडावरच आपटतील, हे वेगळे सांगायला नको. अशा पराभूत मानसिकतेच्या नेत्याला देशाचा पंतप्रधान करण्याचा साधा विचार करणार्‍या त्यांच्या अनुयायांची तर कीव करावी तितकी थोडी! म्हणूनच ठाकरे म्हणाले तसे, ‘आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही.’ ते अगदी खरंच! तुमच्याकडे कोणालाही देण्यासारखे काहीही उरलेले नाही! आता तर अजिबात नाही आणि पूर्वीही कधी तुमच्याकडून काही घेण्यासारखे काही नव्हतेच. उद्धव ठाकरेंची दानत असती, माणसांचे मोल वेळीच समजले असते, तर आज शिवसेना शिंदेंची झालीच नसती! पण, आता पक्ष, चिन्हाबरोबर वेळही हातातून वाळूसारखी निसटून गेली. आता मागे उरला तो केवळ असा क्लेषकारक उद्वेग!


Powered By Sangraha 9.0