‘वाडे क्लस्टर योजने’ची पडझड

05 Mar 2023 20:03:29
Wada Cluster Scheme
(प्रातिनिधिक छायाचित्र)

नाशिक ही सुरेख वाड्याची नगरी. आताशा अशा वाड्याचे आयुष्य संपत चालल्याने धोकादायक जुने वाडे उतरवून घेणे आणि तेथील रहिवाशांचे स्थलांतरण आवश्यक झाले आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेला अत्यंत वर्दळीच्या अशोक स्तंभ येथील जुना तीन मजली वाडा नुकताच कोसळला. सुदैवाने यात जीवतहानी झाली नाही. पण जुन्या वाड्यांचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला. शहरात आता धोकादायक वाडा कोसळल्यास मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. मालक आणि भाडेकरुंनी धोकादायक वाडे स्वत:हून न उतरवल्यास पोलीस बंदोबस्तात अशा जीर्ण इमारती उतरवल्या जाणार आहेत. त्याचा खर्चही संबंधितांकडूनच वसूल केला जाणार आहे. गेल्या वर्षभरात नाशिकमध्ये दहा वाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी धोकादायक वाड्यांबद्दल दिलेला निर्णय योग्यच आहे. शहरात सर्वाधिक धोकादायक वाडे नाशिक पश्चिम परिसरात आहेत. जुने नाशिक, पंचवटी येथे धोकादायक वाड्यांची संख्या अधिक आहे. अशा वाड्यासंबंधी महापालिकेतर्फे ‘वाडे पुनर्विकास कस्टर’ योजना आखली. पण ती आजही कागदावरच आहे. वाड्यामध्ये राहणार्‍यांना एकत्र आणून त्यांचा विकास करणे शक्य नसल्याने आजपर्यंत एकाही वाडेमालकांनी क्लस्टरसाठी प्रस्ताव दिलेला नाही. मुळात अशी काही योजना आहे, याचीच मालकांना माहिती नाही. महापालिकाही याबद्दल जागृती करण्यात कमी पडली आहे. पावसाळ्यात धोकादायक वाडे, इमारतींना महापालिकेकडून नोटिसा दिल्या जातात. मात्र, भाडेकरु, वाडेकरी अशा नोटिसांकडे सर्रास दुर्लक्ष करुन जीर्ण वाड्यात राहणे पसंत करुन जीव धोक्यात घालतात. धोकादायक वाडे रिकामे करण्यास भाडेकरु आणि वाडामालक यांच्यातील वाद हे मुख्य कारण. यासह मध्यवस्तीतील स्वस्तातील घर सोडून दूर विस्तारीत वसाहतीमध्ये जाण्यास भाडेकरु तयार नसतात. महापालिका आयुक्तांनी घेतलेला नवा निर्णय कितपत यशस्वी होतो, हे पावसाळ्यापर्यंत समजणार आहे. मात्र ’नेहमीच येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे, पावसाळा आला की धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो, पुन्हा परिस्थिी ’जैसे थे’ हे किती दिवस चालणार..?

 
‘सुंदर’ नारायण मंदिर



नाशिकमध्ये गोदेच्या तीरावरील सुंदर नारायण मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम गेली पाच वर्ष रखडलेले आहे. नावाप्रमाणेच अत्यंत सुंदर स्थापत्य शैलीचा नमुना असलेले हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे. सुरेख काळ्या पाषाणातील मंदिराचे काम विविध कारणांनी रखडले. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये महासंचालनालयामार्फत सुरू करण्यात आले. त्याला आज तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ उलटला. प्रारंभी मंदिरातील मूर्ती शेजारील वाड्यात स्थलांतरित केल्यानंतर मंदिर जीर्णोद्धारास प्रारंभ झाला तेव्हा येथील रोहीत्र, जागा यासह विविध अडचणी उभ्या ठाकल्या. त्यांची सोडवणूक होत नाही तोच ’कोविड’ संकट आले. मंदिर पुनर्बांधकामसाठी अन्य राज्यातून आलेले कारागिर, शिल्पी यांचे त्यामुळे स्थलांतरित झाले. काम पुन्हा रखडले. नंतर कासवगतीने काम सुरू असताना त्यासाठी लागणारा एकसमान पाषाण मिळवताना पुरातत्व विभागाची दमछाक झाली. वास्तविक मंदिराचे प्राचीन पाषाण पूर्णपणे काढून त्याजागी नवे पाषाण लावण्याची गरजच नव्हती. कारण मंदिर भक्कम होते आणि त्याची बांधणी, कलात्मकता अप्रतिमच होती. त्यावर विदेशात करतात, त्याप्रमाणे डागडुजीचा उपाय करता येणे शक्य होते. हे पर्याय सोडून पुरातत्व खात्याने मंदिराचे पूर्वीचे सर्व कलात्मक, कोरीव कातळ चिरे का उतरवले, याचा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. पूर्वीइतके सुरेख, कलात्मक, सुबक आणि रेखीव शिल्पकाम करणारे कारागीर काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार करताना हा विचार पुरातत्त्व खात्याने का केला नाही? मंदिरावर नुकतीच कळसाची स्थापना झाली. तरीही कासव गतीने सुरू असलेल्या मंदिर जीर्णोद्धाराचे नदीकडील काम अद्याप बाकीच आहे. मंदिर लवकरच पूर्णत्वाला येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली. तरीही प्राचीन वास्तुकलेचा सुरेख नमुना असलेल्या मंदिरांचे जतन करुन मूळ ढाँच्याला, कलात्मकतेला धक्का न लावता डागडुजी करणे अधिक योग्य नव्हते काय? आज संपूर्ण मंदिराचे चिरे उतरवून त्यावर नवे कातळशिल्पकाम केले जात आहे. प्राचीन मंदिर वैभवाला नष्ट करुन सुरु असलेले हे नवीनकरण कितपत योग्य...?


-नील कुलकर्णी


Powered By Sangraha 9.0