हिंदुंचे संघटन काळाची गरज!

05 Mar 2023 22:18:08
Swami Narendracharya
 
कल्याण : “धर्माविषयी अभिमान निर्माण करायला संस्कृतीची गरज आहे. हा समुदाय मलंग मुक्तीसाठी आला आहे. त्यासाठी चळवळ आपणच केली पाहिजे. ही चळवळ पुढच्या पिढीसाठी आहे. धर्म टिकला, तर तुम्ही टिकणार आहात. प्रार्थनास्थळे अनेक कामे करत आहेत व ती सध्या सामाजिक कामेही करत आहे. मलंगमुक्ती हे पण समाजाचे देणं फेडण्यासारखेच आहे. हिंदूनी संघटित होण्याची गरज आहे,” असे आवाहन स्वामी नरेंद्रचार्य यांनी केले आहे.

श्री मलंगगड या तीर्थक्षेत्राचे जागरण आणि त्याचा प्रसार व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाकडून श्री मलंगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळी पाडा येथील क्रीडांगणावर रविवारी भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्री मलंग जागरण धर्मसभेला स्वामी नरेंद्रचार्य महाराज, श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष राजा सिंह ठाकूर, तेलंगण, संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हभप अनिकेत महाराज मोरे, आयोजक पराग तेली, शाम पाटील, दिनेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या 40 गावांतील नागरिकांसह, राजकीय प्रतिनिधी या धर्मसभेला आले होते. 50 हजारांपेक्षा अधिक जणांची उपस्थिती या वेळी होती.

नरेंद्राचार्य म्हणाले, “हिंदूनी संघटित होण्याची गरज आहे, तरच देश वाचेल. देशावर राज्य करायचे असेल तर हिंदू संघटनाच्या मागे उभे राहिले पाहिजे. त्यांचा आवाज बुलंद केला पाहिजे. आपल्या ‘व्होट बँक’ची ताकद उभी केली पाहिजे. आपण जातींमध्ये विभागले गेलो आहोत आणि नि:धर्मीचा पुळका आला आहे. पण निधर्मी होऊन जगता येणार नाही. मूठभर येऊन देशावर राज्य करत आहेत. सरकारलाही हिंदू च्या बाजूंनी निर्णय देताना ‘व्होट बँक’ घाबरवत असते. म्हणूनच आपल्या ‘व्होट बँके’ची ताकद उभी करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते, तर आपल्या सर्वांचे इस्लामीकरण झाले असते. परंतु, हिंदू धर्माला गतवैभव नरेंद्र मोदी आणि भाजप मुळे प्राप्त झाले आहे. या राजसत्तेमुळे आम्ही स्वाभिमानाने जगत आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराच्या लढा चांगल्या पद्धतीने दिला आहे. हिंदूंची ‘व्होट बँक’ तुमच्या मागे उभी राहील. काही राजकीय नेते मतदान जवळ आले की, जातीचे राजकारण करतात. जातीमुळे आपली वाट लावली आहे. हिंदू लोक त्यामुळे खिळखिळे होत चाललेले आहोत. आपण नामशेष होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
 
“धर्म एक विचारधारा आहे. अनेकांनी आपले संस्कार लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण, नरेंद्र मोदी ते संस्कार जगासमोर आणत आहे. हिंदू चा अभिमान वाटला पाहिजे. पाश्चात्य देश भारताला हिंदुस्थान म्हणतात, पण काही लोक मतांसाठी इंडिया म्हणतात. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मुळे स्वैराचारी होणार आहोत. धर्म सोडला, तर भरकटणार आहोत. धर्मापासून बाजूला गेला, तर व्यक्ती दानव बनणार आहे. श्रद्घास्थानासाठी संघर्ष करावा लागत आहे. हिंदू आहोत हा अभिमान कमी होत चालला आहे,” असेही ते म्हणाले.

भारत देश वगळता जगाच्या पाठीवर एकही हिंदू राष्ट्र उरलेले नाही. म्हणूनच हिंदू धर्म अडचणीत आहे. हिंदूराष्ट्रामध्ये आमच्या श्रद्धास्थान सोडविण्यासाठी आम्हाला असे जागरण करावे लागत आहे, हीच हिंदूची शोकांतिका आहे, अशी खंतही नरेंद्राचार्य यांनी व्यक्त केली.

हिंदू अभिमानासाठी त्रिसूत्री अवलंबावी


“डोळे विज्ञानवादी असू द्या. मन आध्यात्मिक असू द्या. बुद्धी वास्तववादी असली पाहिजे. यामुळे उत्तम जीवन जगता येईल. विज्ञान माणूस बनविणार नाही. विज्ञानाने क्रांती केली, पण अध्यात्माशिवाय मनःशांती मिळणार नाही. धर्माविषयी अभिमान निर्माण करायला संस्कृती ची गरज आहे. हा समुदाय मलंग मुक्तीसाठी आला आहे. त्यासाठी चळवळ आपणच केली पाहिजे. ही चळवळ पुढच्या पिढीसाठी आहे. धर्म टिकला तर तुम्ही टिकणार आहात. प्रार्थनास्थळे अनेक कामे करत आहे,” असेही ते म्हणाले.


Raja Singh Thakur


‘मलंगगडावर भगवा फडकला पाहिजे’
 
 
राजा सिंह ठाकूर म्हणाले, या पवित्र भूमीवर येऊन गर्व वाटत आहे कारण येथे मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण ती मुक्त करण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदा मलंगगडावर गेले ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी पुन्हा एकदा यावे. मलंगगडावर भगवा फडकला पाहिजे. तुम्ही हिंदूना एक आवाज द्या. लाखोंच्या संख्येने हिंदू येतील. येत्या काळात भारतीयांची संख्या कमी होईल तेव्हा तुम्हाला मारुन बाहेर काढतील. मग तुम्ही कुठे जाणार असा सवाल करीत त्यांनी संघटित व्हा, एकत्र आला तर कुणीही हिंदूंकडे डोळे वर करून पाहणार नाही असे ते म्हणाले.


या सभेत सकल हिंदू समाजाच्या वतीने काही ठराव मंजूर केले असून ते महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री मलंगगड हे देवस्थान व परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, न्यायालयीन प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावावे, स्थानिकांमध्ये श्री मलंगगड परिसरात जण जागरण व्हावे, धर्मदाय आयुक्तांच्या मार्फत ट्रस्टींची नेमणूक करणे किंवा जो पर्यंत न्यायालयीन निर्णय येत नाही तो पर्यंत महाराष्ट्र शासनाने देवस्थान आपल्या ताब्यात घेऊन प्रशासक बसवावे व त्याची देखभाल करावी, देवस्थानात होणार्‍या भ्रष्टाचाराबाबत आयोग नेमून त्या कारभाराची चौकशी करावी, श्री मलंगगड परिसरातील स्थानिक नागरिक सदर ट्रस्टवर ट्रस्टी असावेत, श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्टचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कुठलेही हिंदू परंपरा व रीतिरिवाज खंडीत करू नये, सदर प्रकरणात वक्फ बोर्ड महाराष्ट्र राज्य यांचे हस्तक्षेप थांबवावे, श्री मलंग गडावर झालेली अनधिकृत बांधकामे भुईसपाट करावी, सदर देवस्थानावर रोज तीन वेळा आरती व्हावी, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण बंद व्हावे यासाठी कायदा करावा या व अश्या अन्य विषयांवर ठराव करण्यात आले आहेत. ते शासनाला पाठवण्यात येणार आहेत.

 

 
Powered By Sangraha 9.0