शिवतीर्थावर गरजणार ‘जाणता राजा’

महानाट्याचे होणार सलग सहा प्रयोग

    05-Mar-2023
Total Views |
Janata Raja drama

मुंबई : महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याचे सलग सहा प्रयोग शिवाजी पार्क येथील मैदानावर होणार आहेत. याबाबतची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

राज्यात फडणवीस-शिंदे सरकार आल्यानंतर दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती हे हिंदू सण-उत्सव जल्लोषात साजरे करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेल्या ’जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग मंगळवार १४ मार्च ते रविवार १९ मार्च या कालावधीत रोज सायंकाळी ६:४५ वा. दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित केले आहेत.

जाणता राजा च्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचे प्रेरणादायी महापर्व अनुभवायला शिवतीर्थावर या असे आवाहनही आशिष शेलार यांनी मुंबईकरांना केले आहे.या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील दादर शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, कालिदास नाट्यगृह मुलुंड आणि दामोदर नाट्यगृह परेल आदी ठिकाणी ९ मार्चपासून उपलब्ध असतील. रोज सुमारे १० हजार प्रेक्षकांना हे महानाट्य पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

”महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे पाच मजली भव्य रंगमंचावरील हे ऐतिहासिक महानाट्य असून फिरता रंगमंच हे त्याचे खास आकर्षण आहे. तसेच आकर्षक प्रकाश योजना, याशिवाय, घोडे, बैलगाड्यांचा समावेश असणार आहे. महानाट्यामध्ये २५० हून अधिक कलाकार, नेत्रदीपक आतषबाजी आणि नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध, सुरत छापा, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण या महानाट्यात केले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे विलक्षण प्रेरणादायी आहे म्हणूनच सर्व मुंबईकरांनी शिवचरित्र अनुभवण्यासाठी ‘जाणता राजा’ महानाट्य पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.