इराण चीनच्या छत्रछायेत!

05 Mar 2023 20:08:33
Iranian president China visit

काही दिवसांपूर्वीच इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी चीनच्या तीन दिवसीय दौर्‍यानिमित्त चीनची राजधानी बिजींगमध्ये पोहोचले. त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. पुढील २५ वर्षांतील सहकार्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे, मागील २० वर्षांत प्रथमच इराणच्या राष्ट्रपतींनी चीनचा दौरा केला. त्यामुळे नेमकी अशी काय गरज पडली की इराणच्या राष्ट्रपतींना तब्बल २० वर्षांनंतर चीनचा दौरा करावा लागला, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. अणूकरार संपुष्टात आल्यानंतर इराण आणि अमेरिकेत फारसे सख्य नाही. त्यामुळे इराण चीन दौर्‍यातून अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे.

इराण चीनशी जवळीक साधत आहे व इकडे पाकिस्तान आणि रशिया तर आधीपासूनच चीनचे मित्र आहे. त्यामुळे हे चार देश अमेरिकेविरोधात मोर्चेबांधणी करत असल्याचेही बोलले जात आहे. तसेच, खाडीतील दोन प्रतिस्पर्धी इराण व सौदी अरेबियामध्ये याचे काय परिणाम होतील, हेदेखील पाहावे लागणार आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच चीनने सौदीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. अशात इराणी राष्ट्रपतींच्या चीन दौर्‍यामुळे अमेरिकेबरोबरच भारताचीही डोकेदुखी वाढली आहे. इराण भारताचा प्रमुख सहकारी तर आहेच. परंतु, दोन्ही देशांतील मैत्री ही चीन, पाकिस्तानला शह देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत होती. मात्र, इराणच्या या दौर्‍यामुळे इराणने आपली भूमिका बदलली की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. मुळात इराण-चीनमध्ये जुने राजनैतिक संबंध असून दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात होत असते. काही वर्षांपासून तर हे संबंध आणखी दृढ होत चालले आहे. अणुकराराचा वाद आणि अमेरिकेने घातलेले आर्थिक निर्बंधांमुळे इराण चीनशी जवळीक साधू पाहतो आहे.

आर्थिक निर्बंधांमुळे इराण आंतरराष्ट्रीय बाजारात तेल डॉलरच्या बदल्यात विकू शकत नाही. त्यामुळे इराण जागतिक दरापेक्षा कमी किमतीत चीनला तेल विकतो. अमेरिकेने पूर्णतः एकटे पाडण्याचा भरपूर प्रयत्न केल्याने जागतिक स्तरावर संवादासाठी इराणला सध्या मित्रदेशांची गरज आहे. त्यातच अमेरिका आणि चीनमधील वितुष्टता जगजाहीर असल्याने इराण हा चीनसाठी चांगला पर्याय आहे. या दोन्ही देशांच्या जवळीकतेचा अमेरिकेला फटका बसू शकतो. कारण, दोन्ही देश अमेरिका आणि पश्चिमी देशांच्या प्रभुत्वामुळे नाराज आहे. अमेरिकी निर्बंध अन्यायपूर्ण व अतिरेकी असून जागतिक अशांततेचे प्रमुख कारण असल्याचे दोन्ही देशांचे म्हणणे असून हीच नाराजी आता मैत्रीत रूपांतरित झाली आहे. व्यापार युद्ध, तैवान प्रश्न, युक्रेन युद्ध, अणुकरार, रशियाला साथ अशा अनेक कारणांमुळे दोन्ही देश एकत्र येत अमेरिकेला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. या वादात रशिया इराण आणि चीनच्या बाजूने असून त्यात पाकिस्तानने उडी घेतली, तर पश्चिमी देशांविरोधात हे चारही देश उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा गट तयार झाला तर हिंद-प्रशांत, दक्षिण-प्रशांत आणि मध्य-प्रशांत महासागर या भागात अमेरिकेसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. इराण आणि चीनची मैत्री अमेरिकेसमोर सागरी समस्या निर्माण करू शकतात.

सौदी अरेबियादेखील चीनच्या जवळ जात असून खाडीत चीनचा प्रवेश सुकर होणार आहे. सौदी आणि इराण भले विरोधक असले, तरीही चीन दोघांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. कित्येक दशकांपासून मध्य-पूर्वेत अमेरिकेचा दबदबा असल्याने चीनने अमेरिकेची जागा घेणे वाटते तितकेही सोपे नाही.इराणने चीनच्या गळाभेटी घेतल्याने भारतासमोरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पुढील काळात चीन आणि पाकिस्तान भारताची डोकेदुखी ठरू शकतात. चीनने पाकच्या ग्वादरमध्ये बंदर बांधले तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने इराणच्या चाबहारमध्ये बंदर बांधले. पुढील काळात इराणला चीन आणि पाकचेही समर्थन मिळेल, यात काही शंका नाही. एकीकडे चीन नेहमीच भारताला घेरण्यासाठी अपयशी आटापिटा करत असतो, त्यात आता इराण चीनच्या छत्रछायेखाली गेला, तर भारताला त्यावर वेळीच उपाय शोधणे गरजेचे आहे.



 
Powered By Sangraha 9.0