होळी आणि रंगांचा उत्सव फाल्गुन शुक्ल एकादशी अर्थात रंगभरी एकादशीपासून सुरू होऊन फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमीपर्यंत चालतो. हा जल, अग्नी, रंग आणि भस्माचा उत्सव आहे. या रंगीत उत्सवाच्या अनेक कथा आहेत. काही विष्णूच्या, काही शिवाच्या, काही राधा-कृष्णाच्या, काही शिव-पार्वतीच्या, काही कृष्ण-गोपांच्या आणि काही शिव-भूतगणांच्या!
होलिकादहन
भागवत पुराणाने होलिकादहनाची गोष्ट सांगितली आहे. हिरण्यकश्यपू हा मूलस्थानचा, म्हणजे आजच्या पाकिस्तानमधील मुलतानचा राजा. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता- मला दिवसा किंवा रात्री, शस्त्राने किंवा अस्त्राने, घरात किंवा घराबाहेर, मानवाकडून किंवा प्राण्याकडून मृत्यू येऊ नये. ब्रह्माने ’तथास्तु’ म्हणताच हिरण्यकश्यपू स्वत:ला अमर समजू लागला. त्याला कोणाचेच भय राहिले नाही. कोणाचाही धाक राहिला नाही. मन मानेल तसे वागू लागला. त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र नारदांच्या आशीर्वादाने विष्णूची भक्ती करू लागला. विष्णूला वैरी मानणारा हिरण्यकश्यपू त्याने संतापला. त्याने प्रल्हादाला आधी समजावले, धाक दिला, भीती भरली, तरी प्रल्हाद नारायणाची भक्ती सोडेना. मग हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला ठार मारायचे ठरवले. त्याने अनेक प्रयत्न केले, पण प्रल्हाद सर्व हल्ल्यांतून वाचला. शेवटी हिरण्यकश्यपू राजाने आपली बहीण राजकुमारी होलिका हिच्यावर प्रल्हादाला मारायची जबाबदारी दिली. मी कधीच मारणार नाही, असे समजणारा राजा श्रीमंतीने आणि सत्तेने उन्मत्त झाला होता. तशीच त्याची बहीण होलिका! या उन्मत्त कन्येला अग्नीपासून भय नसल्याने ती स्वत:च्या शक्तीचा गर्व होता. त्या धुंदीत राजकुमारी होलिकेने प्रल्हाद बाळाला मांडीवर बसवून घेतले व अग्नीत प्रवेश केला. पण झाले उलटेच! विष्णूकृपेने दुष्ट होलिका मृत्यू पावली आणि प्रल्हाद मात्र वाचला.
पुढे नरसिंह अवतार घेऊन - विष्णूने दिवसा नाही, रात्री नाही, अशा संध्या समयी; घरात नाही बाहेर नाही असे उंबरठ्यावर; शस्त्र नाही अस्त्र नाही अशा नखांनी; मानव नाही प्राणी नाही अशा नरसिंह रुपात हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त प्रल्हादाने राजवाड्यात नरसिंहाचे मंदिर बांधले. या प्रल्हादपुरी मंदिराचे अवशेष आजही मुलतान येथे पाहायला मिळतात. फाळणीच्या पूर्वी या मंदिरात दरवर्षी मोठ्या आनंदाने होलिकोत्सव साजरा केला जात असे. होलिकोत्सवात दुष्ट वृत्तीच्या होलिकेबरोबर मनातील दुष्ट प्रवृत्तींचे दहन करावे, असा विचार असतो.फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन आणि दुसर्या दिवशी धूलिवंदन केले जाते. त्या दिवशी देवपूजा करून, देवीदेवतांना त्यांच्या आवडीचे रंग लावले जातात. जसे गणपतीला शेंदुरी, कृष्णाला गुलाल, देवीला कुंकुम इत्यादी. त्यानंतर सर्व मुले-मुली एकत्र जमून एकमेकांना रंग लावतात, रंगीत पाणी उडवतात.
कामदहन
सतीच्या मृत्यूनंतर उदास झालेले शंकर ध्यानस्थ बसले होते. इकडे सतीने हिमालय पर्वताची कन्या, पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला. पार्वतीने शिवशंकराला मनोमन वरले होते. शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तिने तपश्चर्या आरंभली. शंकर तर ध्यान लावून बसलेले. त्यांना कशाचाच पत्ता नाही! इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले, कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येलाप्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार. देवांनी कामदेवाला गळ घातली की, शंकराला ध्यानातून जागे कर. कामदेवाने त्याचा उसाचा गोड धनुष्य घेतला, भात्यात पाच प्रकारच्या फुलांचे मदनबाण घेतले आणि कैलासावर पोहोचला. त्याने शंकरावर मदनबाण सोडताच शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणार्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले. हा दिवस होता होळी पौर्णिमेचा. शंकराचा राग उतरल्यावर, कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जीवंत केले. कामदेवाला जिथे रूप प्राप्त मिळाले तो प्रांत ‘कामरूप’ (आसामचे जुने नाव) या नावाने प्रसिद्ध झाला.
दक्षिणेकडे फाल्गुन पौर्णिमेला-‘कामुनी पौर्णिमा’ किंवा ‘काम पौर्णिमा’ पण म्हणतात. तिथे होळीला कामदहन केले जाते. दोन दिवस उत्सव करून खायला गोडधोड केले जाते. दुसरी अशी पण कथा आहे की, कामदेवाने वसंत पंचमीला शंकराला ध्यानातून जागे केले. त्याच दिवशी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले. पुढे महाशिवरात्रीला शिव-पार्वतीचा विवाह झाला. दरम्यान, वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत ४० दिवस कामदेवाच्या पत्नीने रतीने तपश्चर्या केली व शंकराची करुणा भाकली. तेव्हा पौर्णिमेच्या दिवशी शंकराने कामदेवाला पुन्हा जीवन दिले.
हरीचा रंगोत्सव
गर्ग संहितेमध्ये बाळकृष्णाची एक गमतीदार कथा येते. कृष्ण होता काळा-सावळा आणि राधा मात्र गोरीपान. छोटुसा कृष्ण सारखा यशोदेला म्हणे, “मैय्या, राधा बघ कशी गोरी-गोरी पिट्ट आणि मी मात्र पाहा असा काळा काळा कुट्ट आहे. असं का गं मैय्या? सांग ना! मला पण गोरा गोरा कर!” किती यशोदेने त्याला समजावून सांगितले, तरी तो तिच्याकडे तीच तक्रार करे! शेवटी एक दिवस यशोदेने राधेकडे खूप खूप रंग दिले आणि तिला म्हणाली, “राधे, कृष्णाला हे सगळे रंग लाव, म्हणजे मग त्याला त्याचा रंग आवडायला लागेल!” तेव्हा राधेने वेगवेगळ्या फुलांच्या पासून तयार केलेले लाल-केशरी-पिवळा रंग आपल्या तळहातावर घेतले आणि बाळकृष्णाच्या गालांवर छान-छान सुवासिक रंग लावले. मग काय? कित्ती आवडले कृष्णाला ते सगळे रंग, तिथपासून राधा, कृष्ण, गोप, गोपी यांचा रंगोत्सव सुरु झाला.
हराचा रंगोत्सव
तिकडे शंकर ध्यानातून बाहेर आले होते. त्यांचा राग शांत झाला होता. तेव्हा त्यांना पार्वती आपल्याशी विवाह करण्यासाठी तप करत असल्याचे कळले. मग शंकरांनी एका बटूचे रूप घेतले व पार्वतीची परीक्षा घेतली. तिला म्हणाले, “त्या शंकराचे काय घेऊन बसलीस? कधी थंडगार कैलासावर असेल तर कधी स्मशानात भूतगणांच्या बरोबर नृत्य करेल. त्या भस्म लावून फिरणार्या, अनिकेत शंकराशी कशाला लग्न करतेस?” तेव्हा पार्वतीला अतिशय राग आला व त्याला म्हणाली, “मी शंकर सोबत असतील तर कुठेही राहीन.” त्या उत्तराने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विवाह प्रस्तावाला मान्यता दिली. पुढे पार्वतीच्या वडिलांकडे रीतसर मागणी घातली आणि शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर काही दिवस पार्वती माहेरी राहिली.रंगभरी एकादशीच्या दिवशी शंकर भगवान, माता पार्वतीला कैलासावर घेऊन जाण्यासाठी आले. विदाईच्या प्रसंगी देवी, देवता, यक्ष, गंधर्व, मानव सगळेजण आले. शंकर-पार्वतीवर त्यावेळी भक्तांनी अबीर-गुलाल उधळला. हाच तो रंगांनी खेळायचा रंगोत्सव.
फुलोंवाली होली
वृंदावनाच्या बांके बिहारी मंदिरात रंगांची नाही, पाण्याची नाही तर फुलांची होळी खेळली जाते. आधी राधा-कृष्णावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली जाते. त्यानंतर भक्त एकमेकांवर फुलांच्या पाकळ्या उधळतात. ही फुलोंवाली होळी, रंगभरी एकादशीला खेळली जाते.
भस्मवाली होली
रंगभरी एकादशीला यक्ष, गंधर्व, मानव सगळ्यांशी शंकरांनी रंग खेळला. पण, त्या दिवशी त्यांचे गण, भूत, प्रेत, पिशाच्च मात्र येऊ शकले नाहीत. याचे भूत गणांना फार वाईट वाटले. शंकरांच्या हे लक्षात आल्यावर, भक्तवत्सल देव दुसर्या दिवशी भूतगणांना सोबत घेऊन मणिकर्णिका घाटावर गेले. त्यावर महास्मशान अशा मणिकर्णिका घाटावर शंकराने भूतांच्या संगे चिताभस्माने होळी खेळली.आज काशीला द्वादशीच्या दिवशी ‘भस्मवाली होली’ खेळली जाते. माध्याह्नाला भोलेनाथांना भस्म अर्पण करतात, कालिमातेला गुलाल चढवतात. त्यावर चिताभस्माने होळी खेळली जाते. ही पारंपरिक ‘भस्मवाली होली’ पाहायला देशोदेशीचे लोक काशीला येतात. ही अद्भुत, अद्वितीय होळी पाहणार्यांना, खेळणार्यांना स्वत:च्या अलौकिकतेची जाणीव घडते, देहाची नश्वरता लक्षात येते, आणि त्याचवेळी ‘शिवोहम्’चा अनुभव घेता येतो.
एकादशीपासून रंगपंचमीपर्यंत विविध उत्सवांनी फाल्गुन नटतो. आमलकी किंवा रंगभरी एकादशीला फुलांची होळी खेळली जाते, गुलालाची होळी खेळली जाते. द्वादशीला ‘भस्मवाली होली’ खेळली जाते. पौर्णिमेला होलिकादहन अथवा कामदहन केले जाते. अग्नीची किंवा कामदेवाची पूजा केली जाते. कृष्ण प्रतिपदेला धूलिवंदन केले जाते आणि कृष्ण पंचमीला रंगांचा, व रंगीत पाण्याचा एकमेकांवर वर्षाव केला जातो. या दिवशी देव आणि भक्ताच्या मध्ये काही अंतर राहत नाही. मित्रत्वाच्या नात्याने देव - मग तो कृष्ण असो वा शंकर, राधा असो वा पार्वती, भक्ताशी आपलेपणाने रंग खेळतात. या पुराणातील कथा असे सांगतात की, रंग खेळा, धमाल करा, मजा करा, पण आपल्या उत्सवाला, उत्साहाला व रंग खेळण्याला ईश्वराचे अधिष्ठान आहे हे विसरू नका!
-दीपाली पाटवदकर