एक संवाद सीतेच्या सेविकेशी...

04 Mar 2023 19:15:50
Dina Mariam


सातासमुद्रापार अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली एक ज्यू मुलगी. पण, हिंदू धर्माची, भारताची एक अनामिक ओढ का कुणास ठावूक तिला कायम खुणावत असे. हीच ओढ, याचं आकर्षणाचं रुपांतर झालं हिंदू धर्म स्वीकारण्यात. तिने नुसता धर्मच स्वीकारला नाही, तर भगवद्गीता, वेदांचे रीतसर शिक्षणसुद्धा घेतले. एवढंच काय तर अथक ध्यानधारणेतून मागचे तिचे काही जन्मसुद्धा तिला लख्ख आठवतात. अशा या रामायण काळात सीतेची सेविका असल्याचा दावा करणार्‍या डिना मरियम यांच्याशी त्यांच्या पूर्वजन्माची, हिंदू धर्माप्रतीच्या मनस्वी आकर्षणाविषयी साधलेला हा मनमोकळा संवाद...
 
माता सीतेच्या सेविका म्हणून तुमचा एक पूर्वीचा जन्म तुम्हाला आठवतो, असा दावा तुम्ही करता. तेव्हा, नेमक्या त्या काळातल्या कुठल्या आठवणी, अनुभव तुमच्या स्मरणात आहेत?

सीतेबद्दल माझ्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. ती आणि मी एकमेकींच्या खूप जवळ होतो. तिचं आणि रामाचं नातं खूप गोड होतं. आपली पत्नी सीता गरोदर असताना भगवान श्रीराम तिला अशा प्रकारे सोडून देईल का? एवढं प्रेमाचं अतूट नातं असताना कोणता पती आपल्या निराधार पत्नीला अशा अवस्थेत पाहू शकेल? मला वाटते की, रामायण जसे घडले, तसे ते लिहिले गेले नाही. मी सीतेची खास सेविका होते. मीनाक्षी असं माझं त्या जन्मी नाव होतं. सीता जेव्हा पेटीत सापडली तेव्हा ती मुर्च्छावस्थेत होती. तिच्यात जनक बाबांनी प्राणांचे आवाहन केले. तिने विश्वाला प्रेमाचा संदेश दिला. तिला ‘अन्नपूर्णा’ही म्हणतात. अनेक औषधी वनस्पतींपासून ती रुचकर जेवण बनवत असे. सर्वांना खाऊ घालायला तिला आवडायचं. सीता लंकेत गेली तेव्हा मीनाक्षीचा म्हणजे माझा मृत्यू झाला. त्यानंतर मी अनुसूया नावाने नवा जन्मही घेतला.


मागच्या जन्मीच्या या सगळ्या आठवणी तुम्हाला वर्तमानात कशा लक्षात आहेत?यासाठी कोणती विशिष्ट ध्यान पद्धती अथवा साधना करुन तुम्ही तुमचा पूर्व जन्म आठवण्याचा प्रयत्न केला आहे का?


याचे उत्तर एकच म्हणजे क्रिया योग. ही साधना खरंतर माझ्यासाठी अजिबात नवीन नव्हती. जरी मला बालपणात याविषयी काही आठवत नसले तरीही माझे गुरू परमहंस यांच्या फोटोचे पुस्तक मी पाहिले आणि माझ्या गुरूंना मी लगेच ओळखले. मी गेल्या ५० वर्षांपासून क्रिया योग साधना करतेय. या पद्धतीत आपण पाठीच्या कण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. मणक्यात चुंबकीय तत्वे निर्माण करून आपल्या संपूर्ण शरीराला आपल्या मेंदूशी जोडले जाते. त्याआधारे आपल्या अनेक आठवणी जागृत होतात. म्हणूनच सर्व जन्म मला आठवू शकले. सुरुवातीला मला एकच जन्म आठवला. त्यानंतर त्यामागचा. असे माझे अनेक जन्म मला आठवले.
 
तुम्ही मूळच्या ज्यू. तेव्हा, हिंदू धर्म स्वीकारावा असे का वाटले?

 
माझा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. हिंदू धर्माची ओळखही मला नव्हती. परंतु, तरीही या जन्मात माझ्यावर हिंदू परंपरांचा प्रभाव होता. विस्मृतीत गेली असली तरीही कुठूनशी ही संस्कृती मला आकर्षित करत असे. मला जन्मापासूनच मांसाहार फारसा आवडला नाही. मला भारताची एक अनामिक ओढ कायमच खुणावत होती, जी खरंतर माझ्याही लक्षात येत नव्हती. जन्माने मी जरी ज्यू असले तरीही आमच्या घरात फारसे धार्मिक वातावरण नव्हते. त्यामुळे माझ्या समाजाचे, धर्माचे मला अजिबात आकर्षण नव्हते. महाविद्यालयात शिक्षण घेताना मला हिंदू संस्कृतीची ओळख झाली आणि एकामागोमाग एक सलग घटनांची साखळीच तयार झाली. त्यानंतर माझा योगानंद परमहंसांशी संबंध आला. मी साधना करू लागले. मागील ५० वर्षांपासून मी सतत साधना करत आहे आणि या ध्यानाच्या सवयीतूनच मला माझे आधीचे जन्म आठवू लागले. एक जन्म आठवला, मग त्यामागचा, मग त्याच्याही मागचा. असे करत करत माझे दोन जन्म भारतीय संस्कृतीत झाल्याचे मला आठवले. भारतात जेव्हा मुस्लीम आक्रमणे मोठ्या प्रमाणावर होत होती, तेव्हा मी दोन जन्म इथे घेतले होते आणि म्हणूनच माझी पूर्वापार ओढ याच हिंदू संस्कृतीशी असल्याचे माझ्या पूर्वीच लक्षात आले होते.


धर्मांतराशिवाय देखील तुम्ही ध्यानधारणा किंवा भक्ती करूच शकता, असे तुम्हाला तुमच्या गुरूंनी सांगितले, असे तुम्ही म्हणता. मग तरीही तुम्हाला हिंदू धर्म स्वीकारावासा का वाटला?
 
नक्कीच! बरोबर आहे तुझं आणि तेच खरंतर विशेष आहे या धर्माविषयी. माझ्या हातात एक पुस्तक आले, ’एका योग्याची आत्मकथा.’ आणि त्यावरचा परमहंसांचा फोटो पाहिल्या पाहिल्या माझ्या लक्षात आले की, हे माझे गुरू आहेत. हिंदू धर्म इतर धर्मांपेक्षा वेगळा आहे. जरी इतर धर्म आणि हिंदूंमध्ये परस्पर संबंध नसला तरी एक फरक मात्र प्रकर्षाने जाणवतो. इतर धर्मांत त्यांच्या धर्माला जास्त महत्त्व असतं. पण, हिंदू पूर्ण विश्वासाठी प्रार्थना करतात. हा नि:स्वार्थ भाव हिंदू धर्मातच आढळून येतो.

 
तुम्ही केवळ हिंदू धर्म, तशी जीवनपद्धतीच स्वीकारली नाहीत, तर गीता आणि वेद या विषयात तुम्ही पदव्युत्तर शिक्षणसुद्धा घेतले. तेव्हा, त्याविषयी काय सांगाल?

गीता माझ्यासाठी नवीन नव्हतीच कधी. मला पूर्वीपासूनच तिची सवय होती. गीता नेहमीच माझ्यासोबत राहिलीये. गीतेत आयुष्याचं सारच लिहिलंय. हा पुरातन ग्रंथ असला तरीही आजच्या आयुष्याशीसुद्धा तेवढाच निगडित आहे. जे जे जगात आहे, त्या त्या सर्वच घटनांचा सुयोग्य मिलाफ या ग्रंथात पाहायला मिळतो. मी जेव्हा जेव्हा गीता वाचली, तेव्हा तेव्हा एक प्रकारचे असमाधान मनात भरून राहायचे. वेदांचेही तसेच. त्यानंतर मला हिंदू देवदेवता दिसल्या, ज्या सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करणार्‍या आहेत. हिंदूंची हीच खासियत आहे. म्हणूनच ही संस्कृती समृद्ध आहे.
 
‘ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह ऑफ वूमन’ या संस्थेची स्थापना तुम्ही केलीत. त्यामागची भावना आणि एकूणच पार्श्वभूमी काय?

या संस्थेच्या स्थापनेमागचे माझे दोन हेतू होते. एक तर महिलांना अध्यात्मिक वातावरणात घेऊन येणे आणि दुसरे म्हणजे हिंदू व बौद्ध ध्यान पद्धती आणि ध्यान प्रकारांचा प्रचार-प्रसार करणे. म्हणून आम्ही ‘ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह ऑफ वूमन’ची स्थापना केली. बौद्ध धर्माची शिकवण हिंदू संस्कृतीशी काही प्रमाणात मिळतीजुळती आहे. कालांतराने त्यात पुरुषांचाही सहभाग वाढला. त्यानंतर यात स्त्री-पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न आम्ही केला.
 
तुमचे अध्यात्मिक ज्ञान आणि अनुभव पाहता, आजच्या पिढीतील आत्मकेंद्रित, धर्मापासून दुरावत चाललेल्या समाजाला तुम्ही काय संदेश द्याल?


सीतेकडून मला मिळालेला संदेश म्हणजे प्रेम. पृथ्वीसाठी प्रेम, नद्यांसाठी प्रेम, मातीसाठी प्रेम आणि प्राणीमात्रांसाठी, संपूर्ण जगतासाठी प्रेम. प्रेम हीच शक्ती आहे. सर्वांना पुरून उरणारी एकमेव भावना आहे आणि हाच संदेश मी सर्वांना देऊ इच्छिते. प्रेम करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा.
डिना मरियम यांनी आपल्या पूर्वजन्माच्या अनुभवांवर आधारित सीतेच्या आयुष्यावर ’द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता - ऍन एम्पॉवरिंग टेल फॉर अवर टाइम’ हे पुस्तक मूळ इंग्रजी भाषेत लिहिले. ३८८ पानांचे हे पुस्तक ४ भारतीय भाषांत अनुवादित झालेले आहे. मराठी, हिंदी, तेलगू आणि कन्नड या भाषांतून हे पुस्तक ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Powered By Sangraha 9.0