‘स्वा. सावरकर परिक्रमे’ची घोषणा

31 Mar 2023 22:32:16
mangal prabhat lodha

 
मुंबई : राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सुरू झालेला वाद आता काहीसा शमलेला असताना राज्य सरकारच्यावतीने एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. नाशिकच्या भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी ‘थीम पार्क’ आणि संग्रहालय सुरु करण्यासह दि. 21 मे ते 28 मे दरम्यान राज्याचा पर्यटन विभाग आणि ‘विवेक व्यासपीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सप्ताह’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमे’ची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.शुक्रवार, दि. 31 मार्च रोजी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारकडून राबवण्यात येणारे कार्यक्रम आणि सावरकर परिक्रमेची माहिती दिली.


कशी असेल ’सावरकर परिक्रमा’?

“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासह देशभरात सामाजिक सुधारणा, विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविणे आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पाया रचणे यासाठी सावरकरांचे योगदान वादातीत आहे. त्या अनुषंगाने सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या शहरांची निवड करून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहरांमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत आठ दिवस विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत,” अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

या सप्ताहांतर्गत या कालावधीत अभिवादन यात्रा, ‘लिटरेचर फेस्टिव्हल’, गीत वीर विनायक, वीरता पुरस्कार महानाट्य, कौतुक सोहळा आणि कीर्तनसेवा कार्यक्रमांचे आयोजन पर्यटन विभागाकडून केले जाणार आहे. एकूण महत्त्वाच्या पाच ठिकाणांच्या समावेशातून ही परिक्रमा आखण्यात आली आहे.

या शहरांमध्ये होणार कार्यक्रम

रत्नागिरी-सामाजिक समरसतेचे प्रतीक. येथे सावरकरांनी हिंदू समाजाच्या एकतेचा आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पाया घातला. येथे त्यांनी सर्व जातीच्या हिंदूंना मुक्त प्रवेश असलेले पतितपावन मंदिर उभारले आणि मुलींसाठी शाळाही सुरू केली. अंदमाननंतर येथील कारागृहात त्यांनी दोन अडीच वर्षे कारावास आणि 13 वर्षे स्थानबद्धतेची शिक्षा भोगली आहे.


  • नाशिक-त्यांचे जन्मस्थान भगूर आणि नाशिकमध्ये त्यांच्या क्रांतिकारी उपक्रमांची सुरुवात आणि ‘अभिनव भारता’ची स्थापना.
  • सांगली - येथे सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर काही काळ वास्तव्यास होते आणि तेथेच त्यांचे निधन झाले, तेथे त्यांचे स्मारक आहे.
  • पुणे - इथे सावरकर महाविद्यालयीन शिक्षणासाठी होते आणि परदेशी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी परदेशी कपड्यांची होळी केली.


  • मुंबई - आयुष्याच्या शेवटच्या वर्षात ते इथेच राहिले. वैचारिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून.( हे स्थान महत्त्वाचे.) येथेच ‘सावरकर सदन’मध्ये त्यांनी आत्मर्पण केले.

सावरकरांच्या आयुष्यातील याच महत्त्वपूर्ण पाच स्थानांवर सप्ताहाच्या कालावधीत अभिवादन यात्रा, ‘लिटरेचर फेस्टिव्हल’, ‘गीत वीर विनायक वीरता पुरस्कार’, महानाट्य, कौतुक सोहळा आणि कीर्तनसेवा असे कार्यक्रम या काळात संपन्न होणार आहेत. या पाच स्थानी असलेल्या ठिकाणांची परिक्रमा महाराष्ट्रात आलेल्या पर्यटकांना करता येणार.

डोंगरीतील कोठडीचाही होणार उद्धार!

”स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यापूर्वी इंग्रज सरकारने त्यांना मुंबईच्या डोंगरी भागातील एका कारागृहात ठेवले होते. त्याच कोठडीत लोकमान्य बालगंगाधर टिळक हेदेखील वास्तव्यास होते. या ऐतिहासिक कोठडीची सध्या दुरवस्था असून त्याचा विकास करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. या कोठडीचा पुनर्विकास प्रकल्प सरकारने हाती घेतला असून येत्या सहा महिन्यांमध्ये डोंगरीतील स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या कोठडीची उद्धार करण्यात येणार आहे,” अशी माहितीही लोढा यांनी यावेळी दिली.
 
 
 

 
Powered By Sangraha 9.0