ठाण्यात पंधरवड्यात एच ३ एन २ चे २५ रुग्ण

31 Mar 2023 20:50:39
25 patients of H3N2 in Thane

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पंधरवड्यात एच ३ एन २ (इन्फ्लुएन्झा) च्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच इन्फ्लुएन्झाच्या रुग्ण वाढत असल्याने सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या १५ दिवसात इन्फ्लुएन्झाच्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. तेव्हा इन्फ्लुएन्झाची कोणतीही लक्षणे दिसू लागली तर चाचणीच्या निकालाची वाट न पाहता तत्काळ उपचार सुरू करण्याच्या सूचना शहरातील सर्व डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, नागरिकांनीही कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांना याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात. गरज भासल्यास बैठक घ्यावी, माहिती पत्रकांचे वाटप करावे. आरोग्य केंद्रांच्या व्हॉट्सॲप समूहात मार्गदर्शक सूचनांची माहिती द्यावी, तापाचा रुग्ण आल्यानंतर कोणती कार्यवाही करावी याची मार्गदर्शक प्रणाली तयार करुन ती सर्व खाजगी डॉक्टरांना वितरित केली असून जर एखादा रुग्ण अशा लक्षणाचा आढळून आला तर त्वरीत संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


 
Powered By Sangraha 9.0