‘सियावर रामचंद्र की जय’ घोषात श्रीरामजन्मोत्सव उत्साहात संपन्न

30 Mar 2023 15:32:40
shri ram janmotsav
(छायाचित्र :  पार्थ कुलकर्णी )


नाशिक : ‘’कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटलाराम जन्मला ग सखे राम जन्मला...!“


प्रभू सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात गुरुवारी नाशिक श्रीरामनगरीत जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील काळाराम मंदिरासह इतर रामाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या संख्यने गर्दी दिसून आली. तर सायंकाळी नाशिकरोड परिसरात भव्य रथयात्रा, शोभायात्रा काढून राम जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा झाला.प्रभूरामचंद्रांचा पदस्पर्श लाभलेल्या नाशिक नगरीत आठवडाभरापासून जय्यत तयारी सुरु होती. गुढीपाडव्यापासून आकर्षक रोषणाईने संपूर्ण काळाराम मंदिर सजवण्यात आले होते. विविधरंगी लाईट्सद्वारे हा परिसर उजळून निघाला होता. हिंदू बांधवांचे आराध्य दैवत आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम जन्मोत्सव येथील काळाराम मंदिरात पारंपरिक हर्षोल्हास आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. मंदिराच्या दोन्ही बाजूला तसेच सभामंडपात भव्य आणि कलात्मक रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न आणि चैतन्यमयी झाले होते.


shri ram janmotsav

(छायाचित्र : पार्थ कुलकर्णी )


 मुख्य गाभारार्‍यात राम फळांची सुरेख आरास करण्यात आली होती. झंडूच्या फुलांनी संपूर्ण परिसर अत्यंत सुभोभित करण्यात आला. सहस्त्र दीप, फुलांनी दरवळणारा मंदिर परिसर, भक्तांची आवडत्या रामरायाच्या दर्शनाची ओढ आणि अशा भारावलेल्या वातावरणात दुपारी 12 वाजेला ‘श्री रामाचा जयघोषात रामजन्मोत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. काळाराम मंदिर गाभार्‍यात राम, सीता आणि लक्ष्मण यांचे मूर्तीला नवीन वस्त्रे व पारंपरिक अलंकार घालण्यात आले. तसेच संपूर्ण गाभारा फुलांनी सजवण्यात आला होता. यंदाचे पूजेचे मानकरी असलेले समीरबुवा पुजारी यांच्याहस्ते महापूजा व श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला.

जन्मोत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले होते. त्यानंतर साडेपाचला महंत सुधीरदास पुजारी यांच्या हस्ते काकड आरती, सकाळी सातला यंदाचे पूजेचे मानकरी समीरबुवा पुजारी यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर श्रींना नवीन वस्त्रे व पारंपारिक दागिन्यांचा साज केला गेला. तत्पूर्वी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान नंदकुमार जोशी यांचे श्रीराम जन्मावर कीर्तन झाले. तर रात्री आठ वाजता हेमंत पुजारी यांच्या हस्ते शेजारती संपन्न झाली.


रामचंद्र नवमी रथयात्रेचे आज आयोजन

सकल हिंदू समाज नाशिकरोड यांच्यातर्फे रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिधाम मंदिरापासून निघालेल्या रथयात्रेत मोठ्या संख्यने रामभक्तांची गर्दी होती. मुक्तीधाम मंदिरात रात्री महाआरती आणि महाप्रसादाचा संपन्न झाला.

भोसलामध्ये श्रीरामांच्या जीवनावर महारांगोळी


सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भोसला कॅम्पस प्रबोधिनी आवारात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवनावर महारांगोळी काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या.




 
 
Powered By Sangraha 9.0