प्रवास गीत रामायणाचा

30 Mar 2023 16:58:35
 
geet ramayan
 
इसवीसन १९५४ च्या काळात आकाशवाणी माध्यमाने जनमानसावर आले वर्चस्व प्रस्थपित केले होते. त्यावेळी मनोरंजनाच्या फार सुविधा उपलब्ध नसल्याने आकाशवाणी घराघरातील सर्व वयोगटातील लोकांना परिचित होती. यावेळी तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांना समाजप्रबोधन पर कार्यक्रम करायची इच्छा होती. पण त्यात मनोरंजही असावं ही महत्वाची आत त्यांनी घातली. सीताकांत यांचे निकटवर्तीय म्हणजे माडगूळकर. गदिमांनी ही कल्पना तात्काळ उचलून धरली. वाल्मिकी रामायणावर आधारित गीतांचा कार्यक्रम करायचा ठरला.
 
१९३६ साली दत्तात्रय यांच्या घरी एक छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात मोरोपंतांच्या 'एकशेआठ रामायणे' या ग्रंथाचे वाचन झाले. त्यावेलीपासूनच गदिमांच्या डोक्यातील चक्रे सुरु झाली होती. रामायणावर काही लिहावे ही भिजत घातलेली इच्छा होतीच. लाडांच्या कल्पनेने त्याला नवे धुमारे फुटले. लगोलग ५६ गाणी लिहून झाली. ही गीते छंदबद्ध होती म्हणूनच रसिकांच्या मनाचा ताबा घेऊ शकली. या गीतांमध्येही वैविध्य आहेच. राम जन्मापूर्वीपासून ते लव कुशांच्या बालपणापर्यंत च्या काळातील रामाभोवती फिरणाऱ्या घटनांना त्यांनी शब्दबद्ध केले. काही गीते रामाच्या दृष्टिकोनातून लिहिली, काही सीतेच्या काही कौसल्येचा तर कित्येक अयोध्यावासियांचाही. दहा गीते ही रामाच्या तोंडी आहेत, त्या खालोखाल सीतेची आठ, कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन, दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक, यज्ञपुरुष, अयोध्येतील स्त्रिया, आश्रमीय, अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे. सर्व प्रकारचे भाव आपल्याला गीतांमधून जाणवतात. राग, लोभ, द्वेष, मत्सर, भय अशा अनेक. एक बीभत्स ओढत सर्वरसांतील गीते आहेत. याचना, वैफल्य,दुःख, लज्जा, क्रौर्य, उद्वेग, आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट, स्त्री-हट्ट, दुराग्रह, हव्यास, संताप, समर्पण, काळजी, संशय, तक्रार, सूड, कर्तव्य, स्वार्थ, मैत्र्य, कानउघाडणी, विजयोत्सव आणि भक्ती या व अशा कितीतरी शब्दात सांगता येणार नाहीत अशा भावना यातून प्रतीत होतात.
 
ही गीते म्हणजे एक प्रवास आहे. रामाचे हे गीतचरित्रच आहे. एका गाण्यापासून दुसरे गाणे पूर्णपणे वेगळे असते, अगदी, राग, छंद, ताल एवढेच काय गायकाचे वचन आणि भाव सुद्धा. पण तरीही या सर्वच गीतांत एक सुसंबद्धता आहे असे जाणवते. शृंखला. जी एकामागून एक न आळवता उमटत जाते. दशरथ राणीला विचारतो, तू उदास का? त्यानंतर पायसदान, मग रामजन्म हे सर्व सुरूच राहतं. राम सीतेची लंकेत भेट होते, त्या छोट्याश्या प्रसंगावर किती गाणी आहेत, किती यत्ने मी तुला पहिली तू ते मग लोकसाक्ष शुद्धी झाली आणि अचानक भाव बदलतो, गीत ऐकताना आपल्या मनात संताप उत्पन्न होतो. अश्रू, वेदना, ओढ, परिपूर्णता मग संशय त्यालाच जोडून याचना, अगतिकता हे सर्व अनुभवताना भावविभोर व्हायला होतं. पराधीन आहे जागती पुत्र मानवाचा या गीतातून उच्चं कोटीचे तत्वज्ञान सांगितले आहे. कितीही दुःखातून मनुष्याला वर्तमानात खेचून आणण्याचे कसब या शब्दांतून दिसून येतं. दुःख म्हणजे काय? विचारांची अपरिपक्वता. स्वतःला कोषात लपेटून घेतले की आपण आपल्यापलीकडचे पाहू शकत नाही. अशावेळी अत्यंत सौम्य, सांत्वनपर शब्दांत गदिमांनी डोळ्यावरची झापडे उघडली आहेत.
 
कोण तू कुठला राजकुमार या गीतातून शूर्पणखा एकाचवेळी वेगवेगळे भाव व्यक्त करते. सीतानाथावर आपला जीव जडला आहे आणि या भावनेचा प्रांजळ स्वीकार ती करताना दिसते. अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याला पडलेल्या प्रश्नांपासून ते उत्सुकतेपर्यंत सर्वच विचारांना मांडत ती तिचा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवते. तो ठेवताना स्वतःची ओळख त्याला करून देते, त्याच्याबद्दल तिने मांडलेले आडाखे त्याला ऐकवते, तिचं स्वार्थी पण प्रांजळ प्रेम व्यक्त करते आणि तिची त्याच्याबद्दलची लालसा त्याला अत्यंत शृंगारपूर्ण भावनेने सांगत त्याला सहजीवनाविषयी विचारतो होते. गीताच्या सुरुवातीलाच आपलं समर्पण रामाच्या पावलाशी अर्पण करून त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांचं विश्लेषण करत तिला तो का आवडला हे स्पष्ट करते. त्याच्या रक्तवर्ण ओठांचे वर्णन करत एकांतातल रतिसुख हवं ही आपली आकांक्षा अत्यंत लघवी शब्दात सांगत त्याला आव्हान देते.. त्याला प्राणनाथ म्हणून संबोधले, त्याचेस्मरण केल्यावर तात्काळ डोळ्यांसमोर तो प्रकट होतो हे आपल्याच मनातलं गुलाबी गुपित त्याला सांगते.
 
 
संगीताबद्दल काय बोलावे? ऐकताना वाटतं किती सहज आणि सोप्या चाली आहेत. त्यात वेग आहे, संथपणा सुद्धा आहे, परंतु तरी कठीण आहेत. ती कशी गावी बाबूजीच जाणोत. कित्येक गीतांमधील काही पदे मूळ चाल सोडून त्या त्या भावाला अनुसरून वेगळ्या तालात गायली आहेत. ती लगेच अधोरेखित होतात. रुततात, भावतात. सुधीर फडकेंनी गीतांचे प्रथम गायन केले. त्यानंतर कित्येक कार्यक्रम झाले, चाली बदलल्या गेल्या, नव्या गायकांनी नव्या वाद्यवृंदासमवेत गायली परंतु आजही बाबूजींची मूळ गीतेच जास्त ऐकली जातात. विकिपीडियानुसार, गीतरामायणातील आधारभूत रागांची संख्या छत्तीस आहे. त्यातल्या मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, राग भैरवी चार, भीमपलास, मिश्र मांड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन, अशा या २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत. २६ रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुद्ध कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे.
 
गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी भाषा, गुजराती, कानडी, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. गीत रामायण म्हणजे प्रभू श्री रामांना महाराष्ट्राने दिलेली आदरांजलीच आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0