हिमालय पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला

30 Mar 2023 18:27:40
 
Himalaya Pedestrian Bridge
 
 
मुंबई : २०१९ मधील दुर्घटनेनंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल पूर्णतः बंद करण्यात आला होता. परंतु आता सुमारे चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरवार ३० मार्च पासून हा पूल प्रवाशांसाठी सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील भुयारी मार्गात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
 
चार वर्षांपूर्वी दुर्घटना
 
१४ मार्च २०१९ रोजी हिमालय पादचारी पूल कोसळल्या मुळे झालेल्या दुर्घटनेत सात जणांना आपला जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुलाचा ५० हजार पादचाऱ्यांना रोज लाभ होणार असून पुलाच्या बांधकामासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च आला आहे. तर पुलाची लांबी ३३ मीटर आणि रुंदी ४.४ मीटर असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
 
पुलाच्या बांधकामासाठी स्टेनलेस स्टील
 
- मुंबईतील जुने पूल लोखंडापासून तयार करण्यात आले असून मुंबईतील खाऱ्या हवेचा लोखंडावर परिणाम होऊन ते कालांतराने गंजत जातात
 
- त्यामुळे पुलांची वारंवार देखभाल, दुरुस्ती करणे गरजेचे असते
 
- नवीन आराखड्यानुसार हिमालय पादचारी पूल बांधण्यासाठी टिकाऊ स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला
 
- मजबूत आणि टिकाऊ पुलासाठी ओदिशा येथून स्टेनलेस स्टीलचे १२० टनचे ५ गर्डर वापरण्यात आले
 
- किमान ५० वर्षे हे गर्डर टिकून राहण्याचा अंदाज अधिकाऱ्याकडून वर्तवण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0