डॉ. एकनाथ शिंदे...

30 Mar 2023 20:22:51
Eknath Shinde vs sanjay raut


माझ्या पक्षात मला काय स्थान होते, हे विचारा कुणाला पण. वांद्य्राच्या साहेबांना भेटण्याचे भाग्य सगळ्यांनाच मिळत नव्हते. तेव्हा, शंकराच्या पिंडीआधी नंदी तसा मी होतो. केवढे माझे महात्म्य! कोरोना काळात तर ‘मुझको देखोगे जहा तक मुझको पाओगे वहा तक मै ही मैहू मै ही मै था.’ आता काय? डॉक्टर एकनाथ शिंदे? माझे स्वप्न असे अचानक तोडून मोडून टाकणार्‍या आणि मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना ‘डॉक्टर’ पदवी मिळाली. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे बरं का? अगदी रोखठोक आहे. आठवा माझे ते कोरोना काळातले वाक्य. मी म्हणालो होतो की, ‘डॉक्टरांना काय कळते?’ पण, तरीही हा अन्याय आहे. आम्ही इतकी ‘मस्का पॉलिश केली, उठ म्हंटले की उठ, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे’ सारखं वागत राहिलो. लिलावती हॉस्पिटलमध्ये हृदयावर उपचार झाले आणि त्यानंतर काही काळातच असा ताडकन उठून मी लेखही लिहिला आहे. बरं, मी रोखठोक संपादक होतो. मला ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ पण मिळाला होता. तरीपण मुख्यमंत्रिपदासोबतच डॉक्टर कोण तर तेच!खरंतर आम्हाला का सुचले नाही? आमची सत्ता होती अडीच वर्षे, मज्जाच मज्जा होती. ‘सय्या भये कोतवाल’ असेच होते. ‘हम करेसो कायदा’ होता. त्यावेळीच खरंतर डॉक्टर-बिक्टर म्हणवून घ्यायला हवे होते. कुणी म्हंटले नसते तरी म्हणवून घेतले असते. कारण, त्याकाळी अशक्य काही नव्हते. छे, आता परत सत्ता यायचे चिन्ह दिसत नाही. ‘शुभ बोल नार्‍या’ म्हणून सारखं म्हणत असतो, स्वप्न बघत असतो की, हे सरकार पडेल मग आमचे महाविकास सरकार स्थापन होईल. पण, कसलं काय? स्वप्न स्वप्नच राहील असे लवाटते, असे जरी म्हंटले तरीसुद्धा त्यांनी मुख्यमंत्री आणि डॉक्टरही उपाधी लावावी आणि आम्ही? काय म्हणता, ‘हू’चे लोक आमच्या साहेबांकडून मार्गदर्शन घेतात, म्हणजे डॉक्टरापेक्षा आमचे साहेब मोठे आहेत? साहेबांनंतर आम्हीच आहोत, असे आम्ही मानतो. म्हणून आम्हीपण डॉक्टरपेक्षा मोठे आहेात. पण, तरीही त्यांना आता ‘डॉक्टर एकनाथ शिंदे’ म्हणायचे? काय म्हणता ते डॉक्टरच आहेत? सत्तेतली महत्त्वाची पदं उपभोगत अडीच वर्षे घरात आरामात बसून राहणार्‍यांना आणि सुरक्षित ‘एसी’ रूममध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणार्‍यांना त्यांची सत्ता घालवून जनतेच्या दरबारात त्यांना टाचा घासण्याइतके मजबूत करण्याचे उपचार एकनाथ शिंदेंनी केले, त्यामुळे ते डॉक्टर आहेत? डॉ. एकनाथ शिंदे?

जलील, कळले का?


संभाजीनगर किराडपुरामध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला दंगलसृदश्य घटना घडली. यामध्ये पोलिसांची वाहन जाळण्यात आली. या घटनेवर महाविकास आघाडीतल्या झाडून सर्वच नेत्यांनी म्हंटले की आगामी निवडणुकीमध्ये हिंदूंनी भाजपला मतदान करावे आणि मुस्लिमांनी ‘एमआयएम’ला मतदान करावे, यासाठी ही दंगल घडवली. या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर वाटते की, महाविकास आघाडीच्या या नेत्यांना सर्वत्र राजकारण दिसते. त्या घटनेमागचे कारण आणि परिणामांकडे ते दुर्लक्ष करतात. ते विसरतात की, सत्ताधारी पक्ष कधीच विचार करणार नाही की त्यांच्या कारकिर्दीमध्ये दंगल घडावी, शहर विस्कळीत व्हावे आणि त्याचा ठपका त्यांच्यावर यावा. आठवा, मुंबईत १२ बॉम्बस्फोट झाले. मात्र, शरद पवारांनी १३ बॉम्बस्फोटांचा दावा केला होता का? केला? कुणाला तरी वाचवायला म्हणे. असो. किराडपुराच्या घटनेवर विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच सूचना दिली होती की, शहरात दंगल घडवण्याचे कट शिजत आहे. आता असा प्रश्न उपस्थित होतो की, त्यांना याबाबत माहिती होती, तर महाविकास आघाडीचे नेते म्हणून त्यांनी, त्यांच्या पक्षनेत्यांनी ही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी काय काळजी घेतली? की होऊन जाऊ दे, गंमत बघू असा पवित्रा घेतला? दुसरीकडे ‘एमआयएम’ खासदार इम्तियाज जलील किराडपुराच्या राममंदिरात जाऊन म्हणाले की, ”राममंदिर, पुजारी आणि सगळेच सुरक्षित आहेत. जे काही झाले ते राममंदिराबाहेर झाले. तसेच किराडपुरा राममंदिरामध्ये उच्छाद मांडणारे समाजकंटक नशेत होते.” समाजकंटक नशेत होते, तर मग अवघ्या हिंदू समाजाचे आराध्य प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त हे विकृत कृत्य करावे हे त्यांना कसे कळले? ते नशेत होते म्हणून त्यांनी हे विकृत कृत्य केले, असे मानून ते दंगेखोर विशिष्ट धर्मांध नव्हते किंवा धार्मिक विद्वेष माजवण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे मानायचे का?छे ! आता बस झाले. राममंदिराच्या जवळच उत्सवाच्या काळात शहरात दहशत माजवणार्‍यांना शासन झालेच पाहिजे. नशेत होते त्यांना काही कळत नव्हते वगैरे कारण देऊन समाजकंटकांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होणार नाही. इम्तियाज जलील कळले का?


Powered By Sangraha 9.0