दुर्लक्षित घटकांच्या आरोग्यावर ‘मंथन’

30 Mar 2023 21:30:33
Asha Bhatt


समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे ‘मंथन फाऊंडेशन’च्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून काम करणार्‍या आशा भट्ट यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

शालेय जीवनातच मी सामाजिक क्षेत्राकडे ओढले गेले. वयाच्या आठव्या वर्षी धावण्याच्या स्पर्धेत यश मिळाल्यानंतर पुढे सर्वच क्षेत्रांत हमखास बक्षिसे मिळू लागली. मग, त्या क्रीडा असो व बौद्धिक स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धेतही जिल्हास्तरीय बक्षिसाला गवसणी घातली,” अशी आठवणं आशा भट्ट सांगतात. तेथूनच समाजासाठी वेगळे काही तरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, परिस्थितीमुळे त्या वेगळ्या वळणावर येऊन थांबल्या. पण, आपल्या कामाची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. मग काय, आशा यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवले अन् १५ वर्षांपासून त्या बालक, महिला आणि दुर्लक्षित घटकांसाठी झटत आहेत.
 
‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस, कर्वेनगर’ येथून ‘एमएसडब्ल्यू’चे शिक्षण आशा यांनी पूर्ण केले. आशा यांचा स्वभाव तसा शांत. स्पष्टवक्तेपणा व सरळमार्गी स्वभावामुळे कामातही त्या तितक्याच चोख. अभ्यासासोबत इतर उपक्रमांतही सहभागी होत असताना दुर्लक्षित घटकांच्या आरोग्याची, शिक्षणाची जाणीव जवळून झाली. महाविद्यालयात असताना ‘राष्ट्रीय सेवा योजना’, ‘विवेक वाहिनी’, मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक अशा विविध कार्यक्रमांत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असताना स्वतःमधील आत्मविश्वास, धाडस, नेतृत्वगुण विकसित झाले आणि ते या समाजकार्यात कामी आल्याचे त्या सांगतात.

समाजात महिलांना मिळणारे दुय्यम स्थान, दारूने उद्ध्वस्त झालेले संसार व लग्नासाठी दिला जाणारा हुंडा या सर्व घटना आशा अगदी जवळून पाहत होत्या. म्हणूनच मग समाजकार्याचा श्रीगणेशा या कामाच्या माध्यमातून करण्या चात्यांनी निर्धार केला. अनेकवेळा मन हेलावून टाकणारे प्रसंग त्यांना अस्वस्थही करुन गेले. पण, यातून सुरुवातीला विविध सामाजिक विषयांवर त्या भाष्य करायला लागल्या. समाजात जनजागृती व महिलांना समुपदेशनासाठी काही कार्यक्रमही त्यांनी राबविले. पुण्यात सुरु केलेल्या उपक्रमाची व्याप्ती चाकण, भोसरी, पिंपरी-चिंचवड, वाशी, नवी मुंबई अशी वाढतच गेली. मग, या कामाच्या संबंधांतून अनेक संस्था, संघटनांशी आशा जोडल्या गेल्या. त्या माध्यमातून समाजासाठी अधिक झोकून काम करण्याची ऊर्मी मिळाल्याचे आशा सांगतात.

महिलांच्या समस्यांचा अगदी खोलवर जाऊन आशा यांनी अभ्यास केला. २००७ मध्ये शरीरविक्री करणार्‍या महिलांशी चर्चा केल्यानंतर सर्वाधिक आरोग्य आणि इतर समस्या या वर्गाला असल्याचे त्यांना प्रकर्षाने जाणवले. मग या महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी आशा यांनी विविध उपक्रम राबविले. त्याअंतर्गत रेशन, औषधोपचारासाठी पाठपुरावा सुरु केला. या महिलांबरोबरच ट्रकचालक, स्थलांतरित कामगार, ‘एचआयव्ही’ग्रस्त आणि नशा करणारे विद्यार्थी यांच्या आरोग्यासाठीही आशा यांनी पुढाकार घेतला. या सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे व त्यांनी व्यसनांचा त्याग करावा म्हणून आशा विविध पातळीवर प्रयत्नरत होत्या. पुढे या वर्गासाठी काम करणारी एक स्वतंत्र एक संस्था असावी, जेणेकरुन त्यांना अधिक चांगली मदत करता येईल, असा विचार आशा यांच्या मनात आला. मग, त्या विचाराने २०१० मध्ये ‘मंथन’ची स्थापना झाली. या माध्यमातून पुणे जिल्हाच नव्हे, तर प्रसंगी राज्याबाहेर जाऊन त्यांना काम करता आले. समविचारी व्यक्ती एकत्र आल्या व ‘मंथन फाऊंडेशन’चे काम उत्तरोत्तर वाढत गेले.

स्थलांतरित कामगार, वाहनचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या आरोग्य, जीवनशैलीविषयक अनेक अडचणी आशा यांच्या लक्षात आल्या. आरोग्याची हेळसांड, वेळीअवेळी जेवण, अस्वच्छ वातावरण यांसारख्या बाबी आशा यांच्या निदर्शनास आल्या. त्यावर उपाय म्हणून मोफत आरोग्य शिबीर, जनजागृती मोहीम आणि समुपदेशन वर्ग आशा यांनी सुरु केले. गुप्तरोग, ‘एचआयव्ही’ याविषयी संबंधितांना माहिती आणि नेमकी उपचारपद्धती सांगितली. याचबरोबर शिक्षण, महिला व बालविकास व पर्यावरणा विषयक प्रश्नांवरही ‘मंथन’ काम करते.

आशा यांच्या या समाजोन्नतीच्या कार्याची दखल घेऊन खुद्द तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पुरस्काराने गौरविले. तसेच, ’कोविड योद्धा’ म्हणून सत्कार केला. याचबरोबर ’उन्नती फाऊंडेशन’, ‘छत्रपती संभाजी महाराज समिती तुलापूर’, राज्यस्तरीय ‘स्त्री समाजरत्न पुरस्कार’, ‘राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार’, महिला व बाल कल्याण मंत्रालय भारत सरकार, ‘आर्क सोशल वेलफेअर सोसायटी’, ’राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार’, ‘पद्मश्री’ अण्णा हजारे यांच्यातर्फे गौरविण्यात आले. यासह अनेक पुरस्कार मिळाल्याचे आशा भट्ट सांगतात.संस्थेसोबतच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष माहिती सेवा समितीमध्ये त्या कार्यरत असून, ग्राहक संरक्षण, माहिती अधिकार, भ्रष्टाचार, मानवी हक्क अशा विविध सामाजिक विषयांवर त्या कार्यरत आहेत. बालक हक्क कृती समिती सदस्य, चाकण पोलीस ठाण्यामध्ये महिला दक्षता समिती याचबरोबर आशा यांच्या अनेक कामांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आशा भट्ट यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!



-पंकज खोले

 
Powered By Sangraha 9.0