‘टूलकिट’ची साथ, जनतेची पाठ!

03 Mar 2023 20:35:39
 
Rahul Gandhi
 
एकीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन मोदी सरकार आणि भाजपवर टीका करत होते आणि दुसरीकडे ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होत होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘टूलकिट’च्या नादी न लागता पक्षबांधणीकडे लक्ष दिल्यास तेच काँग्रेसच्या हिताचे ठरेल.
 
काही दिवसांपूर्वी अब्जाधीश अराजकतावादी जॉर्ज सोरोस यांनी भारतातील उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक विधान केले होते. ते म्हणजे, “ ‘अदानी’ उद्योगसमूहातील कथित अनियमिततांमुळे भारतामध्ये मोठे आर्थिक संकट कोसळू शकते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर परिणाम झाला असून त्यांनी संसदेत त्याविषयी उत्तर देणे गरजेचे आहे.” अर्थात, सोरोसच्या या वक्तव्यांचा यावेळी भारतातर्फे चोख समाचार घेण्यात आला. परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी सोरोसची संभावना ‘अतिश्रीमंत आणि धोकादायक म्हातारा’ अशी केली आणि सोरोसच्या कोणत्याही कारवायांना भारत भीक घालत नसल्याचेही स्पष्ट केले. सोरोसने यापूर्वीही अशी भारतविरोधी विधान अनेकदा केली आहेत.
 
मात्र, यावेळी त्यांच्या विधानाला चिडचिडेपणाची पार्श्वभूमी होती. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात आणि मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या बरोबर तीन ते चार दिवस अगोदर ‘हिंडेनबर्ग’चा ‘अदानी’ उद्योगसमूहाविषयीचा कथित अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. तो प्रकाशित झाल्यावर राहुल गांधी यांनी ‘बघा, बघा मी सांगत नव्हतो का की मोदी हे अदानीला देश विकत आहेत’ हे साधारणपणे 2015 सालापासूनचे पालूपद सुरू केले. आता राहुल गांधी बोलत आहेत, ते पाहून काँग्रेसप्रणित इकोसिस्टीम राहुल यांच्यापेक्षा दुप्पट आवाजात ओरडू लागली. मात्र, केंद्र सरकारने या सर्वांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने या प्रकरणातील हवाच निघाली. परिणामी, सोरोसला पुढे येऊन आपली चिडचीड व्यक्त करावी लागली. अर्थात, सोरोस असे जाहीरपणे बोलल्यामुळे भारतातील कोण लोक त्याचीच भाषा बोलतात किंवा त्याच्या इशार्‍यावर नाचतात, हे ओळखणे शक्य झाले आहे.
 
हे सर्व आता सांगण्याचे कारण म्हणजे, राहुल गांधी यांनी आपल्या परदेश दौर्‍यात केंब्रिज विद्यापीठात दिलेले ‘प्रेझेंटेशन.’ ‘प्रेझेंटेशन’चे नाव होते ‘लर्निंग टू लिसनिंग.’ हे ‘प्रेझेंटेशन’ त्यांनी ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांसमोर दिले. आता भारतातील विद्यार्थ्यांना प्रभावित करू शकणारे राहुल गांधी परदेशी विद्यार्थ्यांना प्रभावित करत असतील, तर तो दोष सर्वस्वी भारतीय विद्यार्थ्यांचाच असावा. यातील गमतीचा भाग सोडला, तर राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे या ‘प्रेझेंटेशन’मध्ये भारतविरोधी भूमिका मांडल्याचा आरोप करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसमोर त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा, लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, मोदी सरकार लोकशाहीची करत असलेली गळचेपी वगैरे नेहमीचेच मुद्दे मांडले. अर्थात, राहुल यांचे कोणतेही भाषण व्यवस्थित ऐकल्यास ते काँग्रेस पक्षाची आगामी काळातील भूमिकाच मांडत असतात.
 
‘केंब्रिज बिझिनेस स्कूल’च्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “गुप्तचर अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले होते की, त्यांचा फोन रेक़ॉर्ड केला जात आहे. देशातील अनेक विरोधी नेत्यांच्या फोनमध्ये ‘पेगॅसस’ सॉफ्टवेअर वापरून त्यांचे फोन टॅप केले जात आहेत.” त्यामुळे मोदी सरकार हे विरोधी पक्षांवर पाळत ठेवत असल्याचा जुनाच आरोप त्यांनी नव्याने केला आहे. असे फोन टॅप होत असल्याची माहिती राहुल गांधी यांनी गुप्तचर अधिकार्‍यांनी बोलावून दिल्याचाही दावा राहुल गांधी यांनी केला आहे. आता याद्वारे सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढलेले ‘पेगॅसस’ प्रकरणावरून पुढील वर्षभर काँग्रेस पक्ष पुन्हा खोटे आरोप करणार, यात कोणतीही शंका नाही. पुढे राहुल गांधी यांना आपल्या भाषणात त्यांच्यासह अन्य पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हेगारी खटले दाखल केल्याचा आरोप केला आहे. भारतीय लोकशाहीच्या मूळ संरचनेवर म्हणजे संसद, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे धोक्यात असल्याचाही कांगावा त्यांनी केला आहे. भारत म्हणजे राज्यांचा संघ असून आज तीच संघभावना धोक्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
राहुल गांधी यांनी हे मुद्दे मांडण्याविषयी कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. कारण तसे केल्यास काँग्रेस ‘इकोसिस्टीम’ तातडीने तुम्हाला ‘फॅसिस्ट’ ठरवते. मात्र, राहुल गांधी दरवेळी भारतात कसे अराजक पसरले आहे; हे परदेशात जाऊन का सांगतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. देशातील अनेक राजकीय पक्षांचे नेते परदेश दौर्‍यांवर जात असतात, तेथे विविध ठिकाणी संबोधितही करत असतात. मात्र, केवळ राहुल गांधी हेच भारतात अराजक असल्याचे पालुपद का लावतात, याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. कारण, राहुल गांधी यांनी जो मुद्दा केंब्रिजमध्ये मांडला आहे, तोच मुद्दा अराजकतावादी अब्जाधीश जॉर्ज सोरोस भारताविषयी अनेकदा वापरत असतो. सोरोस याने तर भारतामध्ये लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अनेकदा म्हटले आहे. नेमकी तशीच भाषा राहुल गांधींकडून वापरली जात असते.
 
आणि हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. यापूर्वी गेल्या वर्षीही त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित केले होते. यावेळी त्यांच्यासोबत राजदचे तेजस्वी यादव, मनोज झा, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा आणि माकपचे सीताराम येचुरी होते. विद्यापीठातील कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल यांनी पाकिस्तानशी भारताची तुलना केली होती. त्यासोबतच लडाखची स्थिती युक्रेनसारखी असल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी 2018 साली काँग्रेस अध्यक्ष असताना जर्मनीत हॅम्बुर्गमधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ‘इसिस’चे समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या लोकसंख्येस विकास प्रक्रियेपासून दूर ठेवल्यास जगात कोठेही दहशतवादी संघटना तयार होऊ शकतात, असे म्हटले होते. हे सांगताना त्यांनी भारतात मोदी सरकार वनवासी, दलित आणि अल्पसंख्याकांना विकासाच्या प्रक्रियेतून वगळले जात असल्याचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे अमेरिकेत जाऊन देशास हिंदू दहशतवादाचा धोका असल्याचेही ते बरळले होते. राहुल गांधी यांच्या परदेशा दौर्‍यांचा आणखी एक योगयोग म्हणजे त्यांच्या परदेश दौर्‍यांनतर भारतामध्ये एकाएकी हिंसक आंदोलने होतात. त्यामुळे राहुल गांधी परदेशात जाऊन असे काय करतात की, भारतात त्यामुळे हिंसक आंदोलन होतात, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे.
 
एकीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन मोदी सरकार आणि भाजपवर टीका करत होते आणि दुसरीकडे ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होत होता. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये काँग्रेसला कोणतीही आशा आता उरलेली नाही. नागालँडमध्ये काँग्रेस शून्य होती आणि यावेळीही ती शून्यच राहिली आहे. त्रिपुरामध्ये तीन जागा मिळाल्या आहेत, तर मेघालयात 21 वरून पाच अशी घसरण झाली आहे. एकेकाळी ईशान्य भारतामध्ये काँग्रेसला घवघवीत यश प्राप्त होते. मात्र, 2014 नंतर काँग्रेसचा ईशान्य भारतातून सफाया झाला आहे. मोजकी काही राज्ये वगळता काँग्रेस पक्ष पराभूत होत आहे. देशात एकूण 4 हजार, 033 आमदार आहेत, त्यापैकी केवळ 658 आमदार काँग्रेसचे आहेत. गेल्या आठ वर्षांत, काँग्रेसच्या आमदारांची संख्या 24 टक्क्यांवरून 16 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्या तुलनेत आज भाजपचे 35 टक्के म्हणजे 1 हजार, 421 आमदार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘टूलकिट’च्या नादी न लागता पक्षबांधणीकडे लक्ष दिल्यास ते काँग्रेसच्या हिताचे ठरेल!
 
 
Powered By Sangraha 9.0