हिंदुत्व म्हणजे सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या : सरसंघचालक

    29-Mar-2023
Total Views |
 
 Mohanji Bhagwat
 
 
आज श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर सा. ‘विवेक’च्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे कॅबिनेट मंगलप्रभात लोढा, कृष्ण चैतन्य दास इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत या ग्रंथाचे प्रकाशन रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे आज, गुरुवार, दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील हिंदुत्वाचे विविध पैलू उलगडणारी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची दीर्घ मुलाखत...
 
संघ आणि हिंदू समाज यांच्या मागच्या शतकभरातील संबंधाचा विकासक्रम पाहता, त्यात सतत बदल होत गेला आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या संदर्भात हिंदुत्वाची कशी मांडणी करता येईल? हिंदुत्व म्हणजे नेमके काय सांगता येईल?
हिंदू समाज आणि संघ यांच्यात आकाराच्या दृष्टीने अजूनही तफावत आहे. परंतु, मानसिकतेच्या दृष्टीने हे एकरूपच आहेत. त्यामुळे जशी जशी संघाची शक्ती वाढते, तसतसे हिंदू समाजातील अधिकाधिक लोक संघाचे म्हणणे ऐकतात, अधिकाधिक लोक त्याचा विचार करतात आणि अधिकाधिक लोक त्याचा स्वीकार करतात. त्यामुळे जसजशी संघाची शक्ती वाढत जाईल, तसतसे ज्याला आपण ‘हिंदुत्व’ असे म्हणतो, त्याचा एक-एक पैलू उलगडत जाईल. यालाच आपण ‘प्रोग्रेसिव्ह अन्फोल्डमेंट’ असे म्हणतो. 1925 मध्ये सांप्रदायिक दंगे होत असत. त्यामध्ये हिंदू नेहमी मारच खात असत. त्या काळात त्याला हिंदुत्वाची कोणती कल्पना सांगितली, तर तो हिंदुत्वाच्या मूळ गाभ्याकडे कसा जाईल, याचा विचार करून त्या काळात मांडणी करण्यात आली होती. तेव्हा मूळ कल्पना आताही तीच आहे, पण आपण मांडणीत आणखी पुढे पुढे जातो, म्हणजे पुढे आणखी ती विशद करतो.
थोर विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी असे म्हणत की, हिंदुत्व हे स्टेशनरीच्या दुकानासारखे आहे. स्टेशनरीचे दुकान असे असते की, त्यात कागद मिळतो, पेन-पेन्सिल मिळते. पण, या दुकानात स्टेशनरी मात्र मिळत नाही. स्टेशनरी नावाची तेथे काही वस्तू नाही, परंतु तरी ते स्टेशनरीचे दुकान आहे. तसे हिंदू म्हणजे कोणता देव? हिंदू म्हणजे कोणती भाषा? हिंदू म्हणजे कोठे राहणारा? असे काही नाही. पण, कोठेही राहणारा असो, कुठल्याही भाषेत बोलणारा असो, कोणतीही पूजा करणारा अथवा पूजा न करणारा असो, खाणेपिणे, रितीरिवाज यामध्ये कोणतीही वाट चोखाळणारा असो, व्यक्तिगत विचार-तत्त्वज्ञान यामध्ये कोणाच्याही मागे जाणारा असो, तो स्वत:च्या श्रद्धेवर अढळ राहतो, इतरांच्या श्रद्धेचा स्वीकार आणि सन्मान करतो आणि त्यामुळे सगळे जण मिळून-मिसळून राहतात, हे ज्यांचे वैशिष्ट्य आहे, त्यांना ‘हिंदू’ म्हटले पाहिजे.
 
‘हिंदू’ हा शब्द नंतर आला, पण ‘हिंदू’ हा शब्द यायच्या कितीतरी युगांच्या आधीपासून ही परंपरा चालत आली आहे आणि तिला ‘हिंदू’ हे नाव मिळाले आहे. त्यामुळे हिंदू म्हणजे काय? ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु।’ ही पहिली गोष्ट आहे. कारण, हिंदू परंपरेत हिंदू पूर्वजांना आणि ऋषिमुनींना एक सत्य गवसले की, अस्तित्वात एकता आहे. जगात वेगवेगळ्या गोष्टी दिसत असल्या, तरी हा एकतेचाच आविष्कार आहे. तर ती एकता त्यांना सापडली आणि त्यांना असे कळले की, एकता सापडल्यानंतर जीवनात समाधान लाभते. मग सुखासाठी चाललेली दौड थांबते, तसेच कधीही न मिटणारा आनंद मिळतो. सगळे विश्व एकच आहे आणि आपल्याला जे गवसले, ते संपूर्ण विश्वाला दिले पाहिजे, असे त्यांना वाटले, कारण ते भारतभूमीत राहणारे होते. या भारतभूमीच्या सुरक्षित क्षेत्रात आणि ‘सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्’ अशा क्षेत्रात ते राहणारे होते. त्यांचा त्यांनी आपल्या प्रयत्नांनी एक समाज गठीत केला.
 
भद्रमिच्छन्त ऋषय: स्वर्विदस्तपो दीक्षामुपनिषेदुरग्रे।
ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवा उपसंनमन्तु॥
 
विश्वाच्या कल्याणाची इच्छा ठेवणार्‍या ऋषींनी दृढ तप केले, त्यातून राष्ट्राची उत्पत्ती झाली, असे म्हटले जाते. तर जगाला हा ठेवा देणार्‍या समाजाने सर्वप्रथम आपले जीवन तसे घडविले. सगळ्या सृष्टिजीवनाची धारणा ठरविणारी चार तत्त्वे आहेत. जसे, गुरुत्वाकर्षणाचे तत्त्व आयझॅक न्यूटन याने सांगितले, पण त्याच्या अगोदरपासूनते तत्त्व सृष्टीत विद्यमान होते आणि न्यूटन याने ते जगाला सांगितले नसते, तरीसुद्धा ते विद्यमान होतेच की आणि त्याने नसते सांगितले, तरी ते आहेच आणि उद्या नाकारले तरी ते राहणारच! तसे सत्य, करुणा, शुचिता आणि तपस या चार तत्त्वांच्या आधारावरसृष्टिजीवनाची धारणा होत राहिली. सर्व एकच असल्यामुळे आणि ते एक आपल्या बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे त्याचे वर्णन जेव्हा होते, ते मग आपापल्या व्यक्तिगत मर्यादेतून होते. दुसरा एखादा त्याचा अर्थ न समजता विपर्यासही करू शकतो. त्याचे वर्णन वेगळे राहिले. ही विविधता आहे. ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति मे।’ असे असल्यामुळे आपसात भांडायची गरज नाही. आपआपसातही एकजूट राहा, या चार तत्त्वांचे पालन करून राहा, म्हणजे सगळे जण एकोप्याने राहू शकतात. परस्परांच्या बलाचा उपयोग करून परस्परांचे दोष कोणालाही उपद्रवी होणार नाहीत, याची काळजी घेऊन आचरण केल्यास सगळे जण सृष्टीला पुढे घेऊन जाऊ शकतात, असे मानव जीवन शक्य आहे. आपल्या देशामध्ये आचरण करून आपल्या समाजाने फार पूर्वी हे दाखवून दिले आहे. त्यामुळे जगभरातले बाकी लोक जेव्हा एक होण्यासाठी एकरूपता पाहिजे असे समजतात, ते आपल्या देशात आले, तेव्हा त्यांना ही गोष्ट कळेना की येथील जीवनशैलीला नेमके कुठले नाव द्यावे. यांच्या पूजापद्धती अनेक आहेत, भाषा अनेक आहेत, खानपान वेगवेगळे आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला एक भौगोलिक नाव दिले - सिंधू नदी आणि तिच्या परिसरातील क्षेत्रात राहणार्‍यांना त्यांनी ‘हिंदू’ असे संबोधले. त्यामुळे हिंदू असणे म्हणजे हे सर्व आहे.
 
दुसरी महत्त्वाची एक गोष्ट सांगतो आणि ती व्यावहारिक गोष्ट आहे. ती तात्त्विक गोष्ट नाही. म्हणजे ती नसली तरी तो हिंदू असू शकतो, पण ती असली तर तो हिंदू टिकतो. हे जगातल्या प्रत्येक गोष्टीला लागू आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्याकडे शक्ती पाहिजे. एखादी व्यक्ती चांगली आहे म्हणून चांगली असल्यामुळे ती पुढे जात नाही, तर तिच्यामागे शक्ती आवश्यक असते, तर हिंदुत्व म्हणजे सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या एवढेच आहे. यांच्या आधारावर व्यवहार करणारी व्यक्ती सगळ्यांना सोबत घेऊन चालते आणि ती सर्वांचे कल्याण करू इच्छिते. मग त्यात तिचे स्वत:चेही कल्याण आलेच.
 
याच व्यवहाराच्या आधारावर हिंदू समाज वर्षानुवर्षे वाटचाल करीत आलेला आहे. या व्यवहाराच्या आधारावरयेथे एकजूट उभी राहिली, संघटित शक्ती उभी राहिली आणि ती शक्तीशीलवान असल्यामुळे जगाला उपकारकच ठरली. ही जी सगळी परंपरा आहे, त्याला आज ‘हिंदुत्व’ असे म्हणतात. पण, त्याच्या मुळाशी ही चार तत्त्वे आहेत.
 
या चार तत्त्वांच्या आधारे हिंदुत्वाची संकल्पना मांडत असताना आज आपण जेव्हा जगात पाहतो, तेव्हा आध्यात्मिक हिंदुत्व, सामाजिक हिंदुत्व, राजकीय हिंदुत्व, धार्मिक हिंदुत्व अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये हिंदुत्व मांडले जाते. हे योग्य आहे का?
वीज म्हटली, तर वीजच आहे. ते दुसरे काही नाही. पण, या खोलीमध्ये दिवा आहे, पंखा आहे, एसी आहे... या सर्वांतही वीज आहे. सामान्य लोक हे अ‍ॅप्लिकेशन पाहतात. पण मूळ वीज काय आहे? तर या सर्वांना चालविणारी ती वीज आहे. तसे हिंदुत्व लक्षात ठेवले की बस्स! आध्यात्मिक हिंदुत्व हे अ‍ॅप्लिकेशन आहे. तो आध्यात्मिक क्षेत्राचा हिंदुत्वाचा आविष्कार आहे. आर्थिक क्षेत्रातील विशिष्ट विचार हासुद्धा त्याच तत्त्वांचा आविष्कार आहे. उदा. जर आपण एक तत्त्व घेतले की, ‘देअर इज स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स’ किंवा ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!’ मग आपण अर्थकारणाचा विचार करू, तर तेथे पुष्कळ फरक पडेल. पण जर आपण असे म्हटले की, अस्तित्व एक आहे, आपण समन्वयाने चालले पाहिजे, तर तेथे संघर्ष येत नाही. मग आपलेअर्थकारण वेगळ्या प्रकारे चालेल. नुकताच उच्च न्यायालयाचा असा एक निर्णय आला आहे की, शिक्षण ही व्यापाराची वस्तू नाही. परंतु, परदेशातून जे येते, त्या प्रत्येक गोष्टीत पैसा हाच एक भाग आहे. यात चांगले-वाईट, चूक-बरोबर असे काही नाही. त्या त्या परिस्थितीत त्यांना जीवन जसे कळले, तशी त्यांची दृष्टी बनली आहे. तसा हिंदुत्व हा मूलभूत विचार आहे. फक्त त्याचे आविष्कार बदलतात. समजा, आज आपण एक अर्थनीती मांडली. उद्या सगळी परिस्थिती बदलल्यावर आपण दुसरी अर्थनीतीसुद्धा मांडू शकतो. परंतु, मूळ विचार आणि मूळ बैठक एकच आहे, त्याच्यावरून आपण हे सर्व मांडत असतो. त्यामुळे राजकीय हिंदुत्व, अमुक हिंदुत्व, तमुक हिंदुत्व ही सर्व हिंदुत्वाची अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. मूळ हिंदुत्व एकच आहे. त्याच्यात वेगवेगळे प्रकार नाहीत.
 
अन्य समुदायांप्रमाणे हिंदूंचा असा एक धर्मग्रंथ नाही किंवा एखादी निश्चित परंपरा नाही. एक विकासाभिमुख जीवनपद्धती असे आपण त्याचे प्रतिपादन करत असताना या जीवनपद्धतीचे काय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल?
 
तिचे वैशिष्ट्य असे आहे की, आधी सांगिल्याप्रमाणे चार तत्त्वे आहेत. बाकी अन्य कुठलीही परंपरा नाही. पण हिंदुस्थानात ज्या काही परंपरा आहेत, त्यांना ‘हिंदू परंपरा’ असे म्हणतात, त्यांचे वैशिष्ट्य असे आहे की त्या सर्व वरील चार तत्त्वांवरच आधारित आहेत. दर्शने प्रत्येकाची हिंदुत्व म्हणजे सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या : सरसंघचालक
वेगवेगळी आहेत. परंतु, प्रस्थानबिंदू एकच आहे. सत्याचे सतत अनुसंधान करणे आणि हे सत्य म्हणजे एकतेचाच विविधांगी आविष्कार आहे. आपल्या देशामध्ये सर्व प्रकारची दर्शने आहेत. त्यामध्ये आधुनिक आणि प्राचीन, आस्तिक आणि नास्तिक ही सर्व येतात. पण, या सर्वांचा प्रस्थानबिंदू एकच आहे. पण, ते जे एक आहे, ते जड आहे की चेतन आहे? त्या एकाचे काही आणखी मूल घटक किंवा मूलद्रव्ये आहेत का? तर या बाबतीत वेगवेगळे आहे. त्या सर्व दर्शनांचा विचार करून, त्यातील परस्परविरोधी विचार करूनही, जेव्हा या सर्व परंपरा आचरण सांगतात तेव्हा ते एकाच प्रकारचे आचरण असते - सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, शौच, तप, स्वाध्याय आणि सर्व प्राण्यांविषयी दया. हे सगळे आपल्या सनातन परंपरेत आहे. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रकारांनी तर कधीकधी एकाच शब्दांत सगळ्या परंपरांनी असेच आचरणकरावे असे सांगितले आहे. त्यामुळे विविधतेतील एकता हे आपले एक वैशिष्ट्य होय.
 
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ‘बंद’ विचार नाही! कारण, सत्य हे अनंत आहे. त्याला आकळणे हा सततचाउद्योग आहे. कारण जे सत्य आहे ते तेच आहे. तुम्ही जे आज समजता आहात, उद्या त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे समजू शकता. कारण, तुमची दृष्टी तशी असू शकते. कुठलाही बंद चौकटीतला विचार या परंपरेला मान्य नाही आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही परीक्षणीय आहे. आपली हजारो वर्षांची परंपरा आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाने अनुभवांती अमुक-अमुक सांगितले. आधी तू स्वत: या गोष्टीचा अनुभव घे आणि मग असे सांग की हे तुम्ही करा! परप्रत्ययाने बुद्धीचा पुरस्कार नाही. त्याची परीक्षा घेण्यास पूर्ण परवानगी आहे आणि तुम्ही कशावरही प्रश्न विचारू शकता हे अमुक चालणार नाही, हे तमुक चालणार नाही, असे आपल्याकडे नाही. हे सर्व आपण परकीयांच्या संपर्कात आल्यानंतर निर्माण झाले किंवा एका विशिष्ट ‘डिसिप्लिन’मध्ये चालताना त्या ‘डिसिप्लिन’पुरतेच ते आहे असे समजले पाहिजे. पण, ते आपण विसरलो आणि ते सार्वत्रिक केले, म्हणून काही काही वेळा साचेबंदपणा येतो, रूढी येतात, सामाजिक चौकट तयार होते. हे सगळे त्या मूळ भूमिकेपासून थोडे खाली आल्यामुळे निर्माण झालेले आहे. पण, मूळ भूमिकेला पूर्ण स्वातंत्र्य मान्य आहे आणि सगळीकडे एक तत्त्व पाहण्याची परंपरा असल्यामुळे पूर्ण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैरता असा होत नाही. आपले पूर्ण स्वातंत्र्य हे इतरांचे पूर्ण स्वातंत्र्य मान्य करणारे असले पाहिजे, असे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ती सतत गतिमान असते. कुठल्याही देशकाल परिस्थितीला ती ‘अ‍ॅडजस्ट’ करून घेत असते. ती सगळ्यांसोबत राहते आणि सगळ्यांना आपल्यासोबत ठेवते, हे तिचे वैशिष्ट्य आहे.
 
सर्वांना सोबत घेऊन जाणारे हिंदुत्व असे आपण जेव्हा मांडतो, तेव्हा संघ हा मुसलमान, ख्रिश्चन धर्मीयांच्या विरोधात आहे, अशा पद्धतीची मांडणी किंवा भ्रम निर्माण केले जातात. या भ्रमाला किंवा मांडणीला संघ उत्तर काय देईल?
 
संघ उत्तर द्यायच्या भानगडीत फारसा पडत नाही. कारण, ज्यांच्या मनात भ्रम असतील, त्यांनी ते स्वत:च स्पष्ट करून घेतले पाहिजे. माझ्या मनात जर एखादा भ्रम असेल, तर त्यामुळे जे काही नुकसान होणार असेल, ते माझेच होईल. ज्याच्या मनात भ्रम नाही, त्याचे काहीच नुकसान होणार नाही. खरे काय ते सांगण्याचा माझा प्रयत्न असला पाहिजे. तो प्रयत्न मला करायलाच हवा, असा प्रयत्न करू इच्छिणार्‍यांना मदत व्हावी, म्हणून संघ लक्ष देतो. संघाचे प्रश्न अगदी सरळ असतात, उदा. ख्रिश्चनांविरूद्ध किंवा मुसलमानांविरूद्ध संघाने कधी काही केले आहे का? फक्त असे एक उदाहरण दाखवून द्या! देशहिताच्या विरोधात होणारी जी वर्तणूक असेल, तिचा संघाने सतत विरोध केला आहे आणि संघ तो पुढेसुद्धा करणार आहे. लोकहिताच्या विरोधात काही झाले असेल, तर संघ त्यालाही विरोध करणार आहे आणि हे काही लपून राहिलेले नाही. पण, ख्रिश्चनांना ते ख्रिश्चन आहेत म्हणून आणि मुसलमानांना ते मुसलमान आहेत म्हणून संघाने कधीच विरोध केलेला नाही. ‘या देशात ते आम्हाला नको आहेत’ असे आम्ही म्हटल्याचे एक तरी उदाहरण दाखवून देता येईल का? कुठल्याही पूजापद्धतीच्या बाबतीत हिंदुत्वाचा असा विचार आहे की, सत्याकडे जाणारे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जात असतो. आपण त्याला विरोध करता कामा नये. प्रत्येकाने आपल्या मार्गावर अढळ राहून अन्य सर्वांचाही योग्य तो आदर केला पाहिजे. ‘जाकी रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तिन तैसी’. संघ ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात आहे असे काही लोक म्हणतात. पण, जेव्हा आम्ही त्याचे एखादे उदाहरण दाखवून द्या असे म्हणतो, तेव्हा त्यांना असे कोणतेही उदाहरण सांगता येत नाही. मग ते म्हणतात की, संघ पाकिस्तानच्या विरोधात आहे. पण, एकटा संघच पाकिस्तानचा विरोध करतो, असे नाही. अनेक मुसलमानसुद्धा पाकिस्तानचा विरोध करतात. या गोष्टीमुळे लोक ढोबळमानाने असे मानतात की, जे भारताच्या हिताचे आहे ते हिंदूंच्या हिताचे आहे म्हणून संघ मुसलमानांचा विरोध करतो असे लोक सांगतात. आम्ही देशहित आणि हिंदूहित ही भूमिका घेऊन वाटचाल करतो. आम्ही कोणाचाही दुस्वास करत नाही.
 
कारण, ‘सबकी बात रखनी चाहिए’ असे आम्ही सांगतो आणि तसे वागतोही! आमचा अनुभव असा आहे की, संघ जसजसा वाढतो आणि लोक संघाच्या अंतरंगात येऊन पाहतात, तसतसे त्यांचे सगळे भ्रम आपोआप निघून जातात.
 
संघाचा आग्रह ‘स्व’चा शोध घेण्याचा राहिला आहे. आपल्या भाषणांतून आपण तशी मांडणी करता. ‘स्व’चा शोध घेणे म्हणजे नेमके काय? त्याचा अर्थ कसा स्पष्ट कराल?
 
मी म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व आहे. शरीर, मन, बुद्धी हा त्याचा एक भाग आहे. आत्मा हाही त्याचा एक भाग आहे. एकूण ‘मी कोण?’ असे म्हटले, तर मी माझ्या कुळाची परंपरा सांगतो, माझ्या देशाची परंपरा सांगतो, माझ्या पूजेची परंपरा सांगतो. या सगळ्यांची बेरीज करून ‘मी’ होत असतो. आज यातील सगळे स्वीकारता येईल असे नाही. पण मूळ माझे तेच आहे. जसा हजारो वर्षे आपला देश जगतो, जसे माणूस जगतो, याच्या आधारावर परिस्थितीशी त्याची देवाणघेवाण चालते. प्रत्येक माणसाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. एकाच परिस्थितीत तुम्ही कसा मार्ग काढता आणि मी कसा मार्ग काढतो यात फरक असतो. दोघांचे रस्ते वेगवेगळे असतात. कदाचित दोघेही आपापला मार्ग काढून यशस्वी होतात, तर कधी दोघेही अयशस्वी होतात. पण, मार्ग काढायचा दृष्टिकोन जसा तुमचा तुमच्याजवळ आहे, तसा माझा माझ्याजवळ आहे.
 
तसे हजारो वर्षे आतापर्यंत वर्णन केलेल्या आपल्या परंपरेच्या आधारावर आपण आपला भूगोल, आपली परिस्थिती, आपल्या आकांक्षा याच्या आधारावर एक परंपरा उत्पन्न केली. ढोबळमानाने काही गोष्टी निश्चित केल्या. त्या देशकालपरिस्थितीनुसार जशा बदलणे आवश्यक होते, तशा त्या बदलत राहिल्या. त्यात जेव्हा बदल झाला नाही, तेव्हा त्याचा आपल्याला त्रास झाला. मग समाजसुधारक आले आणि त्यात बदल घडून आला, असा आपला इतिहास आणि परंपरा आहेत. त्यामुळे भारत म्हटले किंवा हिंदू म्हटले की, हे सगळे त्याच्यामागे येते.
 
भारतामध्ये राहणारा हिंदू समाज एखाद्या वेळेस चर्चमध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन माथा टेकू शकतो. त्याच्यामुळे कोणाचे हिंदुत्व भ्रष्ट होत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. या केवळ पूजेच्या बाबतीतील नाहीत, तर ‘संध्याकाळी झाडाला हात लावू नका रे!’ असे आपल्याला जुनी माणसे सांगतात. हे काही आपल्याला थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी लावलेल्या शोधानंतर कळलेले नाही, तर ती आपली परंपरा आहे.
 
सहज जाता-येता कागदाला जरी पाय लागला, तरी कितीही मोठा मनुष्य असला, तरी अथवा एखादा उच्चपदस्थ असला, तरी तो सवयीने नमस्कार करतो. ही आपली परंपरा आहे. आपण कुठेही बाजारात गेलो आणि आपण एखादी वस्तू विकत घेतली, ती मोजून मापून घेतली आणि मोजून त्याचे पैसे दिले, तरी वस्तू देणारा त्यात मूठभर जास्तच टाकतो. हे आपल्या अखंड भारताच्या सीमेमध्ये सगळीकडे दिसून येते.
 
वरील गोष्टींशी संबंध राखून जेव्हा आपण जे काही करू, तेव्हा त्यात आपल्याला नक्कीच समाधान मिळेल. या संबंधांना तोडून आपण जे काही करू, ते भौतिकदृष्ट्या कदाचित सुविधासंपन्न असेल. पण ते आपल्याला कधीच समाधान देऊ शकणार नाही. त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला समाधान शोधले पाहिजे.
 
पण, प्रत्येक काळात हे सर्व जसेच्या तसे लागू होईल असे नसते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या दृष्टीने उपयुक्त नसतात, त्या गोष्टी आपण सोडून देतो आणि काही नवीन गोष्टींचाही स्वीकार करतो. बाहेरून आलेल्या काही उपयुक्त गोष्टींचा आपण स्वीकार करतो. ही आपली प्रकृती आहे. एक श्लोक आहे,
 
आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः।
देवा नोयथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे॥
 
म्हणजे चांगला विचार कुठूनही आपल्याकडे आला तर तो आपण स्वीकारतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन हा जो ‘स्व’ आहे तो काय आहे? उदा. राष्ट्र याविषयी आपले काय म्हणणे आहे? आज पाश्चिमात्य लोक या शब्दाला ‘नेशन’ असे म्हणतात. पण, तेथे एखादे राष्ट्र उभे राहिले की ते आंतरराष्ट्रीयतेच्या विरोधीच असते. कारण, त्यांचे राष्ट्र हे सामूहिक स्वार्थाच्या आधारावर उभे राहत असते. त्यांचे राष्ट्र हे ‘नेशन स्टेट’ असते. पण, आपल्या येथील राष्ट्र म्हणजे काय?
 
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मन।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवा॥
 
हा राष्ट्रीयतेचा उद्देश आहे. व्यक्ती विकसित झाली, तर परिवाराला फायदा झाला पाहिजे. परिवाराचा फायदा गावाला झाला पाहिजे, गावाचा फायदा सर्व देशाला झाला पाहिजे आणि राष्ट्राचा फायदा संपूर्ण मानवतेला म्हणजे संपूर्ण सृष्टीला झाला पाहिजे, या मानसिकतेतून आपण सगळ्या गोष्टींकडे पाहतो. अशी आपली एक परंपरा आहे. या परंपरेतून आपल्या लोकांची जडणघडण झाली आहे. लोक ज्या परंपरेत, ज्या परिस्थितीत वाढतात, तिला अनुसरून त्यांची जडणघडण होत असते. आज या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या प्रकृतीला अनुसरून आपल्याला घेण्यासारखे काय आहे आणि आपल्या प्रकृतीला अनुसरून नसले, तरीसुद्धा घेण्यासारखे काय आहे आणि आपल्या प्रकृतीला अनुसरून नसल्यामुळे सोडण्यासारखे काय आहे? याचा विचार करूनच आपल्याला पुढे गेले पाहिजे. हेही आपल्या परंपरेत आहे. ‘स्व’चा विचार म्हणजे आपल्या ‘स्व’च्या आधारावर कालसुसंगत, समाजाला अनुकूल, सर्वहितकारक असा विचार!
 
व्यष्टी ते समष्टी असा प्रवास आपण मांडला आहे. आधुनिक काळात समाज किंवा देश चालविण्यासाठी संविधानासारखी एक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. संघ हा संविधानविरोधी आहे असे म्हटले जाते. संघाला मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन करायचे आहे, अशी भीती व्यक्त केली जाते. संविधान लागू होऊन 75 वर्षे लोटली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संघाची संविधानाबाबत काय भूमिका आहे?
 
संविधान निर्माण होण्यापूर्वी त्यावर विस्तृत चर्चा झाली. त्या वेळी प्रत्येकाने आपापले मत व्यक्त केले होते. काही जणांची मते परस्परविरोधी होती. त्या काळात संविधानाबाबत संघाचे अधिकारी अथवा श्रीगुरुजी यांनी काही म्हटलेसुद्धा असेल. एकदा आपण सर्वांनी संविधानाचा स्वीकार केल्यावर आता ते आपल्या सर्वांचे संविधान आहे. ते संविधान आज कसे आहे? हा देश हिंदूंचा देश आहे. संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे. याचे फार मोठे श्रेय त्यांना जाते, ही गोष्ट खरी आहे. पण, संविधानाची निर्मिती होत असताना प्रत्येक बाबीवर सर्वांनी मिळून विचार केला होता. हिंदू परंपरा ही सहमतीची आहे. आपल्या सामूहिक सहमतीतून निर्माण झालेले ते संविधान आहे. त्यामुळे त्या संविधानाने घालून दिलेल्या संपूर्ण शिस्तीचे आपण पालन केले पाहिजे. आपल्या संविधानाचा सर्वांनी सन्मान राखला पाहिजे. ‘लेटर अ‍ॅण्ड स्पिरिट’ या दोन्ही बाबतीत संविधानाचे पावित्र्य मानून आपण वाटचाल केली पाहिजे, असे संघाला वाटते. संविधानामध्ये काही बदल करायचे असतील, तर संविधान निर्मात्यांनी त्यात तशी तरतूद करून ठेवली आहे. तेव्हा त्यासाठी तोच मार्ग आपण अनुसरला पाहिजे. आपण त्यांचे उल्लंघन करता कामा नये. कारण, ते कोणा एका पक्षाने अथवा व्यक्तीने किंवा एका विशिष्ट विचारावर आधारित असे ते नाही. अगदी हिंदू परंपरेनुसार सुमारे दोन वर्षे त्यावर शास्त्रार्थ झाल्यानंतर त्या शास्त्रार्थातून निघालेले ते सहमत आहे. त्यामुळे आपण संविधानविरोधी मुळीच नाही. उलट या संविधानाच्या रक्षणासाठी आवश्यक ते आपण नक्कीच करू. बाकी मनुस्मृती लागू करणे असे जे काही म्हटले जाते, त्याबद्दल मी सांगेन की त्या त्या काळातील ती शास्त्रे होती. त्या शास्त्रानुसार जरी पाहिले, तरी आजच्या काळात मनुस्मृती काही लागू नाही. तो फार पूर्वीचा काळ होता आणि तो संपला आहे. गेल्या 1200-1500 वर्षांत हिंदुत्वाला कोणतीही स्मृती मिळालेली नाही. काळ खूप बदलला आहे आणि परिस्थितीसुद्धा खूप बदललेली आहे. जगाच्या ज्ञानात भर पडली आहे आणि त्या आधारावर नव्या स्मृतीची गरज असतेच. परंतु, एकूण आपला देश आणि त्याचे चालणारे तंत्र यासाठी आपले संविधानसुद्धा एक स्मृतीच आहे. संघाला मनुस्मृती मुळीच आणायची नाही.
 
नजीकच्या भविष्यकाळात अखंड भारत होईल, असे विधान आपण एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले होते. त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली होती. अखंड भारत म्हटले की, मुस्लीम समाजाची लोकसंख्या वाढत चालली आहे, तर लोकसंख्येच्या बळावर हिंदूंवर मुसलमानांचे प्रभुत्व निर्माण होईल का? त्यामुळे अखंड भारत, सांस्कृतिक भारत आणि मुस्लीम या संदर्भात आपले काय मत आहे?
 
जोपर्यंत हिंदू समाजाच्या मनात अशी भीती आहे, तोपर्यंत त्यांना तसे वाटेल. तशाच प्रकारे मुसलमानांनाही असे वाटते की, अखंड भारत म्हणजे हिंदूराष्ट्र! मग आपले काय होणार? असे जोपर्यंत वाटत राहणार, तेव्हा ती भीती राहणारच.भारताची भारतीयता ही काही पूजापद्धतीवर आधारित नाही. त्याच्यामुळे पूजा, भाषा कोणतीही असू द्या, हे सर्व स्वीकारून आपण पुढे गेले पाहिजे. या मताचे लोक प्रभावी आणि बहुसंख्य असतील ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आम्हीच बरोबर, बाकी सगळे चूक हा कट्टरतेचा भाव त्याच्या मनातून निघून जाईल किंवा ते आपल्या पूर्वीच्या मतावर येतील. म्हणजे मुसलमान म्हणून मुसलमान सगळेच्या सगळे आले, तरीही तो मुसलमान फक्त इस्लामच राहायला पाहिजे आणि बाकी सगळे नरकात जातील. त्यामुळे आताच त्यांनी बदलले पाहिजे, हे विचार सोडून देतील तेव्हाच होईल. हा हिंदूभाव आहे. हिंदूभावाने राहणारा मुसलमान, हिंदूभावाने राहणारे ख्रिश्चन, हिंदूभावाने राहणारे हिंदू हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अखंड भारत साकारणार नाही. पण, हिंदूंनाही हिंदूभावाने राहावे लागेल. त्यांनासुद्धा उच्च-नीच, जातपात, अस्पृश्यता या सर्व भावना आपल्या मनातून काढून टाकाव्या लागतील. त्यांनासुद्धा स्वार्थ वगैरे सोडून ‘हे विश्वचि माझे घर’ अशा आदर्शाप्रमाणे आपले जीवन जगावे लागेल. तसेच, आपल्या देशात मुसलमान असे हळूहळू म्हणायला लागले आहेत आणि अधूनमधून पाकिस्तानातूनही असेच सूर ऐकायला येत आहेत. हे सूर अधिक बळकट झाले पाहिजेत. जरी आमची भाषा वेगवेगळी असली, आमचे प्रांत वेगवेगळे असले, आमचे धर्ममत वेगवेगळे असले आणि ते धर्ममत परदेशातून या भूमीत आले असले, तरीही संस्कृतीच्या दृष्टीने, पूर्वज आणि वंशज या दृष्टीने, मातृभूमी ही एकच असल्यामुळे राष्ट्रीय दृष्टिकोनातून आम्ही एक राष्ट्र आहोत, आम्ही सर्व भारतमातेचे पुत्र आहोत, आम्ही सर्व या देशातील सनातन भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत, या देशातील पूर्वज हेच आमचे आदर्श आहेत ही सगळ्यांची भावना होईल, तेव्हा त्या दिवशी अखंड भारत साकार होईल. त्यामुळे अखंड भारत झाल्यावर मुसलमानांची संख्या वाढली, तर काय होईल? हा प्रश्नच शिल्लक उरत नाही. त्यामुळे हिंदूभाव बळकट झाला पाहिजे. तो बळकट झाला, तर अखंड भारत आपोआप साकार होईल. मग आपल्यासमोर असे प्रश्न उरणार नाहीत.
 
महाराष्ट्र आणि देशपातळीवरील ऐक्याचा विषय आपण करतो, तेव्हा त्यात जातीभेद, अस्पृश्यता, जुनाट रूढी असे अडथळे दिसून येतात. या सर्व गोष्टींचे निराकरण करून समाजाला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्यासाठी संघाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे कार्य सुरू आहे? त्याची दिशा आणि उदाहरणे कोणती आहेत?
 
आपल्या समाजात दोष आहेतच. पण, दोष हे ज्याचे त्याला दूर करावे लागतात. दोषी असलेल्या माणसाला दंड करण्याऐवजी त्याच्यातील दोष नष्ट करण्यावर आपण भर दिला पाहिजे. दोषाला क्षमा करून चालत नाही. त्यामुळे दोषी माणसातील दोष बाहेर काढून त्याला निर्दोष केले पाहिजे. आपल्याकडे सकारात्मक भूमिका असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एखादी गोष्ट चूक आहे अथवा बरोबर आहे याचा निकष कोणता? तर सत्य, न्याय आणि न्याय करण्यासाठी करुणा हाच याचा निकष असला पाहिजे. याच्याच आधारावर काय चूक आणि काय बरोबर, याचा निवाडा करता येतो. एखादी गोष्ट आधीपासून चालत आलेली आहे म्हणून ती तशीच पुढे चालू ठेवली पाहिजे, ही भूमिका बरोबर नाही. त्या गोष्टीचे आपण परीक्षण केले पाहिजे.
 
पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम्।
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः॥
 
त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण तपासून पाहिली पाहिजे. सत्य, न्याय आणि करुणा यांच्या कसोटीवर प्रत्येक गोष्टीची तपासणीकेली पाहिजे. जर या कसोटीवर एखादी गोष्ट खरी उतरली, तर त्या गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि या कसोटीवर न उतरणार्‍या गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. खरे पाहता ‘दोष’ या नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. दोष म्हणजे अभाव होय. जी वस्तू असायला हवी, ती नसली की त्याला दोष समजले पाहिजे. अंधार म्हणजे काय? तर प्रकाशाचा अभाव म्हणजेच अंधार होय. पण, ‘अंधार’ नावाची वेगळी वस्तू अस्तित्वात नाही. त्यामुळे अंधार नाहीसा करायचा असेल, तर प्रकाशमय आचरण केले पाहिजे. त्यामुळे अस्पृश्यता घालविणे म्हणजे सर्वांना आपले मानणे होय. आपलेपणाच्या भावनेने आचरण करणे आवश्यक आहे. योग्य आचरणामुळे आपण सर्व प्रकारचे दोष घालवू शकतो म्हणजे जातीभेदांना हिंदू आचार्यांनी नाकारले. त्यामुळे जातीभेदाचे आचरण करणे आपल्याला मान्य नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या सवयीमध्ये बदल घडवावा लागतो. सवय बदलण्याचा अभ्यास समाजाकडून करून घेण्याचा एक उपाय म्हणजे आपली संघाची शाखा होय. आपण सगळे एक आहोत आणि आपण एक भावनेने आचरण केले पाहिजे, अशी सवय आपण संघात आलेल्या स्वयंसेवकांना लावतो. त्यामुळे तो सहजपणे भारतातील कुठल्याही प्रांतात जाऊन वावरू शकतो. ही सर्व गोष्ट संघाच्या ‘लॅबोरेटरी कंडिशन’मध्ये घडून येते. त्याने हे सर्व आपल्या व्यक्तिगत आचरणात, कौटुंबिक आचरणात, सामाजिक आचरणात आणि आपल्या नोकरीधंद्याच्या ठिकाणी हे करणे आवश्यक आहे, असे आचरण त्याने करावे यासाठी त्याला मदत करणारी व्यवस्था प्रत्येक ठिकाणी आहे. व्यक्तिगत आचरणासाठी गणशिक्षक जबाबदार असतो, त्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी गटनायक मदत करतो. आजीविकेच्या ठिकाणी त्यांनी तसे आचरण करावे यासाठीसुद्धा व्यवस्था असते.
 
मग सामाजिक ठिकाणीसुद्धा त्याने तसे आचरण करावे म्हणूनही व्यवस्था केलेली आहे. स्वयंसेवकांनी चालविलेल्या वेगवेगळ्या संघटना कधीकधी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतात. त्या भूमिका सर्व समाजाला नेहमीच आवडतात असे होत नाही. पण, समाजाची टीका पत्करूनही योग्य त्या गोष्टी आचरण करण्याचीच भूमिका असते. डॉ. हेडगेवार सांगायचे की, नेतृत्वाने नेहमीच लोकानुनय करून चालत नाही. अनेक प्रसंग असे उद्भवतात, तेव्हा लोकमताच्या विरुद्ध जाऊनही समाजाला योग्य दिशा दाखविण्याची गरज असते. तेव्हा, सर्व स्वयंसेवकांचे वर्तन अशाच प्रकारचे असले पाहिजे. त्यासाठी संघातील अधिकारी लोक लक्ष पुरवीत असतात. मग आता हे सर्व समाजातसुद्धा गेले पाहिजे. त्या दृष्टीने ‘गतिविधी’ नावाचा एक प्रकार गेल्या काही वर्षांत संघाने सुरू केला आहे. त्याची वेगळी संघटना नसते. एका अर्थाने ती लोकचळवळच बनविली जाते. समाजातील लोकांना आपल्यासोबत घेऊन स्वयंसेवक ही गतिविधी चालवीत असतात. मग ती सर्वमान्य होतील आणि ज्या कामांना समाजातील कोणाचाही विरोध असणार नाही, अशी कामे उभी करतात. मग ती कामे करीत असताना लोकांच्या आचरणात आपोआप बदल घडून येतो. यालाच ‘गतिविधी’ असे म्हणतात. अशा प्रकारच्या सहा गतिविधी संपूर्ण देशपातळीवर सुरू झाल्या आहेत. समाजाबरोबर संघस्वयंसेवक अशी ती कामे आहेत. उदा. पर्यावरण गतिविधी. पर्यावरण गतिविधीचे कार्यक्रम करताना आपोआपच एक ‘सोशल कॉन्शसनेस’ निर्माण होतो. त्याचप्रमाणे सामाजिक समरसतेची गतिविधी आहे. त्यामुळे माणसे आपोआपच एकमेकांबरोबर काम करू लागतात. ही कामे केल्यामुळे समाजाचे आचरण आपोआप बदलू लागते. सर्व समाजाला सोबत घेऊन जे सर्वमान्य विषय आहेत, त्या विषयांचे काम आपण करतो. आता पुढच्या काळात आणखी काय करावे लागेल, याचा विचार करून ती कामेसुद्धा सुरू केली जातील.
 
 
- रवींद्र गोळे
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.