गंध फुलांचा गेला सांगून...!

    29-Mar-2023
Total Views |
 
Nashik
 
 
कधीकाळी नाशिक ‘फुलांची नगरी’ म्हणून ओळखली जायची. येथे असणारे आल्हाददायक हवामान, पाण्याची विपुलता, स्वच्छ आणि बारामही खळखळणार्‍या गोदेसह इतर उपनद्या यामुळे हे शहर सर्वार्थाने ‘फुलांचे-गुलाबाचे शहर’ म्हणून ओळखले जात. म्हणूनच पूर्वी नाशिकला ’गुलशनाबाद’ अर्थात ‘गुलाब नगरी’ नाव होते. फुलांच्या नगरीत नाशिक महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग, रोझ सोसायटी व ‘नाशिक सिटीझन फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुष्पोत्सव 2023’ नाशिककरांच्या उदंड प्रतिसाद संपन्न झाला. ’कोविड’ काळानंतर तब्बल दोन वर्षांनंतर प्रदर्शन भरल्यामुळे नाशिककरांना गुलाबाच्या विविध प्रजातींसह इतर अनेक देशी-विदेशी फुलांचा आनंद घेता आला. पुष्पोत्सवात दररोज संगीत, नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी बहर आणला. प्रदर्शन सर्वार्थाने यशस्वी झाले. जसबिंर सिंगाच्या मानव विकास मंचाने प्रदर्शन होऊ नये, म्हणून आंदोलने वगैरे केली. मात्र, विरोध करावा असे मुळी काहीच नव्हते. प्रदर्शनातून पर्यावरण रक्षण, गच्चीवरची बाग कशी फुलवावी, उद्यान प्रतिकृतीमधून सुरेख अनुभूती मिळाल्याच्या प्रतिक्रिया पुष्पप्रेमींनी व्यक्त केल्या. ट्रेमधील गार्डन, काष्टकला, पुष्प रचना, विविध प्रकाराचे हार, फुलांची रांगोळी, निवडुंगांचे ट्रेमधील सुंदर सजावट, बोन्साय वृक्ष, जपानी पुष्प रचना यासह विविध प्रकारच्या गुलाबांच्या प्रजातीसाठी यावेळी स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्याद्वारे खर्‍या अर्थाने निसर्ग, पर्यावरणाचा जागर झाला असेच चित्र होते. त्यामुळे एखाद्याने विरोध केला म्हणून प्रदर्शन थांबवण्यात येणार नव्हतेेच. चांगल्या गोष्टींना विनाकारण विरोध करण्यात अर्थ नाही. यातून पैशाची उधळपट्टी झाली असे म्हणता येणार नाही. प्रदर्शनातून दिलेला संदेशही महत्त्वपूर्णच! तीन दिवसांत दहा लाखांहून अधिक नागरिकांनी पुष्पोत्सवाला भेट दिली. पर्यावरण जागर, निसर्ग रक्षणासह प्रदर्शनात अनेक कलावंत, ‘आर्टिस्ट’च्या कलेला सशक्त व्यासपीठही मिळाले, हे विशेष. प्रदर्शनात फुलांची छायाचित्र स्पर्धाही ठेवण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागाने तयार केलेल्या उद्यानाच्या लघुप्रतिकृती प्रदर्शनाचे शक्तिस्थान ठरले. काष्टशिल्प व फ्लॉवरपॉटच्या विविध ढंगातील कधीही न दिसणार्‍या कलाकृतीही सुरेखच. एकूणच पुष्पोत्सवातील गंध पर्यावरण, सृष्टी रक्षणासह विविध कला जपण्याचाही संदेश देऊन गेला.
 
 
उपक्रमशीलतेची ‘गरुडझेप’
 
नाशिक येथील ‘गरुडझेप प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेने ‘गडकोट संवर्धन’, ‘गोदावरी स्वच्छता’, ‘बेटी बचावो बेटी पढावो’ ‘वाहतूक सुरक्षा’ आणि ‘पर्यावरण रक्षणा’सारखे समाजोपयोगी आणि निसर्गरक्षक उपक्रम राबवून नुकताच विक्रम नोंदवला. 1 हजार, 826 दिवस म्हणजे तब्बल पाच वर्षं सलग सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल ’गरुडझेप’ची नोंद ‘ब्राह्मो इंटरनॅशनल, ‘वंडर बूक ऑफ रेकॉर्डस’मध्ये नुकतीच झाली आहे. स्वयंसेवी संस्था काढणे सोपे. मात्र संस्थेद्वारे अवितर आणि नित्यनियमाने उपक्रम, कार्यक्रम राबवणे आव्हानात्मकच. ‘गरुडझेप’ने हेच कार्य अविरतपणे सुरू ठेवून समाजासमोर आदर्श ठेवला. संस्थेने तरुणांसह नागरिकांमध्ये गेल्या काही वर्षांत हेल्मेटसक्तीचे महत्त्व पटवून सांगितल्यामुळेच नाशिकमध्ये हेल्मेट परिधान करणार्‍यांचे प्रमाणही लक्षणीय वाढले असल्याची माहिती ’गरुडझेप’ अध्यक्ष संदीप भानोसे देतात. ‘आम्ही दि. 25 मार्च, 2018 रोजी सुरू केलेल्या अभियानातून आजवर अविरतपणे ‘गोदा स्वच्छता’, ‘दुर्गसंवर्धन’ आणि ‘वाहतूक सुरक्षा अभियान’ हे आणि असे समाजोपयोगी उपक्रम राबवत असून शून्य अपघात हे ध्येय डोळ्यांसमोर आहे’ असेही भानोसे सांगतात. सातत्यपूर्ण उपक्रमाचे दोन हजार दिवस पूर्ण करण्याचा ‘गरुडझेप’चा मानस आहे. ‘गरुडझेप’चे स्वयंसेवक गेली 1 हजार, 826 दिवस विविध उपक्रमातून नाशिककरांसमोर सातत्याने येत आहेत. व्यंकटेश देशपांडे, सुरेंद्र कुलकर्णी, संगीता भानोसे, संकेत भानोसे यासह संस्थेचे अनेक स्वयंसेवक आज नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी थेट शहरातील विविध सिग्नल्स, चौक, रस्त्यावर जागृती करताना नाशिककरांनी अनेकदा पाहिले आहेत. इतक्या दीर्घकाळ आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अखंडितपणे असे अभियान राववणे हे निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय ठरावे.
आज स्वयंसेवी संस्था दिखाऊपणा, प्रसिद्धीस अन् केवळ फंडासाठी कार्य करतात, अशी टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर सातत्याने 1 हजार, 865 दिवस एखादी संस्था अविरत समाजोपयोगी उपक्रम राबवत असेल, तर ही ’गरुडझेप’ केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर इतरही ’एनजीओ’ला अनुकरणीय, पथदर्शी ठरावी.
 
- निल कुलकर्णी
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.