‘त्या’ सिनेमांना यश का आहे?

    29-Mar-2023
Total Views |
 
oscar award
 
 
‘आरआरआर’, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ आणि ‘कांतारा’ हे तीन चित्रपट आणि त्यांच्यात असलेले साम्य हे समजून घेतले, तर या चित्रपटांना यश का मिळाले, हे लक्षात येईल.
 
गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपट सृष्टीचा चेहरा कमालीचा बदलला असून, त्याची जागा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने घेतलेली दिसते. आता इथे दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपट नव्हे काय, असा प्रश्न उपस्थितही केला जाऊ शकतो. त्यामुळेच आवर्जून सांगावे लागेल, ते म्हणजे ‘हिंदी चित्रपट हाच भारतीय चित्रपट’ अशीच गेली कित्येक दशके ओळख कायम आहे. म्हणूनच जेव्हा दक्षिणेत बनलेला ‘बाहुबली’ देशभरात नव्हे, तर जगभरात अचंबित करणारे यश मिळवतो, तेव्हा थक्क व्हायला होते. तीच परंपरा पुढे ‘पुष्पा’ने कायम राखली आणि आता ‘आरआरआर’ या चित्रपटाने तर थेट ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळवून भारतीय चित्रपट म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटानेही ‘ऑस्कर’वर आपले नाव कोरले.
 
‘कांतारा’ या चित्रपटालाही दोन मानांकने मिळाली. मात्र, त्याला पुरस्कार मिळू शकला नाही. हे सगळे विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे, हे तीनही चित्रपट प्रादेशिक भाषेत बनलेले होते. रूढार्थाने ते भारतीय चित्रपट नव्हते. म्हणूनच असेल कदाचित, ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गीताला ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाला. तेव्हा,बॉलिवूड या चित्रपटसृष्टीतून नाकेच जास्त मुरडली गेली. यापेक्षा चांगली गाणी हिंदी चित्रपट क्षेत्रात कमी होती का, असा तिरकस प्रश्न उपस्थित केला गेला. हे तीन चित्रपट आणि त्यांच्यात असलेले साम्य हे समजून घेतले, तर या चित्रपटांना यश का मिळाले हे लक्षात येईल. ‘प्रादेशिकता’ हा या तीनही पटांना बांधून ठेवणारा समान धागा होय. तसेच आपले, या मातीतले अस्सल बावनकशी सोने त्यांनी पडद्यावर मांडले. आपली परंपरा, आपली संस्कृती यांच्याशी असलेली नाळ कुठेही न तोडता, त्यांनी आपली कथा आपल्या भाषेत मोठ्या पडद्यावर सांगितली. या कथेला त्यांच्या राज्यात यश मिळाले. त्यानंतर संपूर्ण देशभरात त्याला गौरवले गेले आणि आता तर ‘ऑस्कर’ पुरस्काराने संपूर्ण जगाची दारे त्यांना उघडली गेली आहेत.
 
बॉलिवूड चित्रपट हेच खूप दशकांपासून भारतीय रसिकांची मने रिझवीत आले आहेत. 70च्या दशकात हा चित्रपट रंगीबेरंगी झाला. चित्रपट श्वेतधवल असताना लाजराबुजरा असणारा नायक कालांतराने धाडसी, थोडा बनेल म्हणून पडद्यावर आला. सामान्य रसिक चित्रपटातील नायकामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहतो म्हणूनच 70च्या दशकात ‘रोटी कपडा और मकान’ या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत, म्हणून देशातील प्रत्येक युवा अस्वस्थ झालेला असताना, त्यांच्या मनातील असंतोषाला, खदखद व्यक्त करणारा एक प्रभावी चेहरा त्यांना अमिताभ बच्चन यांच्या रूपात मिळाला. त्यामुळेच ‘अँग्री यंग मॅन’ असे विशेषण त्यांना लाभले. प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा अमिताभ हा सर्वसामान्यांना म्हणूनच ‘आपला’ वाटू लागला. चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे, असे त्यामुळेच म्हणतात. या माध्यमांवर हुकमत होती ती मात्र डाव्या विचारसरणीची. म्हणूनच समाजातील रूढी, परंपरा चित्रपटात कुठेतरी खुंटीला टांगल्या गेल्या. 90च्या दशकात खलनायकाचे उदात्तीकरण करण्यात बॉलिवूड प्रयत्नशील राहिली. त्यात त्यांना यशही आले. म्हणूनच ‘डर’ या चित्रपटात खलनायकाचे काम करणारा शाहरुख प्रेक्षकांची सहानभूती मिळवतो.
 
‘खलनायक’ या नावाप्रमाणेच तसे पात्रही साकारणारा संजूबाबा हा एका पिढीचा आदर्श ठरला. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यात बॉलिवूड मग्न असताना, दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत नवनवीन प्रयोग होत राहिले. त्यांनी आपल्या रूढी, परंपरा कथांच्या माध्यमातून पडद्यावर मांडण्याचे काम सातत्याने केले. पैसे मिळवण्यासाठी त्यात त्यांनी कसलीही तरजोड केले नाही म्हणूनच ते यशस्वी ठरले असतील कदाचित. असे नेमके काय होते ‘आरआरआर’ मध्ये? अगदी आपल्या मातीतील, आपल्यासारखीच माणसे, चित्रपटातले नायक नायिका म्हणून त्यांच्यात काही अतार्किक, अशक्य नाही. गावातल्या लहान मुलीला इंग्रजांनी बळजबरीने पळवून नेल्यानंतर तिचा घेतलेला शोध आणि तिची केलेली सुटका अशी एका वाक्यात याची कथा सांगता येईल. पण, हा चित्रपट इतकेच दाखवत नाही. इंग्रजांशी झालेला एक दुर्लक्षित, कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात नसलेला लढा तो पडद्यावर मांडतो.
 
‘कांतारा’ हाही असाच काहीसा रूढी परंपरांचा पालन करणारा, वनराई जोपासणारा वनराईतील भाबड्या श्रद्धा मानणारा, त्यांचे पूजन करणारा. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हाही प्रतिमांचा वापर प्रभावीपणे करतो. गणेश ही आद्य देवता, हत्ती हे तिचेच रूप. या प्रतीकांचा वापर या चित्रपटात प्रभावीपणे केलेला दिसतो. आपल्या मातीशी, आपल्या भाषेशी, आपल्या परंपरेची इतकी चांगली सांगड अन्य कोणत्याही चित्रपटातून समोर येत नाही. त्यामुळेच हे चित्रपट भाषा, राज्य, प्रादेशिकता या असल्या बेगडी भिंती पाडून टाकतो आणि जगभरातल्या प्रेक्षकांशी संवाद साधू लागतो. त्यात तो यशस्वी होतो. या तीनही चित्रपटकारांचे यश यातच आहे. म्हणूनच ‘ऑस्कर’नेही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे, असे म्हटले, तर ते फारसे वावगे ठरणार नाही. येणार्‍या काळातही दक्षिणेकडचे अनेक सिनेमे चित्रपटगृहात झळकण्यासाठी सज्ज होत आहेत. हिंदी चित्रपटांची सद्दी संपली. प्रादेशिक नव्हे, तर दाक्षिणात्य चित्रपट हेच भारतीय चित्रपट राहतील, असे ‘ऑस्कर’ने उच्चरवाने सांगितले आहे. इतकेच!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.