मुंबई : परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात मंत्री तानाजी सावंत यांनी महाराष्ट्राच्या सत्तांतराबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१९ पासुन अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या जवळपास १०० ते १५० बैठका झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून बंडखोरी सुरू झाल्याचा खुलासा तानाजी सावंत यांनी केला आहे.
तानाजी सावंत म्हणाले, "२०१९ पासूनच महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेला बदलायचं काम सुरु होतं. आमदारांचं काऊंसलिंग सुरु होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या बैठका होतं होत्या. एकनाथ शिंदे आणि माझ्या त्या दोन वर्षांमध्ये जवळपास १०० -१५० बैठका झाल्या. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक आमदारांचं मी काऊंसलिंग करत होतो. हे सांगून करत होतो, झाकून करतं नव्हतो, उजळ माथ्यानं करत होतो." असा गौप्यस्फोट मंत्री तानाजी सावंत यांनी केला.
"त्यावेळी आमच्या तत्कालीन पक्षप्रमुखांनी मला मंत्रिमंडळातून बाजूला ठेवले. पण मी जे सांगतो तेच तुम्ही आतापर्यंत बघितले असेल. ३० डिसेंबर २०१९ रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर ३ जानेवारी रोजी सुजितसिंह ठाकूर प्रथम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप जिल्हा परिषदेत पहिल्यांदा बंडखोरी झाली. त्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून झाल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. तेव्हापासून मी बंडाचा झेंडा उभारला होता." असेही सावंत म्हणाले.