विनाशकाले विपरीत बुद्धी...

    28-Mar-2023
Total Views |
Editorial on Kerala police bans saffron colour in Hindu temple


भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या रक्ताने हात माखलेल्या केरळच्या पिनरायी विजयन सरकारला आता हिंदू मंदिरांमधील भगवे ध्वज, पताका, तोरणही डोळ्यात खुपू लागले. अशा या देवभूमीत कम्युनिस्टांच्या राक्षसी राजवटीला आता भगव्या रंगानेच कापरे भरायला लागले. याविरोधात केरळी हिंदूही सरकारविरोधात रस्त्यावर एकटवला असून, केरळमध्ये राजकीय परिवर्तनाची पहाट होऊ पाहत आहे.
 
देवीदेवतांची, मंदिरांची देवभूमी केरळ. हिंदू परंपरांनी, आचार-विचार, उपचारांनीही तितकीच समृद्ध अशी ही देवभूमी. देशविदेशातून लाखो पर्यटकांना याच देवभूमीची संपन्न, समृद्ध हिंदू संस्कृती आजही तितकीच आकर्षित करते. ‘दक्षिणेतला स्वर्ग’ म्हणून मिरवणारा हाच केरळ आता हिंदूंसाठी नरक ठरतो की काय, अशी भीषण परिस्थिती मात्र सध्या या कम्युनिस्टशासित या राज्यात निर्माण झालेली दिसते. खरंतर या एकंदर प्रकरणावर हसावं की रडावं, असाच प्रश्न पडावा. कारण, केरळमधील एका मंदिराला चक्क भगव्या रंगाचे ध्वज, पताका, तोरण वापरू नका, असा तुघलकी फतवाच केरळच्या पोलिसांनी नुकताच काढला. त्यामुळे मंदिर प्रशासनासह तमाम भाविकही प्रारंभी बुचकळ्यात पडले. हा आदेश कदाचित प्लास्टिकचे साहित्य सजावटीसाठी वापरू नका, असा असावा असेही क्षणभर त्यांना वाटले. पण नाही, पोलिसांचा आक्षेप या वेल्लायनी भद्रकाली मंदिरातील सजावटीला नसून, त्यासाठी वापरलेल्या भगव्या रंगाला असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. मग काय, तिरुवनंतपूरमच्या दक्षिणेला स्थित या मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाविरोधात असंतोषाची लाट उफाळून आली. मंदिराच्या महोत्सवासाठी वेल्लायनी मंदिराचा अख्खा परिसरच भगव्या

ध्वज-पताका-तोरणांनी नटला होता. पण, या भगव्यावरुन वातावरण भडकेल, कायदा-सुव्यवस्थेची म्हणे गंभीर परिस्थिती निर्माण होईल, म्हणून भगव्या रंगालाच हद्दपार करण्याचे अजब आदेश पोलिसांनी दिले. एवढेच नाही, तर मंदिरातील भगव्या रंगाविरोधात आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्याची पुष्टीही पोलिसांनी जोडली. त्यामुळे नेमके भगव्याला विरोध करणार्‍या पोलिसांचे बोलविते धनी कोण, हे तर सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट व्हावे!खरंतर कम्युनिस्टांच्या नासक्या टाळक्यांतूनच असे क्षुद्र विचार निघू शकतात. त्यांच्या लेखी भगवा रंग हा संघ, भाजप आणि हिंदुत्वाचेच काय ते प्रतीक! मग तो मंदिर आणि आसपासच्या परिसरात देवळातील महोत्सवानिमित्त फडकला तरी यांना त्या भगव्याची धास्ती! पण, या भगव्या ध्वजावर, पताकांवर कोणा पक्ष-संघटनेचा अधिकार नाही की कोणी कधी तसा दावाही केलेला नाही. पण, विळ्या-कोयत्याची धार उगारणार्‍या कम्युनिस्टांना भगवा ध्वज, त्याची आध्यात्मिक, धार्मिक महती याचे मोल ते काय म्हणा! म्हणूनच त्यांच्या लेखी भगवा रंग हा हिंदू धर्मापेक्षा हिंदुत्ववादी पक्ष-संघटनेचा प्रचार-प्रसार करतो, असेच एकांगी विखारी विचार. म्हणजे ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही ‘जय श्रीराम’चे नारे देणे ममतादीदींना रुचत नाही, तशीच काहीशी गत ही आता विजयन सरकारच्या राज्यात. म्हणजे हिंदू बहुसंख्य असलेल्या आपल्याच देशात आधी ‘जय श्रीराम’वरून अटकसत्र आणि आता मंदिरावर भगवा ध्वज फडकावला म्हणून दमदाटी! पण, केरळमधील हिंदूंच्या मुस्कटदाबीचे, त्यांच्या धार्मिक भावनांशी, श्रद्धांशी खेळ करण्याचा हा काही पहिलावहिला प्रयत्न नक्कीच नाही.


यापूर्वीही विषय शबरीमला मंदिराचा असेल, हिंदूंच्या मिरवणुकांचा असेल, विजयन सरकारचा हिंदूद्वेष वारंवार प्रकट झाला आहेच. एवढेच नाही, तर संघाच्या स्वयंसेवकांसारखा गणवेश घातलेल्या काही लोकांच्या हातात बेड्या घालून त्यांची मिरवणूक काढण्याचा निर्लज्जपणाही ‘पीएफआय’तर्फे केरळमध्येच झाला. आजवर शेकडो संघ-भाजप कार्यकर्ते कम्युनिस्टांच्या क्रूर हिंसेला बळी पडले. हिंदूंवरील ‘अ‍ॅट्रोसिटी’चे प्रमाणही याच केरळमध्ये तितकेच लक्षणीय. आजही केरळमध्ये अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाशिवाय विजयन सरकारचे पानही हलत नाही, अशी स्थिती. मग या समाजासाठी सोयीसवलतींचा वर्षाव असेल किंवा केरळमध्ये फोफावणार्‍या धर्मांधता, कट्टरतेकडे डोळेझाक करणे, विजयन सरकार यातच मश्गुल! म्हणूनच धर्मांध मुसलमानांसाठी ‘इसिस’चा मार्ग हा केरळमधून प्रशस्त होतो. म्हणूनच ‘लव्ह जिहाद’ ही धर्मांध केरळी मदरशांचीच भारताला दिलेली देण आहे आणि याच कट्टरतावाद्यांचे नंदनवन ठरलेल्या केरळमध्ये भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र करण्याचे हिरवे स्वप्न बघणार्‍या ‘पीएफआय’च्या दहशतवाद्यांची विषवल्लीही फोफावली होती. तेव्हा, आधी काँग्रेसी राजवट आणि आता कम्युनिस्टांनी केरळमधील हिंदूंचा वारसा, संस्कृतीलाच जणू गाडायचा चंग बांधलेला दिसतो. म्हणूनच देशभरातील भगव्याची लाट पाहता, हाच भगवा आता कम्युनिस्टांच्या डोळ्यात सलायला लागला आहे.

भारतीय जनता पक्ष आणि मोदींचा करिष्मा हा उत्तर भारतापुरताच मर्यादित नसून दक्षिणेतही भाजपचा जनाधार वेगाने वाढतो आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला भाषेच्या अडचणीपोटी प्रारंभी केरळमध्ये मुसंडी मारुन शिरकाव करता आला नाही. परंतु, आता परिस्थिती आणि चित्र पालटलेले दिसते. केरळमध्येही भाजपचे संघटन जोमाने कार्यरत असून, गेल्या काही निवडणुकीत त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आलेच. तसेच, ज्या वेल्लायनी भद्रकाली मंदिर परिसरात हा सगळा प्रकार घडला, तोही भाजपच बालेकिल्ला मानला जातो. म्हणूनच लालभाईंना भगव्याची इतकी ‘एलर्जी’ की आता त्यांना भगवा रंगच नकोसा झाला. पण, भगव्याशी एकनिष्ठ असलेल्या हिंदू बांधव आणि भगिनींनी रस्त्यावर उतरून अनोख्या पद्धतीने केरळ सरकारचा निषेध नोंदवत, या निर्बुद्ध सूचनेची हवाच काढून टाकली.

तमाम हिंदू भगिनी पारंपरिक केरळी साडीवर भगवे ब्लाऊज आणि मुलीही भगवी ओढणी परिधान करीत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. एवढेच नाही, तर भगव्याला विरोध करणार्‍या पोलिसांना खिजवण्यासाठी, मंदिर परिसरातील पोलिसांच्या विश्रांती, बंदोबस्तासाठीचा तंबूही मुद्दाम भगव्या रंगातच सजवण्यात आला. त्यामुळे आम्हा हिंदूंच्या आस्था, श्रद्धा यांना पायदळी तुडवणारे कोणतेही आदेश आम्ही जुमानत नाही, असा संदेशच या परिसरातील भाविकांनी दिला. सरकारच्या या काही हिंदूद्वेष्ट्यांना खूश करण्याच्या निर्णयाला हिंदू बांधव आणि भगिनींच्या या भगव्या वादळाने एक सणसणीत चपराक लगावली आहे.शबरीमला प्रकरण असो वा आता भगव्याला विरोधाचे विजयन सरकारचे मतपेढीकेंद्रित राजकारण, केरळी हिंदूही जागृत झाला आहे. विजयन सरकार स्वत:ला कितीही निधर्मी, सेक्युलर म्हणवित असले तरी त्यांची नीती आणि कृती याला अजिबात धरुन नाहीच. त्यामुळे हिंदूंवर जितका दबाव वाढेल, हिंदूंचे जितके दमन करण्याचा विजयन सरकार प्रयत्न करेल, त्यापेक्षा अधिक ताकदीने केरळी हिंदू बांधवही आता धर्मरक्षणासाठी, भगव्याच्या सन्मानासाठी मैदानात मुसंडी मारेल, हे निश्चित!
 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.