बाळासाहेब ठाकरे काँग्रेसला बरोबर जागा दाखवायचे! तेव्हाची गोष्ट...

27 Mar 2023 19:01:18
veer-savarkar-mani-shankar-aiyar-2004-andaman-cellular-jail

मुंबई : ही गोष्ट आहे २००४ ची. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर अंदमान निकोबारला गेले. तेव्हा सेल्युलर जेलमध्ये दिव्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पाहून ते इतके चिडले की त्यांनी लगेचच ती नेमप्लेट काढण्याची सूचना केली. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. याला तिथल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला, पण तरीही तिथे सावरकरांचे नाव कोरता आले नाही.त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनीही अशीच भूमिका घेतली. महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांना सावरकरांच्या अपमानाचा बदला घेण्यास सांगितले. मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्यावर ठिकठिकाणी जोडो मारो आंदोलन केले होते. तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते.
 
२००४ साली तत्कालीन काँग्रेसचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांनी वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावेळी मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात २७ ऑगस्ट २००४ रोजी छत्रपती शिवाजी पार्कवर जोडे मारो आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात खुद्द शिवसेनाप्रमुखांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला चप्पल मारली होती. आता काळ बदलला आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा भाग आहेत. आता राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे देशभरात त्यांच्याविरोधात सावरकरप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंनीही आपल्या मालेगावच्या सभेतून राहुल गांधींवर निशाणा साधला. मात्र, त्यांच्याविरोधात एकही शब्द उच्चारला का नाही, असा प्रश्न आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे विचारला जात आहे.
 
मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवरून आता फडणवीस-शिंदे सरकारने त्यांना घेरले आहे. एक तर संपूर्ण काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करा, अन्यथा हे नाटक असल्याचं मान्य करा, अशा आशयाची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. याच वेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो दाखवत त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न केला. त्यावेळी सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. ही हिंमत तुम्ही दाखवणार का? आणि राहुल गांधीना थोबाडीत मारणार का? असा थेट सवाल शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना केलाय.
 
सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं ठाकरे म्हणाले त्यावरून म्हणजे नेमकं काय करणार नाही, असा सवाल ही शिदेंनी केला. शिवसेनेने सावरकरांवरून काँग्रेसला सुनावलेले बोल म्हणजे केवळ नाटक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ते म्हणाले, ‘ फक्त सगळ्या बाजूंनी भडीमार झाला, तेव्हा हे उशीराचं शहाणपण होतं. बोलून काय होणार, हे कृतीतून दिसलं पाहिजे. हे ठरवून सुरु आहे, अशी टीका ही एकनाथ शिंदे यांनी केली आहे.




Powered By Sangraha 9.0