ठाणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत हे राज्यात ज्या भागात दौरा करीत आहेत, त्या दौर्यापूर्वी तेथील ठाकरे गटाचे पदाधिकरी शिंदे गटात सहभागी होण्याची परंपरा कायम असून, मालेगाव येथील सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना पुन्हा जोरदार धक्का बसला असून नाशिकच्या महिला पदाधिकार्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.माजी सभापती, माजी नगरसेविकांसह पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. ठाणे येथील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. जिल्हाध्यक्षपदी अजय बोरस्ते झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला नाशिकमधून सतत धक्के बसत आहे.
रविवारी झालेल्या पक्ष प्रवेशामध्ये महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, माजी नगरसेविका श्यामला दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे, ज्योती देवरे, मनपा शिक्षण मंडळ माजी सभापती शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे, कुमार पगारे, पिंटू शिंदे, अनिता पाटील, आशा पाटील, सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश भार्गवे यांचा समावेश आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे ठाकरे गटातील महिला पदाधिकार्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी १५ ते २० महिला पदाधिकार्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.
ठाकरे गटात भरसभेत लिपस्टिकची चर्चा
ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्यामागचं कारण विचारलं असता या महिला पदाधिकार्यांनी सांगितलं की, नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही. तिथे सभेत स्टेजवर महिलांच्या लाली-लिपस्टिकचा विषय काढला जातो. महिलांबाबत अश्लिल भाषेत कोणी बोलत असेल, आमच्या चारित्र्याला धक्का पोहोचवत असेल तर त्यांच्यासोबत काम करणं आम्हाला शक्य नाही, असेही या महिला पदाधिकार्यांनी म्हटले आहे.