‘इस्रो’ची कामगिरी; एकाच वेळी ३६ उपग्रह अंतराळात

26 Mar 2023 17:16:44
isro-lvm-3-sucessfully-launch-oneweb-36-satelaites-satish-dhavan-space-center-sriharikota


नवी दिल्ली
: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) विकसित ‘एलव्हीएम ३’ या रॉकेटने रविवारी श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ‘वनवेब’ या युनायटेड किंग्डममधील कंपनीच्या ३६ उपग्रहांना पृथ्वीभोवती ४५० किमीच्या कक्षेत प्रस्थापित केले. भारताच्या सर्वात मोठ्या रॉकेटचे सलग सहावे यशस्वी प्रक्षेपण होते.
 
युनायटेड किंग्डममधील ‘नेटवर्क ऍक्सेस असोसिएट्स’ लिमिटेड अर्थात ‘वनवेब ग्रुप’ कंपनीने ‘इस्रो’ची व्यावसायिक उड्डाणांची शाखा असलेल्या ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’सोबत ७२ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी करार केला आहे. ‘वनवेब’ ग्रुप कंपनीचे ३६ उपग्रह यापूर्वी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. रविवारी इस्रोचे हे १८ वे प्रक्षेपण असून हे वर्षातील तिसरे प्रक्षेपण होते. ‘न्यूस्पेस इंडिया’सोबत प्रक्षेपणासाठी १ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा करार करण्यात आला आहे.

 
इस्रोचे ४३.५ मीटर उंचीचे रॉकेट रविवारी सकाळी ९ वाजता ‘सतीश धवन स्पेस सेंटर’मधून २४.५ तासांच्या काउंटडाउननंतर प्रक्षेपित करण्यात आले. भारती एंटरप्रायझेस ही ‘वनवेब ग्रुप’मधील प्रमुख गुंतवणूकदार आहे. ‘वनवेब’ हे एक अंतराळ-आधारित जागतिक संप्रेषण नेटवर्क आहे जे सरकार आणि उद्योगांना दळणवळण प्रदान करते.
 
 
वनवेब’साठीची दुसरी यशस्वी मोहिम


४३.५ मीटर उंचीचे इस्रोच्या रॉकेट


३६ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण

४५० किमीच्या कक्षेत प्रस्थापन

५ हजार ८०५ किलो उपग्रहांचे एकूण वजन
 
१८ वे वनवेबचे प्रक्षेपण



Powered By Sangraha 9.0