मैत्रीचा नवा अध्याय...

26 Mar 2023 21:10:38
Yun Suk-Yeol

एकमेकांचे कट्टर शत्रू इराण आणि सौदी अरेबियात काही दिवसांपासून मैत्रीचे वारे वाहू लागले. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरियातही मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक-योल जपान दौर्‍यावर गेले होते. मागील १२ वर्षांनंतर प्रथमच दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींनी जपानचा दौरा केला. एका जुन्या वादामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव होता, ज्याचे पडसाद टोकियो ऑलिम्पिकदरम्यान पाहायला मिळाले होते. जपान आणि दक्षिण कोरियातील ही मैत्री महत्त्वपूर्ण मानली जात असून अमेरिकेनेही त्याचे स्वागत केले आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल म्हणून या मैत्रीकडे पाहिले जात आहे.

अमेरिका पहिल्यापासूनच दोन्ही देशांतील मतभेद, तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील होता. तत्पूर्वी जपान आणि दक्षिण कोरियातील मतभेदाचे कारण समजून घेणे आवश्यक आहे. १९४५ साली अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केला. या युद्धात जपान एखाद्या शक्तिशाली देशासारखा लढत होता. परंतु, शरणागती पत्करल्याने युद्ध थांबले व कोरिया गुलामगिरीतून मुक्त झाला. १९२० ते १९४५ पर्यंत कोरियावर जपानचे शासन होते. या काळात कोरियन जनतेचे जपानने प्रचंड हाल केले. लोकांकडून जबरदस्तीने कंपन्यांमध्ये काम करवून घेण्यासह महिलांवर अत्याचार करण्यात आले.
 
दुसर्‍या विश्वयुद्धात जपानचे लाखो सैनिक लढा देत होते. या काळात सैनिकांच्या लैंगिक गरजा भागविण्यासाठी जपानने ‘कम्फर्ट स्टेशन’ची अर्थात विशिष्ट इमारतींची निर्मिती केली. यामध्ये सैनिकांच्या खानपानासह लैंगिक गरजा भागविण्यासाठी महिलांना ठेवले जात. यात छोट्या मुलींचा समावेश अधिक होता, ज्यांना ‘कम्फर्ट वुमेन’ म्हटले जात असे. एखादी महिला लैंगिक आजाराने ग्रस्त झाली, तर तिला जाळून टाकले जात किंवा बंदुकीतील गोळी वाचविण्यासाठी बंदुकीच्या टोकाने तिला ठार केले जाई. स्वातंत्र्यानंतर अनेक पीडित महिला तथा कामगारांनी नंतर जपानला कायदेशीर आव्हान दिले. परंतु, १९६५ साली झालेल्या करारानुसार या सर्व मुद्द्यांचे निराकरण झाले असल्याचे जपानचे म्हणणे आहे. त्यानंतर कामगारांना व पीडितांना योग्य मोबदला देण्याच्या मुद्यावर करार झाल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव काहीसा निवळला. परंतु, संपूर्ण समाधान होत नसल्याने तेव्हा दक्षिण कोरियाच्या तत्कालीन सरकारने अमेरिका आणि जपानच्या त्रिराष्ट्र सैन्य सूचना सहकार्य करारातून माघार घेण्याची घोषणा केली.

अणवस्त्र सज्ज उत्तर कोरियाचा सामना करण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण होता. दोन्ही देश एकत्र आले नाही तर त्याचा थेट परिणाम येथील सुरक्षेवर होणार, हे अमेरिकेने ओळखले. अमेरिका हिंद-प्रशांत महासागरात चीनचा सामना करत असून त्याला रोखण्यासाठी ‘क्वाड’ समूहाचे गठन करण्यात आले. यात अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश आहे. दक्षिण कोरियादेखील या भागातील महत्त्वाचा देश आहे. उत्तर कोरिया आणि चीनसोबत अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण असून जपान आणि दक्षिण कोरिया या भागातील महत्त्वाचे सहकारी आहेत. अशात चीन आणि उत्तर कोरियाचा सामना करण्यासाठी या दोन्ही देशांचे संबंध चांगले राहणे गरजेचे आहे. यासाठीच अमेरिका या दोन्ही देशांतील नाराजी व मतभेद कमी करण्यासाठी प्रयत्न करत होता. वर्षभरापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनीही दक्षिण कोरिया आणि जपानचा दौरा केला होता.

दरम्यान, आता जपान आणि दक्षिण कोरियाच्या मैत्रीमुळे या भागात अमेरिकेची पकड मजबूत होण्यासह चीनचा वाढता प्रभाव आणि उत्तर कोरियाच्या वाढत्या हालचालींना लगाम घालता येणार आहे. दक्षिणी चीन समुद्रासह हिंद-प्रशांत भागात चीनचा प्रभाव वाढत असून त्याचा सामना करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, हे दोन्ही देश जाणून आहे. मैत्रीचा नवा अध्याय हे त्याचेच द्योतक आहे. ’दुश्मनी जमकर करो, लेकीन ये गुंजाईश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो हम शर्मिंदा ना हो,’ या बशीर बद्र यांच्या ओळी या मैत्री अध्यायाला तंतोतंत लागू होतात. आता ही मैत्री कुठवर टिकते आणि किती परिणामकारक ठरते हे येणारा काळच ठरवेल.




 
Powered By Sangraha 9.0