प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन आधुनिक काळात शक्य?

    26-Mar-2023   
Total Views |
Ancient Indian Water Management

 
संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जलदिनाच्या पूर्वसंध्येला आंतरराष्ट्रीय पाणीप्रश्नावरती एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार २०५०मध्ये दोन अब्जांहून अधिक लोक हे जलमस्येने ग्रस्त असतील आणि यात भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असेल. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्चासत्रात ‘प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाचे आधुनिक काळातील उपयोजन’ हा शोधनिबंध सादर केलेल्या वसुमती करंदीकर हिची घेतलेली मुलाखत...
 
 
प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन हा विषय तुला का घ्यावासा वाटला?


प्रथमत: अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तसेच मानवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता ही असतेच. पाण्याला ’जीवन’ असेही मराठीमध्ये म्हटले जाते. केवळ ‘पाणी’ एवढाच विषय महत्त्वाचा नसून त्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. ‘जलव्यवस्थापन’ हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून प्राचीन काळातही जलव्यवस्थापनाचे अनेक संदर्भ आढळतात. प्राचीन काळातील या संदर्भांचा अभ्यास केला असता तत्कालीन स्थापत्यरचना, नागरी संस्कृती, नगरव्यवस्थापन, जलव्यवस्थापन आणि सांस्कृतिक गोष्टींचे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात. त्यांनी केलेले सुयोग्य जलव्यवस्थापन बघताना माझ्यासमोर आताच्या जलसमस्या होत्याच. तत्कालीन जलव्यवस्थापन आत्ताच्या काळात वापरले जाऊ शकते का, याविषयी उत्सुकता वाटल्यामुळे मी हा विषय संशोधनासाठी घेण्याचे ठरवले. पुणे येथे संपन्न झालेल्या ‘ इंडियन नॉलेज सिस्टीम इन दि कन्टेस्ट ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०’ या राष्ट्रीय चर्चासत्रात मी हा शोधनिबंध सादर केला.

 
या विषयावरती आधी काही संशोधन झालेले आहे का?


प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन बघताना मी विविध भारतीय संस्कृतींचा अभ्यास केलेला, ज्यात हडप्पा, मोहेंजदडो, माहेश्वरी, रंगपुरी या संस्कृतींचा विशेषत्वाने समावेश होता. या संस्कृतींचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, संशोधन झालेले आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि उत्खनन, स्थापत्यरचना या विषयांवरती अनेक शोधनिबंध उपलब्ध आहेत. प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनासह मी मध्ययुगीन जलव्यवस्थापनाचा अभ्यास केलेला होता. ज्यात बारव विहिरींचा समावेश आहे. ’बारव’ संकल्पनेविषयीसुद्धा रोहन काळे, रोहित जाधव या तरुणांनी बरेच काम केलेले आहे. महाराष्ट्रातील त्याने जवळजवळ १६५० बारव विहिरी शोधून काढल्या आहेत. आधुनिक काळातील जलसमस्यांवरती तर अनेक शोधनिबंध उपलब्ध होतात. परंतु, हे सर्व संशोधन त्या-त्या क्षेत्रापुरते मर्यादित आहे. आज आपल्याला भेडसावणारी पाणीटंचाई, जलव्यवस्थापन यासंदर्भातील प्राचीन शास्त्रांचा आधार घेऊन उपयोजित संशोधन आणि दिसून येत नाही. म्हणून ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ यांच्या अंतर्गत मी प्राचीन जलव्यवस्थापन आताच्या काळात उपयुक्त ठरू शकते का आणि कसे, तसेच ते ज्ञान आतच्या शैक्षणिक प्रणालीत कसे आणता येईल, या विषयी संशोधनाचे काम केले. प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाचे आधुनिक काळातील उपयोजन या शोधनिबंधात मी प्राचीन जलशास्त्राचे आधुनिक काळात कसे उपयोजन करू शकतो, याचा विचार केला आहे.

प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जलव्यवस्थापनाचे तुला कोणते संदर्भ आढळले?


मानवाचं अस्तित्व हे वैदिक काळापासून मानले आहे. अगदी मानवाचा प्रथम अस्तित्वाचा संदर्भ वैदिककालीन घेतला, तर इ. स. पूर्व ६००० ते इ. स. पूर्व २५००पर्यंतचे उल्लेख आपल्याला सापडतात.वेदकालीन संस्कृतीत जलदेवतेला महत्त्व दिलेले आढळते. इंद्र, वरुण देवतांमुळे पाऊस येतो किंवा मानवाला पाणी मिळते अशी तत्कालीन समाजाची धारणा आहे. तसेच, पुढे आपण हडप्पाकालीन संस्कृती, मोहेंजदडो, माहेश्वरी आणि रंगपुरी या संस्कृतींचे संदर्भही मला मिळाले आहेत. या शहरांच्या नगररचनेत साम्य आहे. येथील बरीचशी घरे दुमजली व क्वचित तीन मजली होती. सामान्यत: प्रत्येक घरात मध्यभागी चौक व चहुबाजूस राहण्याच्या खोल्या होत्या. वरच्या मजल्यावर जाण्यास घराबाहेरून अरुंद व उंच जिना असे. प्रत्येक घरात स्नानगृह, मोरी, मधल्या चौकात विहीर, वरच्या मजल्यावरही स्नानगृह आढळले आहेत. यावरून प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र बिर्‍हाडे असावीत. स्नानगृहास एका बाजूस उतरती फरसबंदी असे व आतील बांधकाम पक्के करीत. अर्ध्या भिंतीपर्यंत पक्की चुनेबंदी करून वर डांबराचा दाट थर देत व कुठेही पाणी मुरणार नाही, याची काळजी घेत वरच्या मजल्यावरील सांडपाणी खालच्या तळमजल्यात सोडण्याची व्यवस्था असे. मग हे सांडपाणी बंदिस्त गटारातून दूरवर नदीत सोडत. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एका ओळीत ही घरे असत.



मोहेंजदडो येथील किल्ल्यामध्ये एक विस्तीर्ण स्नानगृहाचा विस्तार १८० बाय १०८ एवढा प्रचंड आहे. त्याच्या मध्यभागी ३९ बाय २३ बाय ८ खोल स्नानकुंड असत. कुंडात उत्तरेच्या बाजूस लहान मुलांसाठी पायर्‍यांजवळ कुंडाची खोली कमी असलेली दिसते. तलाव साफ करण्याच्या सोयीसाठी नैऋत्येच्या बाजूस तळमोरी ठेवलेली दिसते. आग्नेयेस असलेल्या विहिरींमधून तलावास पाणीपुरवठा केला जात असे. तत्कालीन नगरांतील घरांमध्ये विहीर असली, तरी काही ठिकाणी सार्वजनिक विहिरी आढळतात. नदीकाठावरील ही शहरे असल्याने विहिरींना भरपूर पाणी लागत असे. विहिरीभोवती चुनेबंदी असून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बांधीव गटारे आढळतात. जमिनीखालील जलस्रोतांचे विहिरीमध्ये संचय करून जीवनोपयोगी पाणी वर्षभर कसे पुरवावे, हे त्यावेळच्या लोकांना माहीत होते, हे संदर्भ आपल्याला दिसतात.

पुढे चंद्रगुप्त मौर्यच्या काळात तलाव व धरणे बांधून पाटाने किंवा कालव्याने शेतीला आणि शहराला पाणीपुरवठा करण्याच्या तांत्रिक बाबी अवगत झाल्या होत्या. चंद्रगुप्त मौर्य याचा गिरनार येथील सुभेदाराने गिरनारच्या डोंगरातील जलप्रवाह अडवून ’सुदर्शन तलाव’ बांधला. त्यानंतर सम्राट अशोकाने साधरण इ. स. पूर्व ३०४ - इ. स. पूर्व २३२ या काळात त्यामध्ये सुधारणा करून त्यातील पाणीपुरवठा शेतीला करण्याची उत्तम सोय केली गेली. तसेच मौर्यकालीन कौटिल्याच्या कौटिलीय अर्थशास्त्रातील स्थापत्यविषयक ग्रंथात नगररचना, यांत्रिकीतंत्र व नियोजनबद्ध जलव्यवस्थापन योजना दिसून येतात. या ग्रंथात धरणे कशी बांधावीत, धरण बांधण्याचे नियम, बागायती जमिनीचे महत्त्व, शेतीसाठी पाट व कालव्याच्या पाण्याचा वापर, पाणी व जमीन यांचे व्यवस्थापन, पर्जन्यमापक (पाऊस मोजण्याचे साधन) इत्यादींची सविस्तर माहिती त्यात आहे. इ. स. पूर्व चौथ्या शतकातील हा ग्रंथ पाहता प्राचीन काळी भारतीयांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, स्थापत्य तसेच तंत्रज्ञानात जी प्रगती केली होती, तिचा आवाका लक्षात घेतल्यास थक्क व्हायला होतो. गुप्तकाळात म्हणजे साधरण इ. स. ४९०-५८७ दरम्यान वराहमिहिराने ’बृहत्संहिता’ हा ज्योतिषविषयक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या संहितेत ’अर्थ दृगार्गल’ म्हणजे जमिनीतील पाण्याचे झरे समजण्याचे शास्त्र व विहीर कशी खोदावी व कशी बांधावी, याची माहिती त्यात आहे. त्याने निरीक्षणातून जमिनीखालील वाहत्या जलस्रोताचा वेध घेऊन वाळवंट, माळरान, डोंगरमाथा व खडकाळ जमिनीवर विहीर कशी खोदावी, जमिनीत नेमके पाणी कुठे आहे, ते ओळखण्यासाठी नैसर्गिक साधने कोणती याची विस्मयकारक माहिती या ग्रंथात दिली आहे. असे अनेक संदर्भ प्राचीन भारतीय संस्कृतीत आढळतात.

 
मध्ययुगीन काळातही जलव्यवस्थापनाची उदाहरणे आढळतात. त्याविषयी काय सांगशील?


मी या शोधनिबंधात केवळ भारतीय मध्ययुगीन काळाचा विचार केला आहे. या मध्ययुगीन काळातील जलव्यवस्थापनाची काही उदाहरणे म्हणजे, तामिळनाडू राज्यातील १८०० वर्षांपूर्वी बांधलेले आणि आजही वापरात असलेले कल्लानाई धरण देता येईल. गुजरातमधील ‘रानी का वाव’ ही सात मजली विहीर, जी ‘युनेस्को’च्या संरक्षित स्मारकांच्या सूचीत समाविष्ट आहे. तसेच उत्तर पेशवाईत संभाजीनगर जिल्ह्यातील गोगानाथनगरमध्ये बांधलेले ‘थत्ते नहर’, पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणीपुरवठ्याची रचना, बुर्‍हालणपूरला (मध्यप्रदेश) आजही अस्तित्वात असलेली ५०० वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना, पंढरपूर-अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहनकालीन बांधलेली बारव, ‘समरांगण सूत्रधार’ या ग्रंथाच्या आधाराने राजा भोज यांनी बांधलेला भोपाळचा मोठा तलाव, अशी उदाहरणे देता येतील.


गोंडकालीन जल व्यवस्थापन हाही एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. गढा-मंडला (जबलपूर) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचे राज्य होते. ‘गोंडकालीन जल व्यवस्थापन’ या हिंदी पुस्तकात अनुमाने ५०० ते ८०० वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात पाण्याचे नियोजन किती उत्कृष्टपणे केले होते, याचे वर्णन आलेले आहे.तसेच मी बारवचा अभ्यास या दरम्यान केला. भारतामध्ये आणि त्यात विशेष करुन महाराष्ट्रामध्ये ‘बारव’ आढळतात. यालाच पायविहिरी म्हणतात. या यादव, शिवकालीन, पेशवेकालीन, होळकर या वेगवेगळ्या राजवंशांमध्ये बांधल्या गेल्या. या विहिरींचे आकार हे वर्तुळाकार, आयताकृती, चौरस, षट्कोनी, अष्टकोनी असतात. या विहिरींची जलक्षमता दहा लाख लीटरहून अधिक असते. तसेच पाणीसाठ्याकरिता मोठे हौद बांधलेले आढळतात. असे मध्ययुगीन जलव्यवस्थापनाचे संदर्भ दिसले.


 
तुझ्या संशोधनानुसार आधुनिक काळात काय जलसमस्या आहेत आणि त्याच्या निराकरणासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?


पाण्याचा विचार केला तर ९७ टक्के पाणी हे महासागरांमध्ये आहे. केवळ तीन टक्के पाणी वापरण्यायोग्य, पिण्यायोग्य आहे. त्यातही केवळ २.१ टक्के पाणी घनस्वरुपात आहे आणि उर्वरित ०.९ टक्के पाणी हे आपल्याला नदी, सरोवरे इत्यादींमध्ये आढळून येते. मी या संदर्भातील तक्ते माझ्या शोधनिबंधामध्ये दिले आहेत. सध्या अनेक भागांमध्ये पाणीकपातीची समस्या भेडसावत आहे. जलप्रदूषण तर आहेच. त्याची कारणं सर्वज्ञात आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळाचीही भीषण समस्या आहे. असलेले जलस्रोत सांडपाण्याच्या नियोजनाअभावी खराब होत आहेत.

वाढती लोकसंख्या आणि गरजेनुसार वाढती मागणी आणि त्यामानाने कमी होणारा पाणीपुरवठा ही मुख्य समस्या आहे. आपल्याकडे उपलब्ध जागेवरती सिमेंटच्या इमारती, रस्ते बांधले गेले. ते नियोजित नसल्यामुळे पाणी जिरणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन, पिण्यायोग्य पाणीपुरवठा यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने पडणारा पाऊस हा सरासरीच्या ९८ ते १०२ टक्के असलातरी नियोजनाअभावी पावसाची कमतरता जाणवते. यावर तोडगा म्हणून सरकारच्या काही योजना आहेतच, त्याबरोबरच ‘नाम फाऊंडेशन’, ‘पाणी फाऊंडेशन’, ‘ग्रामस्वराज्य योजना’ यासारख्या योजना आणि अशासकीय संस्था कार्यरत आहेत. केंद्र सरकारतर्फे जलसंवर्धनाच्या योजना, ‘नमामि गंगा’, ‘नमामि गोदा’ यासारख्या योजनांमुळे नदी संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. गोव्यामध्ये जलशुद्धीकरण, जलपुनर्वापर याचे प्रकल्प सुरू आहेत. परंतु, अनेक योजनांमध्ये नव्याने पाण्याचे स्रोत निर्माण केले जातात. हे स्रोत निर्माण करण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असलेले स्रोतच पुन्हा वापरात कसे आणता येतील, याचा विचार व्हायला हवा. प्राचीन काळातील एक महत्वाचा जलसाठा असलेले बारव, ज्यात दहा लाख लीटर पाण्याचा साठा राहू शकतो, असे स्रोत संवर्धित करून वापरात आणले पाहिजेत.

प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाचे आजच्या काळात काय उपयोजन आहे? तुझ्या शोधनिबंधाचे निष्कर्ष काय आहेत?


‘प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाचे आधुनिक काळातील उपयोजन’ या विषयावर संशोधन केल्यावर आलेले शोधनिबंधाचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. वराहमिहीर रचित ‘बृहतसंहिता’, तसेच स्थापत्यशास्त्राच्या ग्रंथांचा अभ्यास केला, तर आदर्श शहर कसे असावे, याचे उल्लेख सापडतात. आजच्या अभियांत्रिकीमध्ये त्याचे उपयोजन करून आपण ’प्लान सिटी’ निर्माण करू शकतो. विविध जलयोजना केवळ विहिरी खोदणे आणि बोअरवेल्स याच्यावर भर देतात. यापेक्षा वराहमिहीरने जलसाठवणुकीचे जे उपाय दिले आहेत, तसेच जलपुनर्वापरासंदर्भात आयुर्वेदाच्या चरक संहितेमध्ये उपाय सापडतात, त्यांच्या आधारे वैयक्तिक स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत पाणी पुनर्वापरासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आपल्याकडे अनेक बारव उपलब्ध आहेत.


बहुतांशी बारव विदर्भ-मराठवाडा, दुष्काळग्रस्त भागात आहेत. त्या बारव स्वच्छ करून, त्यांचे जलझरे पुन्हा सुरू करून त्या वापरात आणता येऊ शकतात. हडप्पा-मोहेंजदडो, माहेश्वरी संस्कृतींचा अभ्यास करून भुयारी जलमार्ग आणि मलनिस्सारण आणि उपयुक्त जलमार्ग यांच्या बांधकामाचा आपण अभ्यास करू शकतो. यावरून प्राचीन भारतीय ज्ञानशाखेत स्थापत्यविचार अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने केलेला दिसून येतो. नगररचना कशी असावी, याचा विचार करताना जलव्यवस्थापन त्यांनी योग्य पद्धतीने केलेले आहे आणि मुख्यत: मलनिस्सारण आणि उपयुक्त जल या दोहोंचा विचार नगररचनेत केला आहे.त्यामुळे प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाचे आधुनिक काळातील उपयोजन करणे शक्य आहे. याचा अभ्यास अभियंता,सरकार, जल योजना निर्माण करणारे यांनी करायला हवा आणि मुख्यत: याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी.






 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.