छोट्या शेतकर्‍यांचा लोहार गेला...

25 Mar 2023 20:39:24
Dada Wadekar blacksmith of small farmers

 
दादा माझ्या वडिलांच्या पिढीतले. मूळचे अभियांत्रिकी उद्योजक. ठाणे (आता पालघर) जिल्ह्यातल्या वाडा गावचे. तिथे एस्टी स्टॅण्डवर उतरून कोणालाही विचारावं, दादा वाडेकरांचे घर... पत्ता लगेच मिळायचा. अनेकांचे पत्ते दादांच्या घराच्या संदर्भाने असायचे. घर काही असामान्य नव्हते. माणूस असामान्य होता...

उद्योग पुढच्या पिढीकडे सोपवून दादांनी शेतीत उतरायचे ठरवले आणि काम करताना लक्षात आले की, मजुरांचे आणि छोट्या शेतकर्‍यांचे हाल होतात, अवजारे योग्य नसल्यामुळे. मग दादांच्या शब्दात सांगायचं, तर ते लोहार झाले त्यांनी अवजारांवर संशोधन सुरू केले.भात कापताना करंगळीला जखम होऊ नये म्हणून विळ्याच्या पात्याला एक एल्बो जोड देऊन पात्याचा कोन त्यांनी बदलला. कानशीने घरीच धार लावता येईल, असा धातू वापरला. मग चिकूसाठी वेगळा झेला, आंब्यासाठी वेगळा. त्यात देठ तुटू नये अशा पद्धतीने पाते लावलेले. मोगर्‍यात किंवा छोट्या झुडपी पिकात फांद्या कापण्यासाठी जी कात्री केली, तिला अंगठ्याभोवती सहज लटकेल असे इलॅस्टिक लावले.

छोट्या सरी काढताना योग्य असे फावडे आणि त्याच फावड्याच्या मागील बाजूला टिकावाचे पाते लावलेले... म्हणजे एकच अवजार मळ्यात नेले तरी दोन्ही कामे होतील. भुईमूग पाल्यापासून वेगळा करण्याची विळी तर गजब आहे. पात्याला आणि मुख्य अंगाला वेगवेगळे धातू वापरून अनेक अवजारांचे वजन त्यांनी कमी केले होते. यातली अनेक अवजारे मी स्वतः वापरून पाहिली आहेत. एकदा आमच्या चळवळीच्या गावातल्या १०० शेतकर्‍यांना त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. तेव्हा ३०-३५ प्रकारची अवजारे या सर्वांनी वापरून पाहिली. आणि हरखून गेले. प्रत्येकाने काही ना काही खरेदी केलेच. शहरातले मॉल बघून आमच्या शेतकर्‍यांना कधी काही खरेदी करावेसे वाटत नाही, त्यातले काही त्यांच्या जगातच नसते. पण, दादांच्या वर्कशॉपवर मात्र काय घेऊ नि काय नको असे त्यांना झाले होते. अनेक जणांनी तर गटाने भिशी करून हत्यारे घेतली.

दादांकडे अशा अनेक ठिकाणचे शेतकरी येत. काही वेळा आपल्या अडचणी सांगून दादांना एखादे नवीन अवजार तयार करायला लावत. अडचण कळली की दादा सळसळत्या उत्साहाने संशोधनाला लागत. वयाच्या ८०व्या वर्षांपर्यंत मी दादांना ठणठणीत आणि सक्रिय पाहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दादा जुने कार्यकर्ते. यशस्वी उद्योजक असूनही श्रीमंती त्यांनी कधी अंगावर मिरवली नाही. आपल्या जीवनातल्या प्रत्येक कृतीतून समाजरूप जनार्दनाची सेवा म्हणजे संघाचे काम, असे मानणार्‍या आणि जगलेल्या पिढीतले दादा वाडेकर! परवा त्यांनी देह ठेवल्याचे कळले. एका सुफल जीवनाचे निर्माल्य झाले...


-मिलिंद थत्ते

Powered By Sangraha 9.0