प्लास्टिकच्या खडकांचा धोका

24 Mar 2023 20:59:34
 
Plastic rocks
 
 
प्लास्टिकपासून अनेक वस्तू बनतात हे खरे. परंतु, प्लास्टिकचा खडक आढळणे ही बाब तशी आश्चर्यचकित करणारी. परंतु, होय हे खरे आहे! ब्राझीलच्या ट्रिनडेड ज्वालामुखी पर्वतावर प्लास्टिकचे खडक आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, याठिकाणी कुठलीही मानवी वस्ती वा मानवाचा वावर नसतानाही हे खडक मोठ्या प्रमाणावर आढळून आले. दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझीलपासून जवळपास 1 हजार, 140 किलोमीटर दूर दक्षिण अटलांटिक महासागरात हे ट्रिनडेड ज्वालामुखी प्रकाराचे बेट आहे. संशोधनासाठी गेलेल्या पराना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना हे प्लास्टिकचे खडक तिथे सापडले. ट्रिनडेड बेट हे ब्राझीलच्या पूर्वेकडील सर्वात दूरचे टोक असून हे ज्वालामुखी बेट तब्बल तीन दशलक्ष वर्षांपूर्वी बनले असण्याची शक्यता आहे. बेटाची उंची 600 मीटर, तर सहा हजार मीटर इतकी समुद्राची खोली. समुद्री पक्षी, जीव, स्थानिक वनस्पती आणि विविध प्रजाती याठिकाणी आढळतात. या बेटाच्या आसपास प्रवाळ, शार्क आणि डॉल्फिनचेही प्रमाण अधिक आहे. विशेषतः ट्रिनडेड बेट हिरव्या समुद्री कासवांसाठीचे संपूर्णतः संरक्षित क्षेत्र मानले जाते. म्हणजेच, याठिकाणी मानवाचा कोणताही वावर अथवा वास्तव्य नव्हते आणि यापुढेही नसण्याची शक्यता नाही. त्यामुळे मानवी वास्तव्य नसतानाही या संपूर्णतः संरक्षित क्षेत्रात प्लास्टिक नेमके कसे पोहोेचले, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 
हे प्लास्टिक मासेमारीच्या माध्यमातून या ठिकाणी आल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे. शास्त्रज्ञांना याठिकाणी मासेमारीसाठी वापरले जाणारे जाळे मोठ्या प्रमाणावर आढळून आले. त्याचसोबत इतर प्लास्टिकचा कचराही याठिकाणी आढळला. समुद्री लाटा आणि वार्‍यामुळे हे प्लास्टिक व इतर कचरा बेटाच्या किनार्‍याला साचला. तापमानात वाढ झाल्यानंतर हे प्लास्टिक वितळते आणि किनार्‍यावरील गाळाचे कण आणि इतर कचर्‍याच्या मिश्रणाशी एकरूप होते. त्यानंतर हे प्लास्टिक घट्ट होऊन त्याचे हिरव्या-निळ्या रंगाचे खडक तयार होतात. गाळाचे कण आणि इतर कचर्‍याच्या मिश्रणाने बनलेल्या या ‘प्लास्टिग्लोमेरेट्स’ नावाच्या खडकांना प्लास्टिक एकत्र ठेवते. प्लास्टिकच्या या खडकांमुळे समुद्री प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्लास्टिकच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. भारताने प्लास्टिकचा धोका वेळीच ओळखत योग्य पावले उचलली. भारताने सिंगल युज प्लास्टिकवर तसेच, 50 हून कमी मायक्रोनच्या प्लास्टिकवरही बंदी घातली. कारण, 50 पेक्षा अधिक मायक्रोनच्या प्लास्टिकचा पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर करता येऊ शकतो.
 
दरम्यान, समुद्रातील प्लास्टिक समुद्राला धोकादायक ठरू शकते. तसेच, ते समुद्रातील जीव, वनस्पती आणि प्रजातींनाही धोकादायक ठरते. जवळपास 12 दशलक्ष टन प्लास्टिक दरवर्षी समुद्रात टाकले जाते. यावरून प्लास्टिकच्या समस्येची भीषणता समजून घेता येते. सध्या प्लास्टिकचे खडक आढळून आले आहे. परंतु, येणार्‍या काळात प्लास्टिकचे पर्वत, टेकड्या आढळून आल्या, तर आश्चर्य वाटायला नको. मायक्रो प्लास्टिकचे वाढते प्रमाण थांबवणे आवश्यक असून पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकचा वापर वाढवणे गरजेचे आहे. परंतु, प्लास्टिकच्या पुनर्प्रक्रियेचे प्रमाण जवळपास दहा टक्के इतकेच आहे. पुनर्प्रक्रिया, पुनर्वापर आणि जागतिक दृष्टिकोन आणि प्रयत्नांमुळे या समस्येचे निराकरण काही प्रमाणात शक्य आहे.
 
‘फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पराना’चे भूगर्भशास्त्रज्ञ फर्नांडा एव्हेलर सँटोस आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रासायनिक चाचण्यांच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आणली. ही बाब नवीन आणि भयंकर असून प्रदूषण आता भूगर्भशास्त्रापर्यंत पोहोचले आहे. जिथे हे प्लास्टिकचे नमुने सापडले, ते ठिकाण ब्राझीलमधील कायमचे संरक्षित क्षेत्र आहे. या संरक्षित क्षेत्रात हिरवी कासवे त्यांची अंडी घालत असल्याचे सँटोस म्हणतात. तसेच, “प्लास्टिकच्या खडकांच्या शोधामुळे पृथ्वीवरील मानवाच्या भविष्यावर आणि येणार्‍या पिढीसमोरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण, समुद्री कचरा आणि महासागरांमध्ये मानवाकडून चुकीच्या पद्धतीने टाकल्या जाणार्‍या प्लास्टिकचे रूपांतर आता भूगर्भीय साहित्यात होत चालले आहे,” असे सँटोस यांचे म्हणणे आहे. एकूणच प्लास्टिकचा धोका वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना केल्या नाहीत, तर असे असंख्य ट्रिनडेड बेटे तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0