शोभा यात्रांचा जल्लोष

    23-Mar-2023
Total Views |
मुंबई : शालिवाहन शक कालगणनेनुसार आज चैत्र प्रतिपदेच्या मुहूर्तावर हिंदू कालगणनेनुसार नववर्ष साजरे केले जाते. या दिवशी विजय दिन म्हणून महाराष्ट्रात दारापुढे रांगोळ्या रेखून गुढ्या उभारल्या जातात. तसेच गावोगावी शोभा यात्रा आयोजित केल्या जातात. यातून समाजप्रभोधनाचे अमूल्य काम केले जाते तसेच संस्कृती दर्शनही होते. काही निवडक ठिकाणी आयोजित केलेल्या शोभा यात्रा..

shobhaytara 
 
ठाण्यात दि. २२ मार्च रोजी सकाळी ठीक ६:४५ वाजता शिवाजी महाराजच्या पुतळ्याला वंदन करून श्री. कौपिनेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेस प्रारंभ झाला. पारंपारिक वेशभूषा घालून सर्व ठाणेकर शोभा यात्रेत सामील झाले होते. श्री कौपिनेश्वर आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळे यावेळी पार पडले. १९ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, शोभायात्रेत छायाचित्र स्पर्धा तसेच सेल्फी विथ शोभा यात्रा अशाही नव्या पिढीला, तरुणाईला आकर्षून घेणाऱ्या होत्या. वीरगर्जना पथक आपले ध्वज फडकावत उल्हासात ढोल व ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत करत होते. वाहनांवर मल्लखांब लावून बालमल्ल आपली कौशल्ये दाखवत होते. वेशभूषा स्पर्धेत अनेक जण स्वातंत्र्यसैनिकांचे वेष परिधान करून उपस्थित होते.
 
या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून, हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कुर्ला पश्चिम मार्फ़त स्वातंत्र्या नंतरच्या काळातील भारतीय यशाचा तसेच गौरवास्पद घटनांचा जागर करण्यात आला. "यशोस्तुते - भरारी स्वतंत्र भारताची" या संकल्पने अंतर्गत भारत सिनेमा येथे भव्य सजावट करण्यात आली होती. यामध्ये सात मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. तसेच चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ करण्यात आला. नववर्ष यात्रेत आकर्षक चित्र रथांच्या माध्यमातून स्वातंत्र्या नंतरच्या गौरवशाली घटनांचा जागर करण्यात आला. पारंपरिक वेषात स्त्री पुरुष लहान मुले यांनी परिसर गजबजून गेला होता. लहान मुलांचे पिरॅमिड, ढोल पथके, शिवकालीन शस्त्रकला या प्रत्यक्षिकांचे सर्वांनी कौतुक केले. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.
 
नववर्ष स्वागत यात्रा समिती, आगाशी ह्या संस्थेतर्फे समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. कोव्हिडकाळात गेल्या तीन वर्षात ही यात्रा होऊ शकली नाही. म्हणून ह्यावर्षी गुढीपाडवा दिनांक, २२ मार्च २०२३ रोजी स्वागत यात्रा आयोजित केली होती. स्वागतयात्रा संध्याकाळी साडेचार वाजता आगाशी गावातील विष्णूमंदिर येथून निघाली व सांगता श्रीभवानी शंकर मंदिराच्या पटांगणात झाली. यात्रेत अनेकांनी आपले गुण दर्शन केले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला, पुरुष व मुले एकत्र आली होती. योगासने व योग प्रात्यक्षिकांचे प्रयोग लहान मुलांनी केले.
 
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, कांजूर भांडुप येथील सकल हिंदू समाजाने स्वागत यात्रा आयोजित केली होती. यावेळी लाव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा यावा तसेच लाव जिहाद विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने दैनिक मुंबई तरुण भारतच्या उपसंपादक योगिता साळवी यांना प्रमुख अतिथी, वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. हिंदू समाज आणि लव्ह जिहाद या विषयावर त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी RSS स्वयंसेवक, खा. मनोज कोटक सर, स्थानिक भाजप पदाधिकारी आणि हजारो नागरीक उपस्थित होते. महाराष्ट्रात लव्ह जिहाद धर्मांतर विरोधी कायदा पारित व्हायला हवाच अशी मागणी यावेळी सर्व उपस्थितानी केली. या यात्रेच्या समारंभ प्रसंगी ईशान्य मुंबईचे माननीय खासदार श्री मनोज कोटक, सौ सारिका मंगेश पवार, सौ सुवर्णा करंजे, श्री बाबा कदम, श्री सुरेंद्र बेलवलकर .90 पेक्षा अधिक पंथ संप्रदाय सामाजिक संस्था मंडळ , उंच इमारतीत राहणारे नागरिक तसेच सामान्य वस्तीत राहणारे सर्वसामान्य नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती.
 
मुंबईतील दहिसर या उपनगरात उत्साहाने दहिसरच्या शोभायात्रेचे आयोजन केले होते. या वर्षी नव वर्ष पूर्व संध्येला म्हणजेच मंगळवार दिनांक 21 मार्च रात्री 8 वाजता दहिसर नदीच्या काठी, श्री विठ्ठल रुक्मिणी च्या भव्य प्रतिमा उभारल्या होत्या. दश सहस्त्र दिव्यांनी नदीचा काठ उजळून निघाला होता. नागरिक हा दीपोत्सव साजरा करत असताना सामाजिक संकल्पाचे दीप प्रज्वलित करत आहोत, या भावनेने एकत्र जमले होते. विठुमाऊली ची महा आरती व दक्षिण भारतातील प्रसिद्ध चेंडा मेलाम वादन असे कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने पार पडले.
 
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान, गिरगाव शाखेने यावर्षी नव वर्ष स्वागत यात्रा उत्साहात आयोजित केली होती. गिरगावच्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये यावर्षी पहिल्यांदा लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद ड्रग्स जिहाद विरोधी रथ निघाला. दै. मुंबई तरुण भारत च्या उपसंपादक योगिता साळवी यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली होती. यात्रेच्या माध्यमातून गिरगाव मधील विविध चौकात लव्ह जिहाद विरोधात जागृती सभा यानिमित्ताने घेण्यात आल्या. हिंदू धर्माविषयी प्रबोधन करण्यात आले.
 
पार्ल्यातील टिळक मंदिर येथे लोकमान्य सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी शताब्दी वर्षानिमित्त जंगी यात्रेचे आयोजन केले होते. पाच दिशांनी पाच वेगवेगळ्या संकल्पना घेऊन ही यात्रा टिळक मंदिर येथे येऊन पोहोचली. यात अनेक चित्ररथ विविध संदेश देत प्रदर्शित करण्यात आले, चित्रफिती दाखवण्यात आल्या, खेळ व मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या शोभायात्रेनेक्स टिळक मंदिराच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचा समारोप पार पडला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.