डॉ.मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

23 Mar 2023 18:20:06
punya-bhushan-award-announce-to-actor-mohan-agashe
पुणे : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३३ वर्षे सातत्याने दिला जाणारा आणि देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२३ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ’दै.मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
 
जुलै महिन्यात हा दिमाखदार सोहळा होणार असून या पुरस्कराचे यंदाचे ३४ वे वर्ष आहे. सलग ३३ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला. स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणार्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये सेलर राधाकृष्णन्, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद आहे. पुण्यात राहत असल्याने पुण्याचा गौरव असलेला हा पुरस्कार मिळणे आपल्या अभिनय कारकिर्दीसाठी महत्त्वाचा आहे. माझ्यावर प्रेम करणार्या रसिकांनादेखील याचा आनंद आहे.(डॉ.मोहन आगाशे, अभिनेते)
Powered By Sangraha 9.0