पवारांच्या घरी ‘ईव्हीएमग्रस्तांचा’ मेळा

मतदान यंत्र हॅक होत असल्याच्या शिळ्या कढीला पुन्हा ऊत

    23-Mar-2023
Total Views |
opponents-united-against-evm-at-pawars-house-today

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील ६, जनपथ या निवासस्थानी विरोधी पक्षांची अर्थात ईव्हीएमग्रस्तांची बैठक झाली. यामध्ये मतदान यंत्रे हॅक केली जात असल्याच्या शिळ्या कढीला पुन्हा एकदा ऊत आणण्याचा प्रकार घडला आहे.
 
बैठकीनंतर शरद पवार, दिग्वीजय सिंह आणि कपिल सिब्बल यांनी संयुक्तरित्या पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी दिग्वीजय सिंह म्हणाले, रिमोट ईव्हीएमवर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी जवळपास एकमताने रिमोट ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्यास राजकीय पक्षांनी असहमती दर्शविली होती. त्यामुळे आयोगास त्याचे प्रात्यक्षित दाखवून देण्यासही नकार दिला होता. त्यामुळे ईव्हीएमविषयी देशात संशयाचे वातावरण असल्याचे स्पष्ट आहे. ईव्हीएमविषयी निवडणूक आयोगाने यापूर्वी केलेले दावे त्यांनीच खोडून काढले आहेत. त्यामुळे ईव्हीएमविषयी राजकीय पक्षांचा संशय दूर करण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची असल्याचे दिग्वीजय सिंह यांनी म्हटले आहे.

कपिल सिब्बल यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकत असल्याचा जुनाच आरोप यावेळी केला. ते म्हणाले, ज्या ज्या वेळी ईव्हीएममध्ये बिघाड होतो, त्या त्या वेळी भाजपला मतदान झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जगातील एकाही देशात ईव्हीएम वापरले जात नाही, मग ते भारतातच वापरण्याचा हट्ट हा अनाकलनीय आहे. जगातील प्रत्येक मशीनमध्ये छेडछाड करता येतेच. त्यामुळे ईव्हीएमविषय़ी निवडणूक आयोगाकडून अंतिम उत्तरे मागितली जाणार असून ती न मिळाल्यास पुढे काय करायचे, ते ठरविण्यात येणार असल्याचेही सिब्बल यांनी यावेळी नमूद केले आहे.

दरम्यान, या बैठकीस ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह, वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, भारत राष्ट्र समितीचे केशवराव, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, डाव्य. पक्षाचे डी. राजा यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.