हिंदुत्ववादी सरकारचा आक्रमक पवित्रा ; माहिममधील ती मजार नेस्तनाबूत !

जिल्हा प्रशासनासह पोलिसांकडून त्वरित तोडक कारवाई

    23-Mar-2023
Total Views |
 
Mahim Mazar
 
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या माहीममधील मजारीबाबत केलेल्या गंभीर आरोपानंतर मुंबईचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. माहिमच्या समुद्रात बेकायदेशीरपणे मजार बांधण्यात आली असून त्यावर महिनाभरात कारवाई करण्याची मागणी ठाकरेंकडून करण्यात आली होती. त्यावर तात्काळ प्रतिसाद देत राज्यातील फडणवीस शिंदे सरकारने मजारीचे हे अनधिकृत बांधकाम नेस्तनाबूत केले आहे. त्यामुळे आधी गडकिल्ल्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण आणि आता समुद्रात करण्यात आलेले अतिक्रमण या दोन्हींवर करण्यात आलेल्या तोडक कारवाईमुळे राज्यातील हिंदुत्ववादी सरकारने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
 
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मजारीच्या संदर्भात दाव्यानंतर लगेचच मुंबई जिल्हा प्रशासनासह मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या अनधिकृत बांधकामावर गुरुवार, दि. २३ मार्च रोजी सकाळी लवकरच तोडक कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या सहा सदस्यांच्या पथकाकडून या तोडक कारवाईची प्रक्रिया पोलिसांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली आहे.
 
माहिम तो झांकी हैं, पुरी पिक्चर अभी बाकी हैं !
 
''राज ठाकरेंनी माहिममधील त्या अनधिकृत मजारीच्या संदर्भात जी माहिती सरकारच्या लक्षात आणून दिली त्यासाठी त्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो. सरकारने देखील तात्काळ या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली त्यासाठी मी सरकारचे मनापासून अभिनंदन करत आहे. मुळात अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे केवळ माहिममध्येच नाही तर मालवणी, मालाड, भिवंडी आणि अनेक ठिकाणी आहेत. आता फक्त माहिमच्या मजारीवर कारवाई झाली आहे. पण हा फक्त ट्रेलर असून या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा लवकरच उगारला जाणार आहे. त्यामुळे माहिम तो झांकी हैं, पुरी पिक्चर अभी बाकी हैं हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.''
 
- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर
 
 
सरकारने कायमचा बंदोबस्त करावा
 
''फडणवीस शिंदे सरकारने केलेल्या कारवाईचे आम्ही नक्कीच कौतुक करतो. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीनंतर सरकारने लगेचच हा प्रश्न मार्गी लावला हे नक्कीच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आज सरकारने हा ठिकाणचे अनधिकृत बांधकाम हटविले आहे, परंतु यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कुठलेही बांधकाम होऊ नये यासाठी सरकारने कायमचा बंदोबस्त करावा.''
 
- संदीप देशपांडे, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.