भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ला स्विकारार्ह नाही – ब्रिटीश परराष्ट्र सचिव

    23-Mar-2023
Total Views |
 
James Cleverly
 
 
नवी दिल्ली : भारत आणि ब्रिटनचे संबंध अतिशय घनिष्ट आहेत. त्यामुळे लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेला हल्ला हा स्वीकारार्ह नाही, असे प्रतिपादन ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स क्लेवर्ली यांनी म्हटले आहे.
 
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांनी केलेल्या हल्ल्याविषयी भारताने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता ब्रिटन सरकार नरमले असून ब्रिटीश परराष्ट्र सचिव जेम्स क्लेवर्ली यांनी त्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
 
ते म्हणाले, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांवर होणारा हिंसाचार अस्वीकार्य आहे. भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. पोलीस तपास चालू आहे आणि आम्ही लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि भारत सरकारच्या संपर्कात आहोत. भारतीय उच्चायुक्तालयातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मेट्रोपॉलिटन पोलिसांना योग्य ते आदेश देण्यात आले आहेत. युकेमधील उच्चायुक्तालय आणि सर्व परदेशी राजदूतांच्या सुरक्षेविषयी सरकार गंभीर असून भविष्यात अशा घटनांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे भारत आणि ब्रिटनमध्ये घनिष्ट संबंध असून दोन्हा देशांसाठी ते अतिशय महत्वाचे असल्याचेही क्लेवर्ली यांनी म्हटले आहे.
 
पंजाब पोलिसांनी खलिस्तानी अमृतपाल सिंग विरोधात अटक मोहिम सुरू केली आहे. त्याविरोधात परदेशातील खलिस्तान समर्थकांनी त्या त्या देशांमध्ये भारतविरोधी कारवायांना प्रारंभ केला आहे. खलिस्तान्यांची मोठी संख्या असलेल्या ब्रिटनमध्ये भारतविरोधी कारवाया पुन्हा सुरू झाल्या आहेत. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांनी हल्ला करून तेथे तोडफोड करण्याचा आणि तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भारतानेही असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा ब्रिटनला दिला आहे.
 
दरम्यान, अमृतपालसिंग अद्याप फरार असला तरी त्याचे नातेवाईक आणि साथीदार अशा १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अमृतपालसिंग आणि त्याच्या साथीदारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.