दिव्यांगांचा निधी १३ वर्षे पडुन - दिव्यांग संघटनेने वेधले पालिका आयुक्तांचे लक्ष

23 Mar 2023 20:16:21
Disability Fund

ठाणे : दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचे निर्धारित केले आहे. मात्र, ठाणे महापालिकेकडून अपेक्षित असलेला निधीच गेली १३ वर्षे खर्च करण्यात आला नसल्याची बाब दिव्यांग संघटनांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणली आहे.
 
ठाणे महापालिका परिक्षेत्रातील दिव्यांगांच्या समस्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहेत. दिव्यांगांच्या अनेक मागण्या व त्याची सोडवणूक करण्यासाठी दिव्यांग संघटनांनी नुकतीच ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी दिव्यांगांच्या स्टॉल, आधार संलग्नीकरण, वाया घालवला जाणारा निधी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन दिव्यांगांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
 
दिव्यांग हक्क उठाव संघर्ष समितीतील दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि दिव्यांग सेवक आनंद बनकर,मुकेश घोरपडे,मंगेश साळवी,मेहबूब इब्राहीम शेख,नारायण पाचारणे,अशोक गुप्ता,संजय यादव,इक्बाल काजी आणि इतर पदाधिकारी तसेच अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसूफ खान आदींनी आयुक्तांची भेट घेतली.

शिष्टमंडळातील पदाधिकारीनी माहिती अधिकारामध्ये मिळवलेल्या माहितीमध्ये, सन २०११-१२ ते सन २०२२-२३ साठी ठाणे महापालिकेने १७० कोटी २६ लाख ४० हजार १६१ रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे ६३ कोटी ६६ लाख ६९ हजार ९२० रुपयांचा निधी खर्चच केलेला नसल्याची बाब मो. युसूफ खान यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब गंभीर असल्याने त्याची चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.


Powered By Sangraha 9.0