चिंता वाढली! कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पंतप्रधानांनी बोलावली तातडीने बैठक!

22 Mar 2023 15:53:36
 
Coronavirus Breaking update
 
 
नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोविड-19 चे एकूण १,१३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी १९ मार्चला १,०७१ रुग्णसंख्या नोंदवली गेली होती, तर मंगळवारी ६९९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
 
 
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ३० हजार ८१३ लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
 
 
आज साडे चार वाजता पंतप्रधान मोदी यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान काय सुचना करतील, हे पाहावे लागणार आहे. देशातील सक्रिय कोरोना रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. देशात आता कोरोनाचे सक्रिय रुग्ण ७,०२६ वर पोहोचले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाचे ४ कोटी ४६ लाख ९८ हजार ११८ रुग्ण आढळले आहेत. त्यातून ४ कोटी ४१ लाख ६० हजार २७९ लोक बरे झाले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0