...त्यामुळे संभाजीराजे जनामनात पोहोचले : विश्वास पाटील

21 Mar 2023 11:13:22
Sambhaji Maharaj 
Vishwas Patil
 
 
धर्मवीर संभाजी महाराज ( Sambhaji Maharaj ) यांची आज (मंगळवार) पुण्यतिथी. विक्रम संवत्सराचा शेवटचा दिवस आणि एका युगपुरुषाचा अंत फाल्गुन अमावास्येला झाला. या दिवसाची इतिहासात विशेष नोंद झाली आहे. त्यानिमित्त ख्यातनाम लेखक व अनेक पुरस्कारप्राप्त कादंबरीकार विश्वास पाटील यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी मृगा वर्तक यांनी साधलेला संवाद...
 
 
संभाजी महाराजांच्या ( Sambhaji Maharaj )मृत्यूनंतर आज शतके उलटली. परंतु, अजूनही त्यांच्याविषयी हिरिरीने बोलले जाते. यामागे काय कारण असावे? तसेच संभाजी महाराजांवर लिहावे, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?
 
 
३ एप्रिल, १६८० ला शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मृत्यूनंतर स्वराज्यावर मोठे संकट आले होते. जवळजवळ पाच लाखांची फौज घेऊन औरंगजेब चालून आला. त्यावेळी पुढील दहा वर्षे महाराष्ट्र एकहाती सांभाळण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनीच केले. ते सांभाळताना औरंगजेबासारख्या दुष्टाशी लढून हौतात्म्य पत्करणारा राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक आपलेपणा आहे. प्रेम आहे. आणि म्हणूनच त्यांची ओढ महाराष्ट्राला अजूनही वाटते. मलाही केव्हातरी त्यांच्याविषयी लिहायचे होतेच. त्यामुळे निव्वळ कपोलकल्पित घटना न मांडता त्यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास करून लिहावे, असे माझ्या मनात होतेच. मी जिल्हा परिषदेतर्फे रायगड जिल्ह्यात जेव्हा गेलो, तेव्हा कामानिमित्त ग्रामीण भागातून खूप फिरावं लागायचं, त्यावेळी शिवराय आणि शंभूराजांचे किल्ले, समुद्रकिनारे आणि जंगलं पाहताना मला तो इतिहास खुणावू लागला आणि मग ही कादंबरी लिहायला घेतली.
 
 
संभाजी महाराजांचा ( Sambhaji Maharaj ) औरंगजेबाने (Aurangzeb) जो छळ केला तो तुमच्या कादंबरीतील शेवटच्या काही पानांतून वाचताना मन विषण्ण होतं. पण तरीही आज औरंगजेबाचे कौतुक करण्याचा सपाटाच आपल्याकडे समाजमाध्यमांवर सुरु आहे, असे दिसते. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
 
 
- काही क्रूर प्रवृत्तीच्या लोकांनी असा सपाटा चालवलेलाच आहे. मुळात औरंगजेब हा दुष्टांचाच शहेनशाह होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्यांनी आपला पिता शहाजहान याचे पाणी तोडले, आपला मोठा भाऊ दाराचे मुंडके छाटून आपल्या हातात घेऊन बराचवेळ पारखत बसला होता. आपल्या तीन भावांची त्याने निर्घृण हत्या केली. दाराच्या दोन बेगमांशीसुद्धा त्याने जुलुमाने लग्न केले होते. त्याचा हा सर्व इतिहास पाहता त्याला नायक करायचे काहीही कारण नाही आहे. तो दृष्ट होता, क्रूरकर्मा होता हे त्याने त्याच्या कर्मानेच जाहीर केले आहे. आणखी एक, जर लोकांना हिंदू आणि मुसलमान बंधुत्वाची किंवा ऐक्याची प्रतीकं हवी असतील, तर ती अनेक आहेत. त्यांच्याकडे आपण पाहत नाही आणि या दुष्टांनाच सुष्ट ठरवत जातो. असे अनेक सरदार होते, अफजलखानाचेही आणि औरंगजेबाचेही काही सरदार शिवाजीमहाराजांना, शंभूराजांना सामील होते.
 
 
काही उघडही सामील होते. त्यांनी बरीच मदत केली आहे. ते जरी मुसलमान असले तरीही ते हिंदवी स्वराज्याचे मित्र होते. त्यांच्या मैत्रीचा सन्मान जरूर केला जावा. परंतु, मुद्दामहून अफजलखान किंवा औरंगजेबाचा गौरव करण्यामागे अर्थ नाही. जसे की, रुस्तम ए जमा आहे, हा विजापूरचा सरदार होता. त्याचे वडील रणदुल्ला खान म्हणजे सातार्‍याजवळील रेहमतपूर येथील होत. रेहमतपूर त्यांच्या नावाने बांधलेले आहे. या रणदुल्ला खानाने शिवाजी राजांचे पिता शहाजीराजांना खूप मदत केली. बंगळुरू जवळचा किल्ला त्यांना राहायला दिला. हा किल्ला इतका मोठा होता की, त्याला दिल्ली दरवाजासारखे नऊ दरवाजे होते. तिथल्याच एका केम्पेगौडा नावाच्या राजाकडून ६० हजार फौजेनिशी वर्षभर लढाई करून जिंकलेला तो किल्ला होता. तो जसाच्या तसा शहाजी राजांकडे त्यांनी सुपूर्द केला. पुढच्या काळात शिवाजी महाराजांची मैत्री त्यामुळे जुळलेली आहेच. डिसेंबर १६५९ साली झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी रुस्तम-ए-जमाला जाऊ दिले. याची वर्णने‘श्रीशिवभारत’ या ग्रंथातदेखील आहेत.
 
 
३. शंभूराजांच्या जीवनावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) या नव्या नाट्याचे प्रयोग सध्या होत आहेत. हे नाटक तुम्ही पाहिलं असेल, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, शंभू राजांच्या मृत्यूसमयी धर्मांतर करण्याविषयी त्यांच्यावर औरंगजेबाने बळजबरी केली, असे पुस्तकातून तुम्ही मांडता. इतर साहित्यातूनही तसेच दिसते, परंतु, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ महानाट्यात मात्र, लपवलेल्या खजिन्याविषयी शंभूराजे मौन सोडत नाहीत आणि म्हणून त्यांचा छळ केला जातो असे दाखवले आहे. त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
 
 
- मी ते महानाट्य पहिले नसल्याने त्याबद्दल नेमके असे काही मला म्हणता येणार नाही.
 
 

४. कादंबरीच्या शेवटी तुम्ही जवळपास १००च्यावर संदर्भ दिले आहेत. मग या अभ्यासपूर्ण लेखनाला कादंबरी स्वरुपात मांडावेसे का वाटले? तसेच हे संदर्भ अभ्यासायला किती काळ लागला?
 
 
- याचे कारण असे आहे, मी जर इतिहास ग्रंथ लिहिला असता, तर वाचनालयातच तो शोभेच्या वस्तूंसारखा राहिला असता. लोक इतिहास ग्रंथ वाचत नाहीत. त्यातला जडपणा काहींना सहवत नाही. आणि कादंबरीच्या माध्यमातून का होईना, ही साहित्यकृती सत्यांशावर आणि संशोधनावर आधारलेली आहे. ती कादंबरीच्या माध्यमातून जनामनापर्यंत पोहोचायला हवी होती. तशी ती पोहोचलीही. संभाजी कादंबरी महाराष्ट्रात प्रकाशित होण्यापूर्वी शंभूराजांबाबत इतकी जागरूकता महाराष्ट्रात आलेली नव्हती. जर हा विषय इतिहास ग्रंथात बंदिस्त करून ठेवला असता, तर माझा उद्देश सफल झाला नसता. म्हणूनच मला कादंबरी हा प्रकार निवडावा लागला. तसे हे संदर्भ अभ्यासायला चार वर्षे लागलीच.
 
 
५. राजांची चरित्रे नेहमीच सकारात्मक लिहिली जातात. त्यात संभाजी महाराजांची प्रतिभाशक्ती, लेखनशैली, युद्धकौशल्ये, बाणेदारपणा हे सर्वच वाखाणण्याजोगे आहे. असे असतानाही आज समाजात काही प्रमाणात काही विशिष्ट गटांकडून शंभूराजांची प्रतिमा अकारण मलीन केली जाते. याची सुरुवात कुठून झाली असावी, असे तुम्हाला वाटते?
 

- ‘संभाजी वास्तव आणि अवास्तव’ या कादंबरीच्या शेवटास टीपण लिहिले आहे. त्यात मी एक उल्लेख केला आहे. एका बखरीतून याची सुरुवात झाली. संभाजी महाराजांनी ज्या कारभार्‍यांना त्यांच्या चुकांमुळे हत्तीच्या पायी दिले होते, त्यांच्या वंशजांकडून ज्या बखरी लिहिल्या गेल्या. त्यातून याची सुरुवात झाली आहे. संभाजीराजांची व्यक्तिरेखा मलिन, कल्पित आणि विपर्यस्त बनवण्याची पहिली सुरुवात कोणी केली असेल, तर ती मल्हार रामराव चिटणीसांनी. हा बाळाजी आवजी चिटणीसांचा वंशज. त्यांनी ही बखर लिहिली शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल १२२ वर्षांनी. आपले पूर्वज बाळाजी आवजी आणि त्यांचा पुत्र आवजी बाळाजी यांना हत्तीच्या पायदळी तुडवून मारल्याबद्दलचा राग मल्हाररावांच्या मनात होता. हे बखरलेखन हा एक सूडाचाच भाग होता. ही बखर भाषेच्या दृष्टीने मोठी रसाळ आणि चित्ताकर्षक होती. परंतु, ते सर्व एकांगी, कल्पित चित्र होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0